पोलिस आयुक्त सांगत आहेत, चेंगराचेंगरी कशी घडते आणि ती कशी टाळता येऊ शकते..

२९सप्टेंबरला पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन रोड स्टेशनच्या फुटओव्हर ब्रिजवर गर्दीमुळं चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेकजण  मृत्युमुखी पडले.  त्यातही एखादा आकडा अजून वाढतोच आहे. अफवा, गर्दी, पाऊस हे सगळं एकत्र होऊन हा भयानक प्रसंग ओढवला. पण तरी गर्दी मुंबईत तर रोजची आहेच, पण आपल्या भारतातली देवस्थानं आणि सणसमारंभांच्या निमित्तानं गर्दीचे प्रसंग पुष्कळ ओढवतात. मांढरदेवीची घटनाही तुम्हांला आठवत असेलच. 

यावेळेस रेल्वेच्या सोयीसुविधा अपुऱ्या होत्या हे तर होतंच. पण असो. हा विषय रेल्वेने काय केलं नाही एवढ्यापुरताच मर्यादित नाही. गर्दीचं व्यवस्थापन हा एक खूप मोठा विषय आहे.  या विषयासंदर्भात सध्या नाशिकचे आयुक्त असलेले डॉ. रविंदर  कुमार सिंगल यांचा चांगलाच अभ्यास आहे. २००३ साली त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा झाला. तेव्हा तर नेहमीपेक्षाही अधिक गर्दी लोटणार होती.  या कुंभमेळ्याचे तेव्हा पोलिस अधीक्षक रविंद्र सिंघल प्रभारी होते. त्यांनी गर्दी व्यवस्थापनशास्त्राचे निकष लावून या कुंभमेळ्याचं आयोजन खूप काटेकोरपणे केलं होतं. हा कुंभ यशस्वी झालाही. या कालावधीतल्या आठवणींवर  डॉ. रविंदर  कुमार सिंगल यांनी "कुशावर्ताचा कोतवाल- एक पर्वणी व्यवस्थापनाची" हे  पुस्तकही लिहिलं. या पुस्तकाचं शब्दांकन केलंय आमच्या बोभाटा.कॉम टीमचे अनुभवी आधारस्तंभ रामदास बिवलकरांनी

एलफिन्स्टन रोडच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर कुशावर्ताचा कोतवाल या पुस्तकातलं एक प्रकरण आम्ही प्रकाशकांच्या परवानगीने बोभाटा.कॉमच्या वाचकांसाठी सादर करत आहोत.  

(२००३ साली त्र्यंबकेश्वरला झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा कालावधीतल्या आठवणींवर  डॉ. रविंदर  कुमार सिंगल यांनी "कुशावर्ताचा कोतवाल- एक पर्वणी व्यवस्थापनाची" हे  पुस्तक लिहिलंय.)

प्रकरण ११ - गर्दीचे नियंत्रण

गर्दीचे नियंत्रण हे सिंहस्थातील सगळ्यात मोठे आव्हान होते. ह्या नियंत्रणाची काही सूत्रे आहेत. कमीत कमी वेळात लोकांना आत घ्यायचं आणि बाहेर काढायचं यासाठी आगमनाचे आणि निर्गमनाचे रस्ते सतत खुले राहतील याची काळजी घ्यावी लागते. जमावाचे गर्दीत रूपांतर व्हायला फारसा वेळ लागत नाही. मग त्यासाठी, लोक न अडखळता, एका जागी न थांबता, प्रवाहासारखे वाहत राहतील, याची खबरदारी घ्यावी लागते. सतत उद्घोषणा, स्वयंसेवकांचे मार्गदर्शन, दिशादर्शक पाट्या, अशा अनेक मार्गांनी अखंड प्रवाह वाहत राहिला की चेंगराचेंगरीची भीती कमी होत जाते.

पहिले आणि महत्त्वाचे सूत्र असे की, "Utmost precaution is to confirm that a streaming crowd does not confront a surprise." वाहत्या गर्दीपुढे अचानक अडथळा उभा राहणे, अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकते. आपल्या ओळखीचे उदाहरण येथे आपण घेऊ या. रेल्वेच्या जिन्यावर गर्दीच्या वेळी आपल्या पुढचा माणूस बुटाची सुटलेली लेस बांधायला मधेच थांबला तर त्या क्षणीच गर्दीचा वेग थांबतो आणि वाह्त जाण्याचा नैसर्गिक तोल धोक्यात येतो. 

