computer

शनिवार स्पेशल : आयफेल टॉवर बद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी !!

जगप्रसिद्ध वास्तूंची जर यादी काढली तर त्यात आयफेल टॉवर हा पहिल्या ५ मध्ये सामील आहे. देखणं शहर पॅरीस मधली ही जगप्रसिद्ध वास्तू सर्वांनाच आकर्षित करते. मंडळी, आज आयफेल टॉवर बद्दल सांगण्याचं निमित्त म्हणजे आजच्याच दिवशी ३१ मार्च, १८८९ रोजी आयफेल टॉवरचं उद्घाटन करण्यात आलं होतं. तुम्हाला कदाचित माहित नसेल, आयफेल टॉवर एकेकाळी जगातील सर्वात उंच इमारतींमध्ये गणला जात होता. पुढे जाऊन आयफेल टॉवरच्या तोडीच्या अनेक इमारती आणि वास्तू उभ्या राहिल्या पण आयफेल टॉवरने आपली जादू गमावली नाही.

आज १२९ वर्षांनी देखील पॅरीस म्हणजे आयफेल टॉवर आणि आयफेल टॉवर म्हणजे पॅरीस हे सूत्र कायम आहे. चला तर आज पाहूयात या जगप्रसिद्ध वास्तूबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी.

१. फ्रेंच राज्यक्रांतीच्या निमित्ताने

१७८९ रोजी फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली. या घटनेला १८८९ साली १०० वर्ष पूर्ण होणार होती. १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ फ्रेंच सरकारने एक महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं. फ्रेंच सरकारची या महोत्सवाच्या केंद्रस्थानी एक टॉवर उभारायची कल्पना होती. यासाठी त्यांनी एक स्पर्धा भरवली आणि लोकांकडून टॉवरचं डिझाईन मागवलं. अनेक स्पर्धकांनी अर्ज दाखल केले. यातून गुस्तव आयफेल यांचं डिझाईन निवडण्यात आलं आणि अश्या पद्धतीने या देखण्या टॉवरची निवड झाली. हे डिझाईन ज्या व्यक्तीचं होतं त्यांचच नाव टॉवर ला देण्यात आलं.

२. आयफेल टॉवर बनण्यासाठी किती वर्ष लागली ?

आयफेल तोवर तयार होण्यासाठी २ वर्ष, २ महिने आणि ५ दिवसांचा कालावधी लागला होता. २८ जानेवारी, १८८७ पासून टॉवरच्या निर्मितीला सुरुवात झाली आणि त्याचा शेवट १५ मार्च १८८९ साली झाला. असं म्हणतात की पॅरीसमधल्या इतर सुंदर वास्तूंच्या तुलनेत आयफेल टॉवर सर्वात जलद तयार झाला आहे.

३. पर्यटक

३१ मार्च, १८८९ सालापासून आयफेल टॉवर लोकांसाठी खुलं झालं. त्यादिवसापासून आज पर्यंत तब्बल २५ कोटी लोकांनी आयफेल टॉवर बघितला असून दरवर्षी ७० लाख माणसं येत असतात. यातील ७५ टक्के लोक हे देशाबाहेरून आलेले असतात. यावरून तुम्हाला आयफेल टॉवरच्या लोकप्रियतेची कल्पना येईल.

४. सर्वात उंच इमारत

९८६ फुट उंच आयफेल टॉवर हा १९३० पर्यंत जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखला जायचा. १९३० साली न्यूयॉर्क मध्ये 'क्रिसलर बिल्डींग' (१०४३ फुट उंच) तयार झाली आणि आयफेल टॉवर दुसऱ्या क्रमांकावर गेला. मग क्रिसलर बिल्डींग ला मागे टाकण्यासाठी आयफेल टॉवरच्या टोकाला ऍन्टीना जोडण्यात आला आणि आयफेल टॉवर पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचला.

