computer

तुम्हाला 'खो-गो' औषध माहीतीये ? मग त्याबद्दल ही माहीतीही जरूर वाचा !!

खोकला म्हटल,  की जुन्या पिढीला एकच नाव आठवतं ते म्हणजे खो-गो. खोकला आणि खो-गो चं नातं म्हणजे सचिन आणि त्याच्या बॅटसारखंच आहे राव. हा महाराष्ट्रातला कदाचित सर्वात जास्त लक्षात राहिलेला ब्रँड असावा. खो-गो च्या काळ्या रंगातील गोळ्यांसारखेच लक्षात राहिली ते खो-गो च्या जाहिरातींमधली व्यंगचित्रे. व्यंगचित्राच्या मार्फत जाहिरात करण्याची आयडिया इतक्या कुशलतेने आणखी कोणी वापरलेली आमच्या तरी बघण्यात नाही राव.

चला तर आज आपल्या मराठी मातीतल्या खो-गो बद्दल माहित नसलेल्या ८ गोष्टी जाणून घेऊया....

१. खो-गो हे ‘अहिल्या आयुर्वेदिक औषधालय’ या कंपनीचं प्रॉडक्ट आहे. ही कंपनी ५५ वर्ष जुनी आहे आणि तिची स्थापना ‘मुरलीधर महादेव रेडकर’ यांनी केली होती.

२. मुरलीधर रेडकर यांनी आयुर्वेदाचा सखोल अभ्यास केल्यानंतर आरोग्याला गुणकारी ठरतील अशी औषधं तयार केली. या औषधांची किंमत सर्वसामान्यांना परवडण्यासारखी असल्याने ती जास्त लोकप्रिय झाली.

३. खो-गो पहिल्यांदा बाजारात आलं ते १९६१ सालच्या दरम्यान. नावातच खोकल्याला घालवण्याचं आश्वासन असल्याने हे नाव लोकांच्या चांगलंच लक्षात राहिलं.

४. सुरुवातीच्या काळात गिरगाव येथील लहानशा मेडिकल शॉपमधून ‘खो-गो’ विकलं जायचं. पुढे लोकांच्या पसंतीस उतरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्भर याचा प्रसार झाला.

५. खो-गो ची खासियत असलेल्या व्यंगचित्रांमागील कल्पना जेष्ठ कार्टूनिस्ट ‘अशोक पत्की’ यांची होती.

६. अहिल्या आयुर्वेदिक औषधालय’ कंपनीच्या ‘लोगो’वर राम व अहिल्या आहेत.

या लोगो मागील अर्थ असा की, ज्या प्रकारे रामाने अहिल्याला शापापासून मुक्त करत शिळेतून मानव रुपात आणले, तसेच या कंपनीतून तयार झालेल्या आयुर्वेदिक औषधांनी सर्वांना निरोगी आणि उदंड आयुष्य मिळावे. 

७. खो-गो शिवाय अहिल्या आयुर्वेदिक औषधालयचे कफ पिल्स, कफ सिरप, हाजमोला गोळ्या, पेन बामसारखी उत्पादनं बाजारात आहेत. पण यात सर्वात जास्त हिट ठरलं ते खो-गो.

८. मुरलीधर रेडकर यांच्या नंतर आता तिसरी पिढी अहिल्या आयुर्वेदिक औषधालय पुढे चालवत आहे.

काय राव...खो-गो च्या लहान लहान गोळ्यांमागे एवढ्या माहित नसलेल्या गोष्टी आहेत हे तुम्हाला वाटलं तरी होतं का ?

सबस्क्राईब करा

* indicates required