काही वर्षांपूर्वी दादर स्थानकावर एक धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. त्यावेळी दादरचा फुट ओवर ब्रिज अत्यंत अरुंद होता. सकाळी किंवा संध्याकाळी दोन गाड्या एकाच वेळी आल्या की दाट गर्दी व्हायची. एका कल्पक, परंतु उपद्रवी महाभागाने या गर्दीतून रस्ता ताबडतोब मिळावा, यासाठी मोटर कारच्या हॉर्नचे आवाज काढणारे एक खेळणे सोबत आणले होते. त्यातून हॉर्नचा पीपीप आवाज आला की समोरचा माणूस आपण आता रस्त्यावर नाही हे विसरून केवळ प्रतिक्षिप्त क्रियेने बा़जूला उडी मारायचा. हॉर्नचा आवाज आणि जीव वाचवण्याची प्रतिक्षिप्त क्रिया मेंदूत इतकी एकजीव झालेली असते की आपण रेल्वे पुलावर आहोत, रस्त्यावर नाही, याचे भान पण हरवून जायचे. परिणामी धक्काबुक्कीला सुरुवात व्हायची. रेल्वे पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपाने हे प्रकार व्हायचे थांबले. वाहत जाणार्‍या गर्दीसमोर अनपेक्षित काही घडले की त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत आणि नंतर चेंगराचेंगरीत होते, हे समजण्यासाठी हे उदाहरण पुरेसे ठरावे. 

(दाउदी मुस्लीम बोहरा समाजाचे गुरू मोहमद सैदना यांच्या  अंत्येष्टीला झालेल्या चेंगचेंगरीत १८ माणसे दगावली- स्रोत)

आता या प्रकारचे शास्त्रीय स्वरूप बघू या. जमावाचे गर्दीत रूपांतर झाले की Crowd Density वाढत जाते. तज्ज्ञांच्या मते "When a minimum of eight people are pressed together and have less than 1. 5 ft. per person, the crowd has reached a critical density level. At this point there is no space between people. In this situation, shock waves; which cause individuals to move involuntarily, can be seen moving through crowds." ही पातळी ओलांडल्यावर गर्दीच्या लाटा तयार होतात. लाटांमध्ये व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही आणि एकाच वेळी अनेक लाटा तयार होतात. सुरुवातीला या लाटा पुढे मागे होत (नैसर्गिकरीत्या) बलाबल जोखत राहतात (नैसर्गिक तोल सांभाळण्याची क्रिया) आणि निर्णायक बळ मिळाले की एकाच दिशेने परंतु अनपेक्षित वेगाने लाटा पुढे फेकल्या जातात. दबावाचे प्रमाण इतके वाढते की तयार झालेली लाट फुटते. एक लाट फुटली की त्यावर आदळणार्‍या दुसर्‍या लाटेने Crowd Density आणखी वाढते. लोक जागचे उचलले जाऊन पुढे फेकले जातात. अंगावरचे कपडे मागे खेचले जाऊन शरीर पुढे ढकलले जाण्याची प्रक्रिया सुरू होते. पायदळी तुडवले जाण्याची क्रिया सुरू होते. जर गर्दीची ऊर्जा अतिशय उच्च पातळीवर असेल तर दबाव (compression) 

(सध्या नाशिकचे आयुक्त असलेले डॉ. रविंदर  कुमार सिंगल)

ग्लासगो किंवा सिनसिनाटी या शहरात जे चेंगराचेंगरीचे प्रकार घडले, त्यात लोखंडी कठडेसुद्धा गर्दीच्या दबावाने (compression) वेडेवाकडे झालेले आढळले आहेत. जमिनीपासून रोवलेला दोन इंच व्यासाचा, स्टीलचा कठडा वाकण्यासाठी एक हजार पाउंडाचे प्रेशर लागते. जे गर्दीच्या दबावाने तयार झाले होते. 

गर्दीत पायदळी तुडवले जाऊन मृत्यू येणार्‍यांच्या संख्येपेक्षा गुदमरून मरणारांची संख्या जास्त असते. याचे कारण म्हणजे दबाव (compression).

