भारतातील १० ऐतिहासिक क्लॉक टॉवर्स !!
असाही एक जमाना होता जेव्हा लोकांच्या हातावर घड्याळं नसायची. हातावर तर जाऊ द्या, घरात पण घड्याळं नसायची. उगवता सूर्य आणि मावळता सूर्य बघूनच दिवस संपायचा. ते दिवस रात्री काम करण्याचे नव्हते म्हणून घड्याळाची गरज पण नव्हती. हळूहळू यंत्र युगाने आपल्या आयुष्याचा ताबा घेतला आणि घड्याळाची गरज भासायला लागली. सुरुवातीला घरातल्या भिंतीवर टोल्याचे घड्याळ असणारे लोक श्रीमंत समजले जायचे. इतकंच काय, भिंतीवर घड्याळ लावल्यानंतर साग्रसंगीत पूजा पण व्हायची. या नंतर ब्रिटिशांनी क्लॉक टॉवरची आयडिया भारतात आणली. शहराच्या मध्यभागी असणाऱ्या चौकात घड्याळाचे मनोरे उभे राहिले. या पैकी १० महत्वाचे क्लॉक टॉवर आज आपण बघूयात :
१. मुंबई विद्यापीठाचा ‘राजाबाई टॉवर’
प्रेमचंद रायचंद या धनाढ्य माणसाच्या देणगीतून उभे असलेले राजाबाई टॉवर ‘जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट’ याने उभे केले. राजाबाई हे प्रेमचंद रायचंद यांच्या आईचे नाव.
२. घड्याळ गोदी
एकेकाळी गोदीत काम करणारे कामगार अडाणी होते त्यामुळे पोर्ट ट्रस्टच्या वेगवेगळ्या गेटला रंगावरून नावे दिली होती. उदाहरणार्थ, ‘यलो गेट’, ब्ल्यू गेट, इत्यादी. गोदीचे मेन गेट मात्र घड्याळ गोदी म्हणून ओळखले जायचे, ते तिथे असलेल्या क्लॉक टॉवरमुळे.
३. हुसैनाबाद क्लॉक टॉवर, लखनऊ
भारतातल्या सर्वात उंच टॉवर्समध्ये हुसैनाबाद क्लॉक टॉवरची गणना होते. लखनऊमध्ये रुमी दरवाजा इथे हा टॉवर आहे आणि तो १९८१ साली नासीर उद्दीन हैदर या नवाबाने ‘अवध’चे पहिले लेफ्टनंट जनरल जॉर्ज कूपरच्या यांच्या स्वागतार्थ टॉवर बांधून घेतला होता.
४. चौरा बझार क्लॉक टॉवर, लुधियाना
रानी विक्टोरियाच्या आठवणीत १०० वर्षांपूर्वी या टॉवरची निर्मिती झाली. ‘घंटा घर’ म्हणून हा परिसर ओळखला जातो. लुधियानाच्या जुन्या ठिकाणांपैकी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे.
५. सिकंदराबाद टॉवर, हैद्राबाद
हा टॉवर म्हणजे सिकंदराबादची ओळख आहे. याची निर्मिती ब्रिटिशांनी केली आहे.
६. देहरादून क्लॉक टॉवर
देहरादून मधील घंटा घर किंवा क्लॉक टॉवर हे शहराच्या मध्यभागी आहे. या क्लॉक टॉवरला ६ घड्याळं असून सर्व घड्याळं आजही काम करत आहेत. देहरादून मधील जुन्या पुराण्या इमारतींमध्ये याची गणना होते.
७. घंटा घर, मिर्झापूर
मिर्झापुर महानगरपालिकेच्या इमारतीवर हा टॉवर आहे. स्थानिक लोक याला घंटा घर म्हणतात. सध्या टॉवरमधलं घड्याळ बंद अवस्थेत आहे. १८८१ साली मिर्झापूर रेल्वे स्टेशनपासून ३ किलोमीटरवर याची निर्मिती झाली.
८. घंटा घर, जोधपुर
जोधपुरमधील बाजाराच्या ठिकाणी हा टॉवर आहे. हा भाग म्हणजे अत्यंत वर्दळीचा समजला जातो. महाराजा सरदार सिंह यांनी या टॉवरची निर्मिती केली. इथल्या बाजारात अनेक देश विदेशातील व्यक्ती पाहायला मिळतात.
९. मिंट क्लॉक टॉवर, चेन्नई
जॉर्ज टाऊन, चेन्नई मध्ये हा क्लॉक टॉवर आहे. मिंट क्लॉक टॉवर हे चेन्नई मधील प्रमुख ४ क्लॉक टॉवर्सपैकी एक आहे.
१०. क्लॉक टॉवर, म्हैसूर
या क्लॉक टॉवरला डोब्बा गाडीयारा किंवा बिग क्लॉक टॉवरच्या नावाने ओळखलं जातं. म्हैसूरच्या ऐतिहासिक भागात हे टॉवर उभे आहे. याच भागात डफरीन क्लॉक टॉवर नामक आणखी एक कमी उंचीचे क्लॉक टॉवर आहे.
थोडक्यात, "घंटी बिग बेन दी" इंग्रजांनी भारतात पण आणली आणि आज हे टॉवर्स देशातल्या काही जुन्या वास्तूंपैकी एक आहेत..