‘कथा तेलगीच्या विळख्याची’ : कोण होता तेलगी ? चला जाणून घेऊ तेलगी बद्दल !!

देशातील स्टॅम्प घोटाळ्याचा सूत्रधार ‘अब्दुल करीम तेलगी’ याचा २३ ऑक्टोबर २०१७ साली मृत्यू झाला. ‘अरुण हरकारे’ लिखित ‘कथा तेलगीच्या विळख्याची’ या पुस्तकातील एक महत्वाचं प्रकरण खास बोभाटाच्या वाचकांसाठी दोन भागांमध्ये प्रकाशित करत आहोत.

(लेखनाच्या सोईसाठी काही भाग अंशात्मक केला आहे)

तेलगी १९८० च्या दरम्यान बेळगावच्या खानापूर गावात एका झोपडीत राहत होता. मॅट्रिक झाल्यावर त्याने कॉमर्स हा विषय घेऊन बी. कॉम. व्हायचा प्रयत्न केला. आर्थिक ओढताणीमुळे तो नोकरी शोधत होता. नंतर त्याने रेल्वे स्टेशनवर केळी विकायला सुरुवात केली. तेलगी बोलायचा फार गोड. त्याची बोलण्याची, गिऱ्हाईक पटवण्याची पद्धत फार उत्तम होती.

तेलगी फळ घेऊन बंगलोरहून मुंबईला जाणाऱ्या गाडीत चढला. जवळ फळांची टोपली होती. प्रवाशांना तो सांगत होता, ‘ले लो ना साब, एकदम बढीया है. बिलकुल ताजे है. खाकर तो देखो. मीठ नाही होगा तो पैसा मत देना.’

एका प्रवाशाने त्याला बोलावलं. तेलगीची बोलण्याची, फळ विकण्याची पद्धत त्याला आवडली. त्याने पेरू घेतले आणि विचारलं, ‘ये ट्रेन में फल बेचते हो, कोई अच्छी नौकरी क्यो नहीं कर लेते ?’

‘नौकरी कहा मिलती है साब ?’ तेलगीने विचारले.

‘मिलेगी तो करोगे ?

‘क्यों नहीं साब ? जरून करेंगे.’

‘ठिक है, ये लो मेरा पता. मुंबई आजाओ, मै नौकरी दे दूंगा.’

काही दिवसांनी  तेलगी मुंबईला गेला. त्या माणसाचं कुलाब्याला लॉज होतं. त्याने तेलगीला लॉजमध्ये नोकरी दिली. पुढे त्याच्याच मुलीशी तेलगीने लग्न केलं.

काही वर्षांनी तो दुबईला गेला. तिथे नोकरी केली. नंतर काही हॉटेलात नोकरी केली. मग एका एजंटकडे जो तरुणांना अरब देशात पाठवायचा, त्याच्याकडे काम करायला सुरुवात केली.

 

तेलगीचा पुढील प्रवास प्रश्नोत्तरांनी बघू :

 

‘पण तेलगी तर जेलमध्येसुद्धा गेला होता ?’

‘हो, तो एजंट बनावट पासपोर्ट आणि व्हिसा तयार करायचा. अशाच एका खोटा व्हिसा तयार करण्याच्या केसमध्ये तेलगी पकडला गेला आणि त्याला जेलमध्ये जावं लागलं. तिथेच त्याला रामरतन सोनी भेटला.’

‘हा रामरतन सोनी कोण ?’

‘रामरतन सोनी स्टॅम्प पेपर विकणारा विक्रेता आहे. तो कोलकाता येथे स्टॅम्प विकायचा. सोनीने तेलगीची त्याचा एजंट म्हणून नेमणूक केली.’

‘म्हणजे ?’

‘तेलगीला सोनी स्टॅम्प द्यायचा. तेलगी ते विकायचा. त्या विक्रीवर तेलगीला दीड टक्का कमिशन मिळायचं. हे काम करत असताना तेलगीला स्टॅम्पची विक्री व ते तयार करण्याची पद्धत याची माहिती मिळत गेली.’

‘सोनिसोबत तो बरीच वर्ष होता ?’

‘नाही. १९९४ पर्यंत पुढे त्याने स्वतःचा धंदा सुरु केला. पण तो लगेच पकडला गेला. त्याच्याजवळ स्टॅम्प विक्रीचं लायसन्ससुद्धा नव्हतं. मुंबई पोलिसांनी त्याच्यावर केस केली.’

‘हे कोणत्या साली घडलं ?’

‘१९९५ साली.’

‘पण त्याच्याजवळ लायसन्स तर होतं ?’