गर्दीचे मानसशास्त्र अभ्यास करणार्‍या निरीक्षकांनी चेंगराचेंगरीच्या प्रकाराचे दोन वेगवेगळ्या वर्गात विभाजन केले आहे.

एकाच लक्ष्याकडे धावणार्‍या गर्दीला 'क्रेझ' अशी संज्ञा आहे. 

मुंबईसारख्या गर्दीला सरावलेल्या शहरात २०१४ साली एक चेंगराचेंगरीची घटना घडली. दाउदी मुस्लीम बोहरा समाजाचे गुरू मोहमद सैदना यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्येष्टीला झालेल्या चेंगचेंगरीत १८ माणसे दगावली. आपल्या धर्मगुरूंचे शेवटचे दर्शन व्हावे, यासाठी ही गर्दी गोळा झाली होती. काही अत्यावश्यक मुद्द्यांचा येथे आपण विचार करू या. दाउदी बोहरा समाज अत्यंत शिस्तबद्ध आणि नियमांचे काटेकोर पालन करणारा आहे. समाज अत्यंत पुढारलेला आणि उच्चशिक्षित आहे. या समाजाची इतिहासात कोठेही दंगेखोर किंवा हिंसक अशी नोंद नाही. चेंगराचेंगरीचे स्थान मुंबई मलबार हिल-व्हीआयपी कॉरिडॉर म्हणजे सुरक्षित होता. तरीही अंत्यदर्शनाच्या एकलक्ष्यी गर्दीचा नैसर्गिक तोल ढळला आणि ही घटना घडली. 

दुसर्‍या प्रकारात एखाद्या लक्ष्यापासून दूर पळणार्‍या गर्दीला 'पॅनिक' अशी संज्ञा आहे. 

१९८१ साली कुतुब मिनार परिसरात अचानक वीज गेली. वीज गेल्यावर झालेल्या धावपळीत एकूण ४५ लोक प्राणाला मुकले. हे एक पॅनिकचे उदाहरण आहे. वीज गेल्यावर झालेला अंधार, गर्दीत असणारी मुलांची जास्त असलेली संख्या आणि कुतुब मिनार पडतो आहे, अशी उठलेली भुमका. यामुळे पॅनिक निर्माण झाले आणि दरवाजाकडे धावत सुटलेल्या गर्दीत ४५ लोक मरण पावले. त्यात २७ लहान मुलं होती.

(कुतुबमिनार चेंगराचेंगरी - स्रोत )

या सगळ्याचा तथ्यांश असा आहे की, 

१) गर्दीची आकलनशक्ती वैयक्तिक आकलनशक्तीपेक्षा कमी असते. 

२) गर्दीचा नैसर्गिक तोल किंवा हार्मनी नाहिशी होण्यासाठी मानसिक दौर्बल्याला आव्हान देणारी छोटीशी घटना पुरेशी असते.

३) निर्माण झालेल्या परिस्थितीला उत्तर देण्याची सामूहिक सारासार बुद्धी गर्दीकडे नसते.

४) अशा प्रकारच्या आपत्तीच्या वेळी सामाजिक बंधने ताबडतोब तुटतात आणि मी आणि माझे अस्तित्व याचाच आधी विचार मनात उद्भवतो.

५) परिणामी काही क्षणात "आभाळ कोसळले पळा पळा"ची साथ पसरते.

या सर्व शक्यता नाहिशा करण्यासाठी अनेक उपाय योजना आम्ही अमलात आणल्या होत्या. साधू आणि भाविकांच्या मार्गात चालताना अडखळून पडू नये यासाठी संपूर्ण गावातील रस्त्यांवरची अनधिकृत आक्रमणे हटवण्यात आली. रस्त्यावर दगड किंवा साचलेली माती असू नये यासाठी आम्ही वारंवार नगरपालिकेकडे आग्रही पत्रव्यवहार करून अडथळे हलवले होते.

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात कितीही सोयीसुविधा तयार केल्या, तरी त्या कमी पडण्याचीच शक्यता अधिक आहे. अशावेळेस नागरिकांनी हे गर्दीचं मानसशास्त्रही थोडं समजून घेतलं तर अशा काही अप्रिय प्रसंगांची तीव्रता थोडीफार कमी होऊ शकते. 

 

सबस्क्राईब करा

* indicates required