'नाम मे क्या रखा है ?' - भारतातल्या या गावात लोकांना नावंच नाहीत!!!
आपली ओळख काय? तर आपलं ‘नाव’! नावाशिवाय आपली ओळख ती काय? हल्ली फेसबुकवर एक नवीन फॅड आलंय राव. ‘पूजाचा लाडका बच्चू’, ‘हवा करणारा पाटलांचा परश्या’. ‘रॉकस्टार बाबल्या’ असली थोर नावं ठेवली जात आहेत. लहानपणी आपल्याला आपल्या नावाची थोडी वाट लावून ‘निक नेम’ मिळायचं.. जसं सचिन नांव असेल तर सच्या, प्रकाश असेल तर पक्या, वगैरे. म्हणजे काय तर नावाने आपण लक्षात राहतो. पण समजा कुणाला नावच नसेल तर?
मंडळी, आम्ही भारतातील एका अशा गावाला शोधून काढलंय, जिथे माणसांना नांवच नाहीये. ती माणसं एकमेकांना चक्क गाण्यांद्वारे ओळखतात. नक्की हा काय प्रकार आहे?
तर मंडळी< हे गाव आहे मेघालयच्या सोखरा आणि पिनरस्ला यांच्या सीमेच्या मधोमध वसलेलं कोंगथोंग नांवाचं गांव. खासी जमातीचं हे कोंगथोंग गाव मेघालयपासून पूर्वेला २६ किलोमीटरवर आहे. खातर शोंग भागातल्या 12 गावांपैकी हे एक. या गावाची खास बात म्हणजे इथे लोकांना नावं नाहीत, तर त्यांना एक विशिष्ट प्रकारचं संगीत नाव म्हणून दिलं जातं. हे नाव त्यांना त्यांच्या जन्माच्यावेळी आईकडून मिळतं. गर्भवती असताना महिला आपल्या मुलाचं नांव म्हणजेच ते विशिष्ट संगीत ठरवते. हे गाव निसर्गाच्या सानिध्यात असल्याने गर्भवती स्त्री पशु पक्षांच्या आवाजांतून एक सुरावट तयार करते. इथला नियम म्हणजे हे संगीत आधीच्या मुलाच्या सुरांशी मिळतं जुळतं नसावं, किंबहुना गावातल्या कोणत्याच व्यक्तीच्या सुरांचं साम्य नसावं. याचाच अर्थ इथे प्रत्येक आई ही संगीतकार आहे.
जन्मानंतर त्याच संगीताच्या चालीने पूर्ण गाव त्या मुलाला हाक मारतं. त्याच बरोबर आई त्या मुलाला लहानपणापासून या संगीताचं शिक्षण देते. याला पद्धतीला स्थानीक लोक ‘जिंग्रावाई लॉबेई’ म्हणतात.
या प्रकारे ओळख असणे हा खूप जुना प्रकार आहे मंडळी. पूर्वी शिकारीवर असताना धोक्याच्या वेळी विशिष्ट प्रकारच्या आवाजाने आपल्या माणसाला सावध केलं जायचं. पुढे याच पद्धतीने एकमेकांना हक मारण्याची पद्धत रूढ झाली असावी.
अजून एक विशेष म्हणजे गावातला कोणतीही व्यक्ती जेव्हा मरतो, तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्याशी जोडलेलं त्याचं संगीत देखील मरतं. म्हणजे ती सुरवाट कोणीही दुसरी व्यक्ती घेऊ शकत नाही.
...आहे की नाही काही तरी हटके ??