या गावात राहातो सँटाक्लॉज, जाणून घ्या हे गाव आहे कुठे आणि तिथे काय-काय आहे..
आपल्याकडे काही लहान मुलांना भेटी देणारा सँटाक्लॉज नसतो. आपण सरळ आपल्या आईबाबांकडे आपल्याला काय हवंय याच्या मागण्या करतो, काही वेळा धपाटे मिळतात तर काही वेळा कार्टी ऐकत नाहीत म्हटल्यावर पालक गपगुमान काय हवंय ते आणून देतात. अजून सँटा आपल्या घराघरांत पोचला नसला तरी मॉल्स आणि दुकानात तरी शिरलाच आहे. खात्यापित्या सँटाऐवजी पाप्याचं पितर असलेले देशी सँटा इवलुशी दाढी लावून लहान मुलांना चॉकलेट्स वाटतात ख्रिसमसच्या सुमारास जरा मोठ्या शहरांत आपल्याला दिसतीलच.
स्रोत
असं म्हणतात की परदेशांतल्या मुलांना सँटा हे प्रकरण नसतंच, त्याच्या नावाखाली आपले आईबाबाच आपल्याला गिफ्ट्स आणून देतात हे कळलं की भयानक धक्काबिक्का बसतो म्हणे. पण तुम्हांला माहित आहे का, हा सँटा खरोखरी पण असतो, त्याचं एक गांव आहे, त्याला रोज हजारोंनी पत्रं येतात आणि आपल्या रूपयाला जगात किंमत नसल्यानं अर्थातच भरपूर पैसे असतील तर तुम्हाला त्याला भेटता पण येतं?
नव्हतं ना माहित? चला, तर मग बोभाटासोबत सँटाच्या गावाची सहल करायला...
सँटाक्लॉज नेहमी येतो डिसेंबरात. उत्तर गोलार्धाच्या जवळ असणाऱ्या भागात तेव्हा खूप थंडी आणि हिम असतं. पण या सँटाच्या गावात बराच काळ थंडीच असते, कारण ते उत्तर ध्रुवाच्या बरंचसं जवळ आहे. फिनलंड देशातल्या रोवानेमी (Rovaniemi) या गावाकडे सँटाक्लॉजचं ऑफिशियल गांव असण्याचा मान जातो.
काय आहे या गावात?
या गावात राहातो गबदुल-लंबोदर सँटाक्लॉज. भरघोस पांढरीशुभ्र दाढी असलेला. तिथं त्याचं खास पोस्ट ऑफिसदेखील आहे. या सर्वांसोबत तुम्हांला रेनडिअरच्या गाडीतून फेरफटकाही मारता येतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावातून आर्क्टिक रेखादेखील जाते, म्हणजेच या रेषेपलिकडील भाग हा पृथ्वीचा अतिउत्तरेकडील भाग समजला जातो.
पर्यटकांसाठी तिथं सँटाक्लॉज पार्क बनवण्यात आलाय. काही हॉटेल्स इग्लूच्या आकारात आहेत. तिथं इतर गोष्टींसोबतच सँटाच्या विविध वस्तूही विकत घेता येतात. अतिउत्तरेकडचा भाग असल्यानं तिथं नॉर्दर्न लाईट्स देखील दिसतात. साधारणपणे ऑगस्टचा मध्य ते एप्रिलपर्यंतच्या १५० रात्रींना हा सोहळा पाहता येतो. नॉर्दर्न लाईट्स म्हणजे सौरवायू आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे आकाशात दिसणारी हिरवी-निळी विस्मयकारी प्रकाशकिरणं!!
या गावाची सुरूवात झालीय १९८५मध्ये आणि तेव्हापासून हे पर्यटकांचं एक आवडतं ठिकाण आहे. पूर्ण गावच पर्यटनासाठी सुसज्ज असल्यानं तुम्ही तिथं केव्हाही जाऊ शकता आणि सँटाला भेटू शकता. त्याच्यासोबत बरेच लोक व्हिडिओदेखील घेतात. आयुष्यभराच्या आठवणीसाठी!!
हो, पण सँटा नेहमीच त्याच्या घरात असेल याची काही शाश्वती नाही. बरेचदा तो गावात फेरफटका मारतो. तिथल्या लोकांना-मुलांना भेटतो.. पाहा या गावाचे काही फोटोज..
स्रोत
या संकेतस्थळावर या गावाबद्दल तुम्ही आणखी माहिती घेऊ शकता. ऐन ख्रिसमसच्यावेळी तिथं राहण्याचा खर्च दोन रात्रींसाठी ८०-९०हजारांच्या घरात जात असला तरी हौसेला मोल नसतं, नाही का? आणि असलं तरी ऑफ सीझन जाण्याचा पर्याय आपल्याकडे असतोच की..
तुम्ही जर या गावाला भेट देऊन आला असाल तर त्याचे फोटोज आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा..