मुंबईला आपली मेहबूबा म्हणणाऱ्या पहिल्या डॉनची कहाणी....!!!
‘कुली’, ‘दीवार’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ते काही वर्षापूर्वी येऊन गेलेला ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, या सर्व चित्रपटातील नायक ज्या एका खऱ्या-खुऱ्या माणसाच्या आयुष्यावरून प्रेरित होते तो माणूस म्हणजे ‘हैदर मस्तान मिर्झा’ उर्फ हाजी मस्तान.
दिवार मधला अमिताभ बच्चन असो वा 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' मधला अजय देवगण, दोघांनीही मस्तान मिर्झाची एकच खुबी उचलून त्यानुसार आपल्या भूमिकांना न्याय दिला. ती खुबी म्हणजे त्यांचे भेदक डोळे. मस्तान मिर्झाचे डोळे ही त्याची मोठी खासियत म्हणावी लागेल. समोरच्याकडे त्या तीक्ष्णतेने बघणे, बोलण्याचा ढंग आणि व्यक्तीमत्वात दिसणारा बेदरकार आत्मविश्वास या सर्व गोष्टींमुळे हा कधी काळचा एकमेव डॉन आजही अनेक नायकांना भुरळ घालतो.
मित्रांनो आपण आज याच हाजी मस्तान बद्दल जाणून घेणार आहोत. तामिळनाडू मधल्या एका लहानश्या गावातील गरीब कुटुंबातून आलेला मुलगा मुंबई काबीज करतो, मुंबईला आपली मेहबूबा म्हणत तिच्यावर प्रेयसी सारखं प्रेम करतो...हे सर्व घडलं तरी कसं ? त्याचीच ही कहाणी !!!
गरिबीमुळे गाव सोडलं !!!
कुड्लोर नामक तामिळनाडूच्या गावात १ मार्च १९२६ साली जन्मलेल्या हैदर मिर्झाचे वडील हे अत्यंत गरीब शेतकरी होते. गरिबी आणि दोन वेळच्या अन्नासाठी झगडावे लागत असल्याने त्यांनी १९३४ साली गाव सोडले आणि मुंबई गाठली. मुंबईत येऊन त्यांनी क्रॉफर्ड मार्केट मध्ये सायकलचं पंक्चर काढण्याचं दुकान टाकलं.
जवळ जवळ १० वर्षांनी जेंव्हा भारत छोडो आंदोलन ऐन भरात होतं त्यावेळी हैदर मिर्झाची ओळख झाली गालिब शेख या माणसाशी. गालिब शेखने हैदरला ऑफर दिली की कुलीचं काम करता करता त्याने काही माल कपड्यात लपवून आणला तर बदल्यात हैदरला पैसे मिळतील.
तो काळ होता इंग्रजांचा. त्यावेळी घडी, रेडीओ, ट्रांजीस्टर, वगैरे इलेक्ट्रॉनिक सामानाची चलती होती आणि अवैध पद्धतीने त्यांची तस्करी व्हायची. याचाच फायदा हैदरला झाला पण खऱ्या तस्करीची ही तर निव्वळ सुरुवात होती.
असं म्हणतात की दिवार आणि कुली मध्ये अमिताभ बच्चनच्या बिल्ल्याचा नंबर '७८६' हा खरं तर हाजी मस्तान याच्या बिल्ल्याचा नंबर होता.
स्मगलिंगच्या धंद्यात उडी !!!
कुलीच्या काम करत असताना काही वर्षांनी हैदरची ओळख झाली नारायण बखिया या गुजरात मधल्या तस्कराबरोबर. त्याच्याबरोबर मिळून हैदर मिर्झाने खऱ्या अर्थाने तस्करीला सुरुवात केली. दुबईचे इलेक्ट्रॉनिक्सचे समान आणि सोन्याच्या तस्कार्रीतून हैदरला भरपूर पैसा मिळाला आणि हैदर मिर्झाचा झाला मस्तान भाई.
हज वरून येणाऱ्या यात्रेकरूंच्या मार्फत तस्करी चालत असल्याने मस्तान मिर्झा स्वतः देखील हज यात्रेला अनेकदा जाऊन आला होता. यावरूनच त्याला हाजी मस्तान हे नाव पडलं.
बदललेल्या दिवसांनी मस्तानला मुंबईच्या श्रीमंत माणसांच्या रांगेत नेवून बसवलं. बॉलीवूड कलाकार ते राजकारणी अश्या सर्वांचा त्याच्या आजूबाजूला राबता सुरु झाला. एकेकाळची हलाखीची परिस्थिती जाऊन सोन्याचे दिवस आले होते.
पांढरे शुभ्र कपडे, पांढरी मर्सिडीज बेंझ कार, विदेशी सिगार ही मस्तानची खास ओळख झाली. इतर माफियांपेक्षा मस्तान मिर्झा वेगळा असण्याचं एक कारण म्हणजे त्याची काम करण्याची पद्धती. गँगस्टर ज्या कामांसाठी त्याकाळात बदनाम होते ते काम मस्तानने कधीचं केलं नाही. स्वतः आयुष्यभर एकही गोळी न चालवता त्याने आपला दबदबा कायम ठेवला होता.
माधुबलीशी लग्नाचं स्वप्न !!!
बॉलीवूडशी संपर्क आल्यानंतर मधुबालाची आणि मस्तान मिर्झाची ओळख झाली. मस्तान मिर्झाला खर तर मधुबालाशी लग्न करायचं होतं पण तसं घडू शकलं नाही, पण एक मुलगी त्याच्या नशिबात आली जी हुबेहूब मधुबाला सारखी दिसायची. तिचं नाव होतं सोना. तिच्याशीच मस्तान मिर्झाने लग्न देखील केलं.
आणीबाणीचा काळ !!!
स्रोत
इंदिरा गांधींच्या सरकार मध्ये लागलेल्या आणीबाणीत मस्तान मिर्झाला अटक झाली. या आधीही त्याला पकडण्याचे प्रयत्न झाले होते खरे पण पोलीस त्याच्याच बाजूने असल्याने तो नेहमी कायद्याच्या कचाट्यातून सुटत होता, पण आणीबाणीच्या काळात शेवटी त्याच्यावर धाड पडलीच. जेल मध्ये असतानाही त्याला व्हीआयपी (VIP) ट्रीटमेंट मिळत राहिली. ज्या पोलिसांवर त्याची कृपा होती ते यावेळी कामी आले.
याच दरम्यान हाजी मास्तानची ओळख झाली एका गांधीवादी नेत्याशी. हा नेता म्हणजे ‘जयप्रकाश नारायण’. १८ महिन्यांच्या जेल नंतर हाजी मस्तानने आपले सर्व वाईट धंदे बंद केले. हा जयप्रकाश नारायण यांचाच प्रभाव होता. असं म्हणतात की जयप्रकाश नारायण यांना त्याने सर्व धंदे सोडण्याबद्दल वाचन दिलं होतं.
राजकारणात प्रवेश !!!
१९८० साली जोगिंदर कावड़े या दलित नेत्या बरोबर मिळून मस्तान मिर्झाने 'दलित-मुस्लिम सुरक्षा महासंघ' नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. दिलीप कुमार या पार्टीचा प्रचार जोरदार करत होते पण राजकारणात मात्र हाजी मस्तान हरला. मुंबई, कलकत्ता, मद्रास सर्व जागी पक्षाने हार पत्करली.
१९९४ साली हार्ट अटॅकने हाजी मस्तानचा मृत्यू झाला. हाजी मस्तानने अंडरवर्ल्ड सोडल्यानंतर मुंबई माफियाचा चेहराच बदलला. त्याच्याच पंखाखाली वाढलेला दाउद इब्राहीम अंडरवर्ल्डचा नवा चेहरा झाला होता. १९९४ साल उजाडे पर्यंत दाउदने मुंबईत बॉम्ब ब्लास्ट करून दुबईला पळ काढला होता आणि मुंबईच्या पहिल्या डॉनचा कायमचा अस्त झाला होता.
हाजी मस्तान काय किंवा दाऊद काय दोघेही गँगस्टर, कायद्यांना धाब्यावर बसवून काम करणारे पण दाऊदने ज्या प्रकारे मुंबई माफियाचा चेहरा रक्तरंजित केला त्या प्रकारे काम करण्याची पद्धत हाजी मस्तानची नक्कीच नव्हती.