वाठार आणि आदर्की स्टेशनच्या नावांच्या इतिहासाचा मेसेज फॉरवर्ड करताय ? थांबा आणि खरी कथा जाणून घ्या...
सध्या वाठार आणि आदर्की स्टेशन्सच्या बाबतीत एक खोटा मेसेज व्हॉट्सअपवर फिरतोय. या मेसेजमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे वाठार स्टेशनचं नाव तिथे असलेल्या Water station म्हणजे पाणी भरण्याच्या ठिकाणावरून तयार झालं आहे, तर आदर्की स्टेशनचं नाव Other key या इंग्रजी नावाचा मराठी अपभ्रंश होऊन तयार झाल्याचं दिलं आहे. त्याचबरोबर हा मेसेज हेही सांगतो की इंग्रज आल्यानंतर इथे लोकवस्ती तयार झाली. हा अजब शोध ज्याने लावला, त्याने नक्कीच इतिहास वाचलेला नाही.
व्हायरल पोस्ट
आज जाणून घेऊया या वाठार आणि आदर्कीचा खरा इतिहास...
खरं तर वाठार आणि आदर्की भागांची नावं ही शिवाजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात आहेत. या संदर्भात पुरावे असलेल्या काही गोष्टी पुढीलप्रमाणे...
१. इतिहास बघण्याआधी जर तुम्ही वाठार आणि आदर्की भागातले वाडे-विहिरी बघितल्या, तरी तुम्हाला समजेल की या पुरातन वास्तू अंदाजे ३०० ते २०० वर्ष जुन्या आहेत. म्हणजेच इंग्रजांच्या काळापूर्वी पासून त्या अस्तित्वात आहेत.
२. आदर्कीबद्दल इतिहासाचार्य राजवाडे यांच्या “मराठ्यांच्या इतिहासाची साधने - खंड ७” मध्ये माहिती मिळते ती अशी : “धनाजी जाधवांचे मृत्युनंतर व १७१० च्या पावसाळ्यानंतर बाळाजी विश्वनाथ व चंद्रसेन जाधवांची नीरेवर लढाई झाली. (त्यानंतर) बाळाजी पांडवगडवरून सातार्यास शाहूकडे आला व चंद्रसेन फितून १७११ च्या प्रारंभी कोल्हापुरास जाण्याच्या बेतात होता. इतक्यात शाहूंच्या आज्ञेवरून हैबतराव निंबाळकर चंद्रसेनावर चालून आला व त्या दोघांची लढाई आदर्कीच्या घाटाखाली १७११ च्या मार्च-एप्रिलात झाली“
३. वाठार या नावाचा उल्लेख इतिहासात 'वठ्ठरिका' म्हणून आढळतो. माधववर्मा याच्या ताम्रपटातील (इसवी सन. ४९० ते ५३५) 'वठ्ठरिका' या प्राचीन गावावरूनच वाठारचे नाव पडले आहे. तसेच माधववर्माच्या ताम्रपटात बेलवडेचा उल्लेख बेलवाटिका असा येतो. याशिवाय छत्रपती संभाजीरजांचे पुत्र, छ. शाहूराजे (पहिले) यांनी वाठार गावची निमपाटीलकी भोईटे घराण्याला दिली होती असा इतिहासात उल्लेख आहे.
४. मेसेजमध्ये उल्लेख केलेला वाठार हा भाग साताऱ्याजवळ आहे. पण खरं तर वाठार नाव असलेलं आणखी एक गाव कराडजवळ आहे. पण या गावाबाद्दलही माहिती काढली असता समजतं की या गावाचं नावही Water station वरून पडल्याची माहिती जुळत नाही.
एकंदरीत व्हॉट्सअप वरून खोटा इतिहास पसरवला जात आहे. त्यामुळे असे मेसेजेस फॉरवर्ड करण्याआधी माहिती पडताळून पहा. आणि पुढे कोणी असा मेसेज फॉरवर्ड करू नये म्हणून आमची पोस्ट शेअर करा.