भारतीय सैन्यामध्ये महिला अधिकार्यांना कशाप्रकारे संबोधित केलं जातं? जाणून घ्या...
मंडळी, एकेकाळी चूल आणि मूल सांभाळत संसाराच्या रहाटगाडग्यात जिला गुरफटून ठेवलं जायचं, ती भारतीय स्त्री आता खर्या अर्थानं माणूस बनलीये. पुरूषांच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय महिला आज प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्याच बरोबरीने काम करतायत. मग ते क्षेत्र कोणतंही असो. याला आपलं संरक्षण क्षेत्र तरी कसं अपवाद असेल? आपल्या सेनेच्या तिन्ही दलांमध्ये भारतीय महिलांचा समावेश आहे. त्याचबरोबर देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची धुराही आज एक महिलाच सांभाळतीये!
सैन्यदलांच्या शिस्त-नियमांप्रमाणे जेव्हा एखादा पुरुष अधिकारी समोर असतो, तेव्हा त्याला 'साहेब' किंवा 'सर' म्हणून संबोधलं जातं. पण सैन्यदलात पुरुषांच्या मानाने आजही महिला अधिकार्यांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे प्रश्न हा पडतो की सैन्यामध्ये महिला अधिकार्यांना कशाप्रकारे संबोधलं जातं? चला आज जाणून घेऊया...
आर्मी
भारतीय भूसेनेला एक मोठा इतिहास आहे. त्यामुळे आपल्या परंपरांना सेनेकडून जास्त महत्व दिलं जातं. त्यामुळे इथं हे संबोधनांचे नियम थोडे किचकट आहेत.
* आर्मीमध्ये कधी स्त्री किंवा पुरुष असा भेद केला जात नाही. यामुळं एखादा जवान एखाद्या स्त्री अधिकार्याशी किंवा पुरुष अधिकार्याशी बोलताना 'सर' किंवा 'साहेब' हाच शब्द वापरेल. हा शब्द सैन्यात फक्त अधिकार्यांसाठी वापरला जातो.
* एक अधिकारी आपल्या सिनीयर महिला अधिकार्यासाठी 'मॅम' किंवा 'मॅडम' या शब्द वापरतो.
* एक अधिकारी आपल्या ज्युनियर महिला अधिकार्याला तिची रॅन्क आणि नावासोबत बोलावतो. उदा. लेफ्टनंट विशाखा, कॅप्टन दिपीका इ.
* जवान आपल्या अधिकार्यांच्या पत्नींना 'मेमसाहब' किंवा 'मॅडम' या शब्दाने बोलावतात. आणि अधिकारी आपल्या सहकारी अधिकार्यांच्या पत्नींसाठी 'मिसेस' या शब्दासोबत त्यांचं नाव वापरतो. उदा. मिसेस शर्मा, मिसेस अय्यर इ.
वायुसेना
भुसेनेप्रमाणे एअरफोर्समध्ये महिला अधिकार्यांसाठी 'साहब' किंवा 'मेमसाहब' हा शब्द वापरला जात नाही.
* एक ज्युनियर अधिकारी किंवा जवान आपल्या सिनीयर महिला अधिकार्यांना नेहमी 'मॅम' या शब्दाने संबोधतो.
* हवाईदलाचे सिनियर अधिकारीही आपल्या ज्युनियर महिला अधिकार्यांना त्यांची रॅन्क आणि नावासोबतच संबोधतात.
* सहकारी अधिकार्यांच्या पत्नींसाठी 'मिसेस' वापरलं जातं. आणि सिनीयर अधिकार्यांच्या पत्नींसाठी 'मॅम' हाच शब्द वापरला जातो.
नौदल
एअरफोर्सप्रमाणेच नेव्हीमध्येही महिला अधिकार्यांना 'साहब' किंवा 'मेमसाहब' म्हणायची पध्दत नाही.
* एका महिला अधिकार्याची ड्युटी क्वचितच जहाजांवर लागते. अशावेळी एखाद्या जवानाला महिला अधिकार्याला संबोधीत करण्याची वेळ आल्यास तो 'मॅम' हा शब्द वापरतो. हा शब्द न वापरताही बोलणं सुरू केलं जाऊ शकतं. पण सॅल्युट आणि 'जयहिंद' बोलणं हे आवश्यक आहे.
* नेव्हीमध्येही एक सिनीयर अधिकारी आपल्या ज्युनियर महिला अधिकार्यांना त्यांची रॅन्क आणि नावासोबत संबोधीत करतो.
* सहकारी अधिकार्यांच्या पत्नींसाठी 'मिसेस' सोबत त्यांचं नाव वापरलं जातं. एखाद्या तिसर्या अधिकार्याच्या पत्नीबद्दल बोलताना तिचं नाव न लावता 'मिसेस' सोबत त्या अधिकार्याचं नाव घेतलं जाईल याची विशेष काळजी नौदलात घेतली जाते.
नुकतंच देशाचं सरंक्षण मंत्रीपद निर्मला सितारामन यांनी स्विकारलंय. इंदिरा गांधींनंतर पहिल्यांदाच देशाच्या संरक्षण मंत्रीपदी एक महिला विराजमान झाल्यामुळे त्यांच्यासाठी कोणतं संबोधन वापरावं हा प्रश्न जवानांना पडला. त्यामुळे त्यांनी "आप मुझे रक्षा मंत्री कहिए" असं उत्तर देऊन जवानांचा गोंधळ दूर केला. इंदिरा गांधींना जवान 'मॅडम प्राईम मिनिस्टर' म्हणून संबोधायचे. कारण त्यावेळी त्या प्रधानमंत्री होत्या आणि संरक्षण मंत्रीपद त्यांनी आपल्याजवळ ठेवलं होतं.
मंडळी, या गोष्टी तशा साध्यासुध्या वाटत असल्या तरी सैन्यात या गोष्टींना अत्यंत महत्वाचं मानलं जातं. अशा गोष्टी सेनेच्या लिखीत नियमांमध्ये येत नाहीत. पण काळानुरूप तयार होत आलेल्या परंपरा सैन्य कसोशीने पाळत असतं...
जयहिंद!