चहाची किंमत १० आणि कमाई तब्बल १२ लाख....पुण्याच्या चहावाल्याची यशोगाथा वाचली का ??
चला आज एका अश्या चहावाल्याला भेटूया जो यशस्वी तर आहेच पण आपल्या चहाच्या विक्रीतून महिन्याला लाखोंची कमाई सुद्धा करतोय. आम्ही नरेंद्र मोदींबद्दल बोलत नाहीए बरं का....हा चहा विक्रेता पुण्याचा असून त्याचं शिक्षण अगदी जेमतेम आहे, पण त्याची कमाई बघता तो कोण्या बड्या कंपनीच्या मालकापेक्षा कमी नाही भौ.
चला तर आज भेटूया ‘येवले टी हाऊस’ च्या मालकांना आणि जाणून घेऊया त्यांची यशोगाथा !!
येवले टी-हाऊस हे नाव काही दिवसात इंटरनॅशनल ब्रँड म्हणून प्रसिद्ध झालं तर वावगं ठरणार नाही, कारण येवले बंधू आपल्या टी-हाऊस ची जी बडदास्त ठेवत आहेत तो प्रत्येक व्यावसायिकासाठी जणू एक धडा बनला आहे.
नवनाथ येवले आणि त्यांचे चार भाऊ मिळून पुण्यात चहा विक्रीचा व्यवसाय करतात. नवनाथ येवले यांनी ANI ला दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय की त्यांना चहाचा व्यवसाय आणि आपला एक ब्रँड तयार करण्याची कल्पना २०११ साली आली. आज पुण्यात ‘येवले टी-हाऊस’ च्या ३ शाखा आहेत. इतर चहा विक्रीच्या केंद्राप्रमाणे इथे चहा बरोबर कॉफी आणि चहाचे इतर प्रकार मिळत नाहीत. इथे फक्त आणि फक्त दुधाचा फक्कड चहा’च’ मिळतो. त्याची किंमतही प्रत्येकाच्या खिश्याला परवडेल अशीच आहे. फक्त १० रुपये.
मंडळी, याच १० रुपयाच्या चहाच्या विक्रीतून नवनाथ येवले हे महिन्याला तब्बल १२ लाखांची कमाई करत आहेत. पुण्यात चहा म्हटलं की येवले टी हाऊस हे समीकरण आता तयार झालेलं आहे. याची आणखी एक बाजू अशी की या व्यवसायातून नवीन रोजगार निर्मिती देखील होत आहे. सध्या येवले टी हाऊसच्या प्रत्येक ब्रांच मध्ये १२ कर्मचारी काम करत असून दुकानाच्या यशामध्ये त्यांचाही तेवढाच वाटा आहे. या यशाचं आणखी एक गमक म्हणजे येवले बंधूंनी ठरवलेली आपली उद्दिष्टे.
१. ग्राहकाशी विश्वासाचे नाते.
२. बाजारपेठेत गुणवत्तापूर्ण असे स्वतःचे वेगळे स्थान.
३. उत्कृष्ठ, प्रामाणिक व विनम्र सेवा प्रदान करणे.
याबरोबर येवलेंचा एक फोर्मुला सुद्धा आहे मंडळी. कामगार-१२, काम-१२ तास आणि कमाई-१२ लाख. हा १२ चा पाढा येवले टी-हाऊसच्या पाथ्यावर पडला आहे. भविष्यात 'येवले टी-हाऊस' ला एक अंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून समोर आणणार असल्याचं निलेश येवले म्हणाले.
एकंदरीत एका व्यवसायला यशस्वी करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते ती सर्व येवले बंधूंनी अंगिकारली आहेत असच म्हणावं लागेल. येवले आणि त्यांचं ‘येवले टी-हाऊस’ आज त्यांच्या कामातून दाखवून देत आहे की ‘कोणतंही काम छोटं नसतं’. यातून अनेकांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही.