वाचा बडोद्याच्या महाराजांनी बनवलेल्या रत्नजडित 'पर्ल कार्पेट'ची ऐतिहासिक कहाणी !!

राजे महाराजे आणि त्यांचे ऐषआरामांचे  अनेक किस्से सांगितले जातात. राजांची शान-ओ-शौकत, खजिने, भरजरी कपडे, दागिने इत्यादी गोष्टी त्या काळात आणि आजच्या काळातही चर्चेचा विषय आहेत. अशा एका राजाची आणि त्याच्या शाही पसंतीची ही गोष्ट.

१८५६ ते १८७० काळातले बडोद्याचे 'राजे खंडेराव गायकवाड' यांना दागिन्यांची भारी आवड होती. त्यांना आवडलेला दागिना ते कोणत्याही किमतीत खरेदी करत, मग तो देशी असो व विदेशी. एकदा का त्यांची नजर एखाद्या रत्नावर पडली, की ते त्याला आपल्या संग्रहात सामील करून घ्यायचेच. दागिने बनवणारी खास माणसं त्यांच्या दरबारात होती.

स्रोत

या खंडेरावांना इस्लाममध्ये अधिक रस होता. ते स्वतः हिंदू असूनही त्यांना इस्लामबद्दल आस्था होती. इस्लामची शिकवण त्यांना आवडायची. म्हणूनच त्यांनी मदिनामध्ये असलेल्या मोहम्मद पैगंबरांच्या समाधिस्थळाला एक गालिचा भेट देण्याची शपथ घेतली. साधा गालिचा असता तर लगेच त्यांनी पाठवला देखील असता, पण आपली शान आणि आवडीनुसार त्यांनी या गालीच्याला शाही रूप द्यायचं ठरवलं होतं. हा गालिचा चक्क लाखो मोत्यांनी सजवलेला असावा असं स्वप्न त्यांनी बघितलं होतं.

स्रोत

त्यांच्या स्वप्नाप्रमाणे हा गालिचा १९६० ते १९६५ काळात तयार झाला. राजाला शोभेल असाच हा गालिचा होता. या गालिच्याची लांबी 8 फूट 8 इंच आणि रुंदी 5 फूट 8 इंच होती. सोने, हिरे, माणके वापरून गालिच्यावर नक्षीकाम करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर या गालिच्याची खास ओळख असलेले तब्बल १५ लाख अस्सल बसरा मोती देखील यावर जडवले होते. हे बसरा मोती इराण, कतार आणि बहरीनवरून खास मागवण्यात आल्याचं म्हटलं जातं. बसरा मोती वापरून तयार केलेला यासारखा दुसरा गालीचा नाही. गालिचा तयार करण्यासाठी लागलेलं कारागिरांचं कसब यातून दिसून येतो.

एका धार्मिक निमित्ताने सुरुवात झालेला हा गालिचा १९ व्या शतकातील नक्षीकाम आणि भरतकामाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो. जगभरात याला ‘पर्ल कार्पेट ऑफ बडोदा’ म्हणून ओळख मिळाली आहे.

स्रोत

त्या काळात सुफी संत आणि दर्ग्यांना महागड्या गोष्टी भेट देण्याची मोठी लाट आली होती. यात मुस्लीम राजकर्ते अर्थातच सर्वात पुढे होते. पण पर्ल कार्पेटच्या बाबतीत जरा वेगळं होतं. बसरा मोतींनी जडावलेला गालिचा एका हिंदू राजाने तयार केला होता आणि तोही चक्क पैगंबरांच्या समाधी स्थळासाठी.

असं म्हणतात की हा गालिचा खंडेराव जिवंत असेपर्यंत मदिनाला पोहोचू शकला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर पुढच्या पिढीने गालीच्याला मदिना पर्यंत पोहोचवण्याचं कामच केलं नाही. त्यामुळे तो भारतातच राहिला. पुढे बडोद्याचे शेवटचे राजे प्रतापसिंगराव गायकवाड यांनी आपला संपूर्ण खजिना अतिश्रीमंतांचा देश म्हणून ओळखला जाणाऱ्या मोनॅकोला नेला. या खजिन्यात हा पर्ल कार्पेट देखील होता.

महाराजा प्रतापसिंग गायकवाड (स्रोत)

प्रतापसिंगांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नी सीतादेवींकडे हा गालिचा गेला. याच सीतादेवींच्या उधळ्या स्वभावामुळे पुढे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं आणि त्यांनी आपल्याकडील खजिन्यातील एक एक मौल्यवान हिरेजवाहरात, दागिने विकण्यास सुरुवात केली. यात प्रिन्सी नावाचा एक अद्वितीय गुलाबी हिरा आणि पर्ल कार्पेटदेखील होता. यानंतर गालिचा वेगवगेळ्या लिलावात फिरत राहिला आणि चर्चेचा विषय बनला. २००९ साली हा गालिचा एका लिलावात ५० लाख डॉलरला विकला गेल्याची बातमी आली होती. पण हा पर्ल कार्पेट नेमका कोणाकडे आहे याची माहिती कोणालाच नाही.

खंडेराव गायकवाडांनी जे स्वप्न बाळगून हा अप्रतिम गालिचा तयार केला होता त्याचा असा लिलाव व्हावा ही शोकांतिकाच म्हणावी लागेल !!

 

आणखी वाचा :

प्रिन्सीची कथा...एका राजपुत्राची शोकांतिका !!

रक्तरंजित सूडाची कहाणी...भाग एक !!!

रक्तरंजित सूडाची कहाणी...भाग दोन !!!

सबस्क्राईब करा

* indicates required