पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित वेषभूषा
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे एक भारदस्त व्यक्तिमत्व. ते त्यांच्या पेहरावाकडे विशेष लक्ष देतात. वेगवेगळे रंग आणि फॅशन्स यांचं त्यांना वावडं नाही. त्यांच्या कुर्त्याची फॅशन ’मोदी कुर्ता’ म्हणून लोकप्रिय आहे. बरेचदा ते ज्या ठिकाणास भेट देतात, तिथल्या स्थानिक पेहरावाचा एखादा पैलू त्यांच्याही पोषाखात दिसून येतो. भारतीयांना राजकारणी लोकांना अशा तर्हेने पाहण्याची सवय नाही. त्यामुळे अर्थातच प्रियांका गांधींच्या फॅशन कोशंटची जशी चर्चा होते, तशीच ती मोदींच्या वेगवेगळ्या पोषाखाबद्दलही होते.
आज त्यांना पंतप्रधानपदी विराजमान होऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. बोभाटा टीमतर्फे त्यांना याप्रसंगी शुभेच्छा. पाहूयात दोन वर्षांत त्यांचे कोणकोणते पेहराव चर्चेत रंगले ते..
सियाचेन बेस कॅंप
सियाचीन बेस कॅंपवरच्या जवानांना भेट देताना मोदींचा एव्हिएटर लूक एकदम डॅशिंग होता. बर्फापासून संरक्षण करणारे गॉगल्स आणि लाल मफलरने पोषाखाची शोभा आणखीच वाढवली.
नेपाळदौरा
मोदींचं भगव्या रंगाबद्दलचं प्रेम जगजाहीर आहे. नेपाळच्या दौर्यात या रंगाला खास पसंती दिलेली दिसते. ही भगवी शाल ओबामांच्या भारतभेटीच्या वेळेसही वेगळ्या पेहरावावर पांघरलेली दिसून येते.
भूतान दौरा
भूतानचा दौरा हा पंतप्रधान म्हणून मोदींचा पहिला अधिकृत परदेशदौरा होता. तेव्हा त्यांनी खास भारतीय पेहरावात राजे जिग्मे सिंग्ये वांग्चुक आणि राणी जेत्सन पेमा यांची भेट घेतली. नुकतेच एका सामाजिक शाळेमध्ये मुलांसाठी स्वयंपाक करण्याच्या फोटोजमुळे राजे जिग्मे सिंग्ये वांग्चुक सोशल मिडियात चर्चेत होते.
चीन दौरा
चीनमधल्या टेराकोटा संग्रहालयाला भेट देताना पुन्हा एकदा मोदींनी शुभ्र पोषाखाला पसंती दिली. सोबत शाल आणि गॉगल्स घातलेला लूक बातम्यांमध्ये चर्चेत होता.
नमो शाल
जरा निरखून पाहिलंत तर या शालीवर एन.एम. अशी त्यांच्या नावाची आद्याक्षरे विणलेली आहेत. त्यांच्या नावाच्या सूटनंतर त्यांच्या नावाची शालही खाशी चर्चेत होती.
दहा लाखांचा सूट
जर सर्वात जास्त चर्चिला गेलेला मोदींचा पेहराव कोणता असा प्रश्न उपस्थित झाला तर त्याचं उत्तर एकच आहे - त्यांचं पूर्ण नाव अंगभर विणलेला हा दहा लाखांचा सूट. ओबामांच्या भारतभेटी दरम्यान पंतप्रधानांनी हा सूट घातला होता आणि प्रसारमध्यमांनी या सूटची विशेष दखल घेतली होती.