अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’चा ट्रेलर बघून अंगावर काटा येईल राव!!
अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा ‘गोल्ड’चा ट्रेलर आजच रिलीज झालाय मंडळी. भारतीय हॉकी संघाने स्वातंत्र्यानंतर ऑलम्पिकमध्ये मिळवलेल्या पहिल्या गोल्डची ही गोष्ट आहे. नुकतंच मिळालेलं स्वातंत्र्य, स्वातंत्र्य लढ्यातलं अजूनही धगधगत असलेलं देशप्रेम आणि खेळण्याची प्रचंड जिद्द, या गोष्टी सिनेमात ठासून भरलेल्या आहेत हे या ट्रेलरमधून दिसतं.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो काळ होता. तोपर्यंत भारताने सर्व पदके ही ब्रिटीश इंडियाच्या नावाने जिंकली होती. पण १९४७ नंतर हे चित्र बदललं. भारताने ’स्वतंत्र भारत’ म्हणून ऑलम्पिकमध्ये भाग घेतला आणि तिथे पहिल्यांदा सोनं लुटलं. त्याचीच ही गोष्ट.
आमीर खानच्या ‘तलाश’ नंतर जवळजवळ ६ वर्षांनी ‘रीमा कागती’ पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. तलाशसारखा डार्क सिनेमा हाताळल्यानंतर गोल्डसारखा भव्य सिनेमा दिग्दर्शित करणं हे आश्चर्यच म्हणावं लागेल.
अक्षय कुमार या सिनेमात हॉकी संघाच्या सहाय्यक व्यवस्थापकाच्या (तपन दास) भूमिकेत आहे. अक्षयबद्दल जास्त काही बोलायलाच नको. तो आता अभियानात मुरलेला आहे. त्याच्या तोंडी असलेली वाक्यं तर अफलातून जमली आहेत.
या सिनेमात आणखी एक चेहरा दिसतो< तो म्हणजे विनीत सिंग. विनीत एक चांगला अभिनेता असला तरी आजवर त्याला तितकी प्रसिद्धी मिळालेली नाही. गॅंग्स ऑफ वासेपूर, अग्ली, मुक्काबाज यांसारख्या सिनेमातून तो आजवर दिसला. गोल्डमध्ये त्याची आणि अक्षयची जुगलबंदी असेल तर बहार येईल राव. ट्रेलरमधून मौनी रॉयच्या पात्राची छोटी झलक दिसते, त्यातही ती भाव खाऊन गेली आहे. इतर पात्रंदेखील आपापली भूमिका एकदम मस्त निभावत आहेत.
एकूण ट्रेलर तर लय भारी वाटला राव. बघताना अंगावर काटेदेखील आले. हीच जादू पूर्ण सिनेमात असेल का हे सिनेमा रिलीज झाल्यावरच समजेल. तोपर्यंत हा ट्रेलर बघून घ्या राव.