'जेसीबी' या नावा मागची खरी गोष्ट माहित आहे का ?
मंडळी, रस्त्यावर खड्डे खोदण्यापासून ते खड्ड्यातील माती ट्रक मध्ये लोड करण्यापर्यंत जेसीबी ची मदत घेतली जाते. पिवळ्या रंगातील मशीन आणि त्याचा तो अवाढव्य पंजा दगड, माती, अवजड सामान इत्यादी अगदी सहज उचलतो. काही वेळा तर या मशीनची भीतीच वाटते. आता ही अवाढव्य मशीन काय आहे हे जर कोणाला विचारलं तर तो सहज म्हणेल, “हा तर ‘जेसीबी’ आहे.” पण मंडळी या मशीनचं नाव ‘जेसीबी’ का पडलं आणि मुळात या मशीनचं नाव ‘जेसीबी’चं आहे का ?
चला आज जाणून घेऊ या ‘जेसीबी’ नावामागील तथ्य :
पूर्वी टूथपेस्ट म्हटलं की ‘कोलगेट’ चं नाव घेतलं जायचं. चॉकलेट म्हटलं की ‘कॅडबरी’. अगदी हेच जेसीबी’ च्या बाबतीत झालेलं आहे.
जे. सी. बी. चा अर्थ आहे ‘जोसेफ सिरील बामफोर्ड’. ‘जे. सी. बामफोर्ड एक्सावेटर्स लिमिटेड’ ही कंपनी जेसीबी नावाने उत्खनन करणारी मशीन विकते. मंडळी ही जी मशीन आपण बघतो ती जगातील पहिली अशी मशीन आहे जिला खरं तर नावच नाव नाही. त्यामुळे मशीनवर दिसणारं कंपनीचा लोगोचं मशीनची ओळख बनला आहे.
इथूनच खोदकाम करणाऱ्या या मशीनला ‘जेसीबी’ म्हटलं जाऊ लागलं.
जेसीबी हे नावही पूर्णपणे त्या मशीनला दिलेलं नाही. हे नाव त्यात असणाऱ्या इंजिनचं आहे. १९४५ साली जोसेफ सिरील बामफोर्ड यांनी या इंजिनचा शोध लावला. त्यावेळी या इंजिनला नाव काय द्यायचं या बद्दल खूप विचार करूनही एक ठराविक नाव त्यांना मिळालं नाही. शेवटी जोसेफ यांच्या पूर्ण नावाचं संक्षिप्त रूप या इंजिनला आणि मशीनला देण्यात आलं.
भारत आणि जेसीबी संबंध :
भारताचं आणि ‘जेसीबीचं’ नातं फार पूर्वीपासूनचं आहे. ही पहिली खासगी ब्रिटीश कंपनी आहे जिने पहिल्यांदा भारतात कारखाना उभारला. आजच्या घडीला या कंपनीतून निघालेल्या मशीन्स सर्वात जास्त भारतातून निर्यात केल्या जातात. त्याच बरोबर भारतात उत्खानानासारख्या कामासाठी सर्वात जास्त मागणी जेसीबीचीच असते. अश्या प्रकारच्या मशीनची ओळख आजही ‘जेसीबी’ अशीच आहे.
जे. सी. बामफोर्ड एक्सावेटर्स लिमिटेड कंपनी बद्दल थोडं :
‘जे. सी. बामफोर्ड एक्सावेटर्स लिमिटेड’ १९४५ साली स्थापन झाल्यानंतर आज पर्यंत त्यांचे ३०० वेगवेगळ्या मशिनरी बाजारात आहेत. या कंपनीचे एकूण १८ कारखाने ब्रिटन, जर्मनी, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत, चीनमध्ये विखुरलेले आहेत.
एक गमतीशीर गोष्ट म्हणजे जेसीबी हा जगात पहिलाच असा ब्रँड आहे ज्याचा ट्रेडमार्क रजिस्टर करण्यासाठी ६५ वर्ष जावी लागली. २००९ साली जेसीबी चा ट्रेडमार्क रजिस्टर झाला. आणखी एक रंजक बाब म्हणजे या कंपनीने मशीनला दिलेला रंग हा १९४५ पासून पिवळाच आहे.
पिवळा रंग :
हा रंग पिवळाच का या मागे देखी एक तर्क आहे. उद्योग क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या रंगांच्या मागे एक ठराविक कारण असतं. आणि हा पिवळा रंग त्यातल्याच एका कारणासाठी कायमस्वरूपी घेतला गेला आहे. पिवळ्या रंगाचा अर्थ हा धोक्याचं चिन्ह म्हणून वापरला जातो. उदा. विषारी पदार्थ, विषारी वायू इत्यादी दाखवण्यासाठी तसेच जीवित किंवा संपत्तीच्या संभाव्य धोक्यासाठी देखील पिवळा रंग वापरला जातो. तुम्ही जर बघितलत तर 'नैसर्गिक वायू'च्या (Hydrocarbon Gas) पाईपला सुद्धा पिवळा रंग दिलेला असतो. याच कारणांसाठी जेसीबी कंपनीने देखील याच रंगाचा स्वीकार केला आहे.
तर असा आहे जेसीबी या नावा मागचा इतिहास...