चायनीज अलिबाबा : एका चायनीज कंपनीने चक्क ‘अलिबाबा’ नाव का घेतलं ? माहित आहे का ?
अलिबाबा आणि चाळीस चोरांची गोष्ट तर तुम्ही ऐकली असेलच. त्यातील ‘खुल जा सिम सिम’ हा मंत्र तर आपल्याला तोंडपाठ असतो. अलिबाबा आणि त्याची कथा भारतीय आहे असा अनेकांचा समज आहे पण खरं तर ही अरब कथा आहे. अरेबियन नाईट्सच्या कथा संग्रहातली ती एक कथा आहे.
अरेबियन नाईट्स हे जगभरात गाजलेलं आहे. त्यातील अनेक कथा जशा भारतात प्रसिद्ध आहेत तशाच जगभरात प्रसिद्ध आहेत. अलिबाबाची कथा सुद्धा अशीच जगभर फिरलेली आहे राव. या कथेने चीन मधल्या एका कंपनीच्या मालकाला प्रभावित केलं आणि त्याने थेट आपल्या कंपनीचं नावच ठेवलं ‘अलिबाबा’.
ही गोष्ट आहे अलिबाबा या चीन मधल्या एका बलाढ्य कंपनीची. अलिबाबा म्हणजे एकप्रकारे चीनची अमेझॉन कंपनी आहे. या अलिबाबा कंपनीचं नाव ऐकलं की चीन आणि अलिबाबाचा काय संबंध असा प्रश्न आपल्याला पडतो. त्याचं काय आहे ना, अलिबाबा आणि चाळीस चोर या कथेपासून प्रेरित होऊनच कंपनीला हे नाव मिळालं. याबद्दल ‘जॅक मा’ या अलिबाबा कंपनीच्या मालकांनी पुढील कथा सांगितली.
चीनी अलिबाबा असा जन्मला
जॅक मा एकदा सॅन फ्रान्सिस्को येथे एका कॉफी शॉप मध्ये बसले होते. त्यांनी कॉफी देणाऱ्या वेट्रेसला विचारलं, ‘तुला अलिबाबा माहित आहे का ?’. तिने ‘हो’ म्हटलं. मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, ‘तुला अलिबाबा बद्दल काय माहित आहे’ मग तिने म्हटलं ‘ओपन सेसमे’ अर्थात ‘खुल जा सिम सिम’.
जॅक मा यांनी हाच प्रश्न तिथल्या परिसरातील जवळपास ३० जणांना विचारला. या लोकांमध्ये भारतीय, जपानी, चीनी, जर्मन असे सर्व देशातील लोक होते. त्यांच्याकडून आलेलं उत्तर एक सारखंच होतं. ‘खुल जा सिम सिम’....
याबद्दल सांगताना जॅक मा म्हणतात की ‘अलिबाबा हा दयाळू व चाणाक्ष व्यापारी होता. त्याने लोकांची मदत केली. अलिबाबा हे नाव देखील उच्चारायला सोप्प आहे. ‘खुल जा सिम सिम’ या वाक्याने कथेत खजिन्याचं दार खुलं होतं तसच आमच्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही लहानापासून मोठ्या व्यवसायापर्यंत सर्वांसाठी द्वार खुले करू...’
ही आयडिया भन्नाट गाजली. अलीबाबाच्या कथेप्रमाणे या कंपनीने जगभर आपली ओळख तयार केली आहे.