वेगवेगळ्या ११ प्रकारचे हॉर्न वाजवते रेल्वे : त्यांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का ?
मंडळी रेल्वेचा प्रवास म्हणजे आपल्या बहुतांश भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक. नोकरीधंद्यासाठी म्हणा, भटकंतीसाठी म्हणा, देवदर्शनासाठी म्हणा किंवा लग्नासारख्या समारंभासाठी म्हणा... आपल्या प्रत्येक प्रवासाची सोबती ही रेल्वेच आहे. पण स्टेशनवर येण्याआधी आधी स्टेशन सोडण्या आधीच्या हॉर्न व्यतिरिक्त ती अजूनही वेगवेगळ्या तर्हेचे हॉर्न वाजवत असते, आपण ऐकतही असतो. पण कधी विचार केलाय का तुम्ही? की या हॉर्नच्या वेगवेगळ्या प्रकारांचा काय अर्थ असतो? काय म्हणता? नाही? मग चला ना पाहूया...
एक शॉर्ट हॉर्न
मोटरमनने एक लहान हॉर्न दिल्यास याचा असा अर्थ होतो की त्याला ट्रेनला यार्डमध्ये घेऊन जायचं आहे. जेणेकरून पुढच्या प्रवासासाठी ट्रेनला धुता येईल आणि तीची स्वच्छता करता येईल.
दोन शॉर्ट हॉर्न
जेंव्हा मोटरमन दोन लहान शॉर्ट हॉर्न देतो तेंव्हा तो गार्डला रेल्वेकडून सिग्नलसाठी विचारण्यासाठी सांगत असतो, जेणेकरून रेल्वे सुरू करता येईल. यावेळी रेल्वे स्टेशन सोडण्यासाठी तयार असते.
तीन शॉर्ट हॉर्न
आपल्याला तीन लहान हॉर्न हे फार कमी प्रमाणात ऐकायला मिळतील. हा इमर्जन्सी हॉर्न आहे. जेव्हा इंजिन मोटरमनच्या नियंत्रणाबाहेर जातं, तेव्हा मोटरमन तीन लहान हॉर्न देऊन रेल्वेगार्डला तात्काळ व्हॅक्युम ब्रेक लावण्याचा संकेत देतो.
एक लांब आणि एक लहान हॉर्न
एक लांब आणि एक लहान हॉर्न वाजवून मोटरमन गार्डला सांगत असतो की त्याने इंजिन सुरू होण्याआधी ब्रेक पाईप सिस्टम सेट करून घ्यावी.
दोन लांब आणि दोन लहान हॉर्न
दोन लांब आणि दोन लहान हॉर्न देऊन मोटरमन गार्डला इंजिन नियंत्रित करण्याचा संकेत देत असतो.
चार शॉर्ट हॉर्न
चार लहान हॉर्न दिल्यास समजून जा की रेल्वेमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि ती दुरूस्ती झाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही.
सलग लांब हॉर्न
जर रेल्वे काही वेळाकरीता सलग लांब हॉर्न करत असेल तर समजा की ती अनेक स्टेशन्स वर न थांबता पुढे जातेय.
समान पॉझ घेत दोन हॉर्न
रेल्वे दोनवेळा समान पॉझ घेत दोन हॉर्न देते. त्यावेळी येणार्या जाणार्या लोकांसाठी संकेत असतो की रेल्वे आता रेल्वे क्रॉसिंग वरून जाईल. कधी क्रॉसिंगजवळ थांबलात तर नक्की लक्ष देऊन ऐका.
दोन लांब आणि एक शॉर्ट हॉर्न
जेव्हा रेल्वे आपला ट्रॅक बदलते तेव्हा मोटरमन दोन लांब आणि एक लहान हॉर्न करतो.
दोन शॉर्ट आणि एक लांब हॉर्न
जेव्हा मोटरमन दोन लहान आणि एक लांब हॉर्न वाजवतो तेव्हा एखाद्या पॅसेंजरने चेन खेचलेली असते किंवा गार्डने व्हॅक्युम ब्रेक दाबलेला असतो.
सहा वेळा शॉर्ट हॉर्न
हा हॉर्न म्हणजे संकटसमयीची सूचना असते. ज्यावेळी रेल्वे एखाद्या कठीण परिस्थितीत अडकते, म्हणजे तुटलेला रूळ, किंवा रूळमार्गावर आलेले अन्य अडथळे.. तेव्हा हे सहा वेळा लहान हॉर्न दिले जातात.
या प्रत्येक हॉर्नमागचा अर्थ तुम्हाला समजला ना मंडळी ? मग पुढच्या वेळी प्रत्येक हॉर्न लक्ष देऊन ऐका.
आणि हो, माहिती आवडली तर शेअर करा आपल्या मित्रांसोबत...
आणखी वाचा :
'काला बकरा' ते 'सिंगापूर रोड' - भारतातील ११ मजेदार रेल्वे स्टेशन्स !!
टर्मिनस, सेन्ट्रल, जंक्शन मधला फरक माहित्ये का ?
शकुंतला रेल्वे : का बरे अजूनही भारतीय रेल्वे देते ब्रिटिश कंपनीला पैसे?
(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)
©बोभाटा