‘हो. त्याने २० जानेवारी १९९४ मध्ये लायसन्स मिळवण्याचा अर्ज केला. मार्च ९४ मध्ये लायसन्स मिळालं. स्टॅम्प विक्री करण्याची जागा होती २९, पोलीस कोर्ट, फिने मॅन्शन, फोर्ट, मुंबई. हे लायसन्स मिळाल्यानंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरु केला पण बनावट स्टॅम्पची विक्री करताना पकडला गेला. पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्यामुळे १९९४ साली मिळालेलं लायसन्स कॅन्सल झालं.’

‘मग ? तेलगी प्रॉब्लेममध्ये आला असेल ?’

‘हो. त्यामुळे त्याला हा वेगळा मार्ग सुचला. कोणीतरी छापलेले स्टॅम्प आणायचे, ते विकायचे, त्यातलं थोडंफार कमिशन द्यायचं, परत पोलीस पकडतात. पण जी मुख्य व्यक्ती खोटे स्टॅम्प छापते ती कधीच सापडत नाही, हे त्याच्या लक्षात आलं. सगळ्यात जास्त फायदा बनावट स्टॅम्प छापून ते वितरण करणाऱ्याचा होतो हे तेलगीला समजलं. मग जेलमध्ये जर जायचंच आहे, रिस्क घ्यायचीच आहे, तर मोठी रिस्क का घेऊ नये ? हा विचार करून त्याने खोटे स्टॅम्प छापायचं ठरवलं.’

‘त्याला ते छापण्याची माहिती होती ?’

‘नाही. पण हे स्टॅम्प कोण छापतात हे माहित होतं. नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये काम करणारे निवृत्त झालेले माधव कुलथे यांच्याशी त्याने दोस्ती केली.’

‘या कुलथेशी त्याची दोस्ती कशी होती ?’

‘तेलगीने जयकिशन सिंग नावाच्या व्यक्तीला हाताशी धरलं. या जय्कीशांची नाशिकच्या प्रेस्माधल्या लोकांशी चांगली ओळख होती. त्याला घेऊन तेलगी नाशिकच्या नटराज हॉटेलमध्ये उतरला. जयकिशन याने तेलगी व कुलथे यांची ओळख करून दिली. कुलथे यांनी तेलगीला सांगितलं की, चांगले स्टॅम्प पेपर छापायचे असतील तर मशीन चांगली हवी. स्टॅम्प पेपर किंवा नोटा छापायची मशीन आपल्या देशात मिळत नाही. ती इम्पोर्ट करावी लागते आणि त्यासाठी शासनाची परवानगी लागते.’

तेलगीने बराच वेळ विचार केला आणि कुलथेला विचारलं, ‘समजा, ही मशीन सिक्युरिटी प्रेसवाल्यांनी मागवली आणि मला दिली तर ?’

‘ते कशाला मागवतील ? त्यांच्याजवळची मशीन चांगली आहे.’

‘पण समजा, प्रेसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मशीन खराब झाल्या आहेत तर ?’

समजा, मागवल्या. तरी त्या तुम्हाला देता येणार नाहीत.’

‘नव्या देता येणार नाहीत पण जुन्या ? बिघडलेली मशीन स्क्रॅपमध्ये विकत येते.’

‘ती पण विकत येत नाही साहेब.’

‘का ?’

‘त्यासाठी फार मोठं प्रोसिजर असतं. केंद्र सरकारची परवानगी लागते. बऱ्याच लोकांचे रिपोर्ट मागवावे लागतात.’

‘ती विकता येते की नाही हे कोण ठरवतं ?’

‘ते जनरल मॅनेजर ठरवतात.’

‘ठीक आहे. मग आपण जनरल मॅनेजरला सांगू.’

कुलथे हसला. हा जनरल मॅनेजरपर्यंत कसला पोहोचतो  आणि जनरल मॅनेजर याला कसला भेटतो असं त्याला वाटत होतं. पण तेलगीने सिक्युरिटी प्रेसमधल्या अधिकार्यान्च्शी ओळख वाढवायला सुरुवात केली. त्याच्या जाळ्यात अडकले वासिम शेख, रामचंद्र रेड्डी आणि शिवराज शर्मा. या कर्मचाऱ्यांनी त्याला सरकारी नियमांची माहिती दिली. जुन्या मशीन विकत घेण्याचा मार्ग सांगितला.’

‘तो कोणता ?’

‘मशीन एखाद्या व्यक्तीला मिळत नाही. पण कंपनीला विकत घेता येते. तेसुद्धा ती कंपनी टेंडर भरून हाय्येस्ट ठरली तर. हे समजताच तेलगीने जयकिशनला ‘युनिक एन्टरप्राईजेस’ नावाची कंपनी उघडायला सांगितली.’

‘स्वतः का उघडली नाही ?’

आधी तेलगीला पोलिसांनी अटक केली होती. तो रेकोर्डवरचा गुन्हेगार होता. तपासात ते समजलं असतं तर मशीन मिळाली नसती.’

‘पण मग छपाईचं काय ? त्यासाठी छपाईची माहिती असणारी व्यक्ती हवी.’

‘रामचंद्र रेड्डी याला याला मशीन, रंग व छपाईची चांगली होती. तो डाईज डिपार्टमेंटमध्येच काम करत होता. शिवराज शर्माला कागदाची माहिती होती. तो कुठे मिळतो, कोणत्या प्रकारचा हवा ही कामं शिवराज शर्मा बघणार होता.’

‘तेलगीची सिक्युरिटी प्रेसच्या जनरल मॅनेजरशी ओळख कशी झाली ?’

‘सिक्युरिटी प्रेसच्या लोकांकडून तेलगीला समजलं की, जनरल मॅनेजर गंगाप्रसाद यांना बऱ्याच दिवसांपासून प्रमोशन मिळत नव्हतं. ‘माझी मोठमोठ्या राजकारणातल्या लोकांशी ओळख आहे. मी तुमचं हे काम करू शकतो’, असं सांगून तेलगी गंगाप्रसाद यांना भेटला. गंगाप्रसाद यांच्यासाठी त्याने राम जेठमलानी यांच्याकडून एक पत्रही आणलं. राम जेठमलानी यांनी ते वित्तमंत्री यशवंत सिंह यांना लिहिलं होतं. त्यात गंगाप्रसाद यांच्या प्रमोशनविषयी प्रयत्न करावा असं लिहिलं होतं.’

‘हे पत्र दाखवल्यानंतर गंगाप्रसाद यांचा तेलगीवर विश्वास बसला असेल ?’

‘बसणारच. त्यानंतर तेलगी सांगेल ती कामं गंगाप्रसाद करायला लागले. कोटेशन कसं भरायचं, ते पास कसं होईल, वगैरे माहिती तेलगीला मिळाली. मग तेलगीने जयप्रकाशला ‘युनिक एन्टरप्राईजेस’ तर्फे प्रिंटींग आणि परफोरेटिंग मशीन मिळवण्याचं टेंडर भरायला सांगितलं.’

‘ते पास झालं असणार ?’

‘अर्थातच तीन लाख एकावन्न हजार रुपयांत तेलगीला चार प्रिंटींग आणि तीन परफोरेटिंग मशिन्स मिळाली. गंगाप्रसाद्च्या ओळखीने मशीनसोबत डाईजसुद्धा मिळवले.’

‘एवढ्या कमी किमतीत एवढ्या महत्वाच्या मशिन्स ?’

‘त्या स्क्रॅप झाल्या असं दाखवण्यात आलं. स्क्रॅप म्हणजे वापरता न येण्यासारख्या. म्हणून त्या लोखंडाच्या भावात देण्यात आल्या. त्याची थोडीफार दुरुस्ती करून तेलगीने त्या वापरायला सुरुवात केली.’

‘पण स्टॅम्प पेपर छापायला वेगळ्या प्रकारचा कागद लागतो ?’

‘हो. त्यासाठी कुलथेची मदत मिळत होती. कागदाची कुलथेला चांगली माहिती होती. सिक्युरिटी प्रेसमध्ये वापरतात तसाच १७ टन कागद तेलगीने अंबडच्या बच्छाव पेपर कन्व्हर्टर्सकडून घेतला. सिक्युरिटी प्रेसच्या गमिंग स्पेसिफिकेशनप्रमाणे चार टन गमिंग पेपर सिन्नरमधून मिळवला. मग मुंबईत मिंट रोडवर छापखाना सुरु केला. स्टॅम्प पेपर ठेवण्यासाठी भिवंडीला गोदाम घेतलं.’

‘आणि विक्री व्यवस्था ?’

‘त्यासाठी तरुण मुलांची भरती सुरु केली. जे आधी स्टॅम्प विकत होते त्यांना जास्त कमिशन मिळेल याची काळजी घेतली. नवीन मुलांना प्रशिक्षण दिलं, स्टॅम्प कुठे विकायचे, कसे विकायचे याचं मार्गदर्शन केलं.’

(‘क्रमशः’)

 

‘कथा तेलगीच्या विळख्याची’

प्रकाशक :

अरुण हरकारे

कुलस्वामिनी प्रकाशन,

ऋषभ अपार्टमेंट, गांधीनगर,

डोंबिवली (पूर्व)

दूरध्वनी : ९८३३४४१३८३

 

भाग २

सबस्क्राईब करा

* indicates required