जागतिक प्राणी दिन : लुप्त झालेले १० अनोखे प्राणी !!
राव, माणसे किड्यामुंग्यांसारखी मरत असताना आपण कुठे जातोय प्राण्यांचं हाल हवाल विचारायला !! पण काल म्हणजेच ४ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक प्राणी दिन’म्हणून साजरा केला जातो. निदान प्राणी दिन आहे म्हणून तरी आपण प्राण्यांबद्दल बोलू. मंडळी, माणसाचा विकास जसा जसा होत गेला तसा त्याचं आणि निसर्गाचं बिनसत गेल्याचं दिसतं. पर्यावरणाचा ऱ्हास ही तर कायमची बोंब. मग यात स्वतः माणूस सुद्धा भरडला गेला.
आज जागतिक प्राणी दिनाच्या निमित्ताने बघूयात माणसाच्या विकासाबरोबर लुप्त झालेले १० प्राणी...
१. मोहो
हा हवाई बेटांवर सापडणारा पक्षी प्रमाणाबाहेर झालेल्या शिकारीमुळे आता लुप्त झालेला आहे. १९३४ साली या पक्ष्याला शेवटचं बघितलं गेलं होतं.
२. कॅरेबीयन मॉन्क सील
सील प्राण्याच्या शरीरातील विशिष्ठ तेलासाठी याची प्रचंड शिकार करण्यात आली. आणि त्याच बरोबर समुद्रातील वाढत्या मासेमारीमुळेसुद्धा याच्या जीवाला धोका निर्माण झाला. १९५२ साली या प्राण्याला शेवटचं पाहण्यात आलं. मॉन्क जातीतला हा सील आता जिवंत असण्याबद्दल काहीच पुरावे शिल्लक नाहीत.
३. थायल्यासीन
हा ‘टॅस्मानियन टायगर’ म्हणून ओळखला जाणारा हा प्राणी आहे. हा वेगळ्या प्रकारातील वाघ १९६० च्या आसपास लुप्त झाला. ऑस्ट्रेलिया, न्यू-गिनिया,टास्मानिया या भागात थायल्यासीन आढळून यायचा.
४. बाइजी
चीन मधील यांगझे नावाच्या प्राचीन नदीत हा विशिष्ठ प्रकारातील डॉल्फिन आढळून यायचा. मोठ्या प्रमाणावरील औद्योगीकरणामुळे हळूहळू ही प्रजाती लुप्त झाली. २००६ साली शोध मोहीम घेण्यात आली होती, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
५. क्युओग्गा
झेब्रा आणि घोड्याचं मिश्रण म्हणजे क्युओग्गा. हा अजब प्राणी १८७० सालापासून लुप्त होऊ लागला. या प्राण्याची एवढी शिकार झाली की याचा पूर्ण वंश नष्ट झाला.
६. पायरेनियन आयबेक्स (रानटी बोकड)
वाकडी शिंगे असलेला हा आयबेक्स २००० साली लुप्त झाला. या प्राण्याची फ्रांसमध्ये मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. वैज्ञानिक या प्राण्याचा शोध घेत आहेत.
७. जावा बेटावरील वाघ
हा वाघ फक्त इंडोनेशिया मधील जावा बेटावर आढळून यायचा. १९८० नंतर हा वाघ लुप्त झाला. जंगलतोड आणि शिकार ही दोन करणे यामागे असल्याचं म्हटलं जातं. आनंदाची बाब म्हणजे गेल्याच महिन्यात हा वाघ इंडोनेशियात आढळून आल्याचं म्हटलं जात आहे. याहा अनोखा प्राणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल अशी आपण अशा ठेवूया !!
८. पॅसेंजर कबुतर
असं म्हणतात की कोणी विचारही केला नव्हता की पॅसेंजर कबुतरांचा समूळ नाश होईल. पण जवळ जवळ २०० वर्षांपूर्वी शेतीसाठी जंगलतोड आणि शेतकऱ्यांकडून यांची केली गेलेली हत्या यामुळे पॅसेंजर कबुतर लुप्त झाले.
९. क्युबन मकाऊ (दक्षिण व मध्य अमेरिकेतील एक जातीचा पोपट)
क्युबामध्ये आढळून येणारे मकाऊ जंगलतोडीमुळे दिसेनासे झाले. १९९० च्या आसपास यांचा पूर्णपणे नाश झाला.
१०. डोडो
हा पक्षी मॉरीशासचा राष्ट्रीय प्राणी आहे. डोडो पक्षासारखा दिसत असला, तरी त्याला उडता येत नाही. त्यामुळे शिकारी सहज त्याची शिकार करू शकले. शेवटी मांसासाठी शिकार आणि जंगलतोडीमुळे हा प्राणी लुप्त झाला.