५. जगातील सर्वात मोठी जाहिरात

आज जाहिराती चिकटवण्यासाठी लोकांचं लक्ष जाईल अशा सगळ्या जागा हेरल्या जातात. मग यातून आयफेल टॉवर कसा सुटेल. १९२५ ते १९३६ काळात आयफेल टॉवरवर देखील मोठी जाहिरात लावण्यात आली होती. ही जाहिरात  होती Citroën या मोटार कंपनीची. लाखो बल्बच्या सहाय्याने १०० फुट लांबीची अक्षरे तयार करण्यात आली होती. ही त्याकाळातील सर्वात मोठी जाहिरात होती जी आयफेल टॉवर पासून जवळजवळ ३२ फुट अंतरावरूनही पाहता येण्यासारखी होती.

६. आत्महत्या आणि आयफेल टॉवर

आयफेल टॉवर आणि आत्महत्या हे एक वेगळं गणित आहे. तब्बल ३४९ लोकांनी आज पर्यंत आयफेल टॉवरवरून आत्महत्या केली आहे. यातील काहींनी गळफास घेतला तर काहींनी उडी मारून जीव दिला.

७. आयफेल टॉवरचा रंग

आज आयफेल टॉवरला स्वतःचा असा खास तपकिरी रंग आहे. हा रंग त्याच्या जन्माच्या वेळी नव्हता. टॉवर जेव्हा तयार झाला तेव्हा त्याचा रंग लालसर तपकिरी होता. पुढे दहा वर्षांनी हा रंग बदलून पिवळा रंग देण्यात आला. पुढील अनेक वर्ष आयफेल टॉवर हा पिवळा होता. शेवटी आजच्या घडीला असलेला त्याचा तपकिरी रंग मिळवायला आणखी काही वर्ष जावी लागली.

८. आयफेल टॉवर आणि स्टॅच्यु ऑफ लिबर्टी मध्ये असलेला संबंध

१८७९ रोजी स्टॅच्यु ऑफ लिबर्टी बनवणाऱ्या डिझाईनर पैकी एकाचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी गुस्तव आयफेल यांची निवड करण्यात आली. ज्या हातांनी आयफेल टॉवर उभारला त्यांनीच स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या निर्मिती मध्ये हातभार लावला होता.

९. थंडीत आयफेल टॉवरवर होणारा परिणाम

एका अभ्यासानुसार थंडीच्या दिवसात आयफेल तोवर ६ इंचने आकुंचन पावतो.  

१०. आयफेल टॉवर आणि दुसरं महायुद्ध

१९४० साली जेव्हा पॅरीस नाझी सैनिकांच्या ताब्यात गेलं तेव्हा फ्रेंच सैनिकांनी आयफेल टॉवरच्या लिफ्टचे केबल कापून काढले होते जेणेकरून हिटलरच्या नाझी सैन्याला आयफेल टॉवरवर चढून स्वस्तिक फडकावत येऊ नये. १९४४ साली जेव्हा जर्मनी युद्ध हरणार हे जवळजवळ निश्चित झालं होतं तेव्हा हिटलरने पॅरीस आयफेल टॉवर सहित जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते पण फ्रेंच मिलिटरी गव्हर्नरने हिटलरचा आदेश पाळला नाही. तो आदेश पाळला गेला असता तर आज आयफेल टॉवर फक्त इतिहासाच्या पुस्तकात बघायला मिळाला असता.

 

स्रोत

मंडळी आयफेल टॉवर आणि भारताचाही एका अनोखा संबंध आहे. भारतातले अनेक सिनेमे आयफेल टॉवरच्या आसपास चित्रित झाले आहेत. यात शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांचा "एन ईवनिंग इन पेरिस" हा सिनेमा पहिला म्हणता येईल. त्याच बरोबर आणखी एक नाव म्हणजे कंगनाचा "क्वीन" सिनेमा. याबरोबर अनेक गाणी आणि छोट्या मोठ्या दृश्याने आयफेल टॉवर भारतीय चित्रपटात दिसला आहे. त्यामुळे आयफेल टॉवरने भारतीयांनाही भुरळ घातली आहे यात शंका नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required