दिनविशेष : सुभाषचंद्र बोस यांच्या इतिहासप्रसिद्ध घोषणे मागची खरी कथा !!

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने हातभार लावला. हिंसा किंवा अहिंसा दोन्ही मार्गांनी सर्वांनीच प्रयत्न केले. सुभाषचंद्र बोस हे त्याकाळातील तरुणांसाठी एक प्रेरणास्रोत होते. त्यांनी ब्रिटिशांना उघड विरोध करायला सुरुवात केली होती. त्यांनी लोकांना आझाद हिंद सेनेत सामील होण्यासाठी आवाहन केलं. हे आवाहन करत असताना त्यांचं एक वाक्य मात्र इतिहासात कायमचं कोरलं गेलं. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा.” हे वाक्य त्याकाळात प्रचंड प्रेरणादायी ठरलं. हा परिणाम इतका मोठा होता की लोक आझाद हिंद सेनेत स्वतःहून सामील होऊ लागले.

आजच्याच दिवशी म्हणजे ४ जुलै, १९४४ रोजी सुभाषचंद्र बोस यांनी हे वाक्य उच्चारलं होतं. या घटनेला आज ७६ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जाणून घेऊया सुभाष बाबूंच्या त्या ऐतिहासिक भाषणाचा इतिहास.

मंडळी, १९४२ रोजी सुभाषबाबूंनी हिटलरची भेट घेतली. या भेटीत हिटलरने भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी मदत देऊ केली नाही. शेवटी सुभाषबाबू जर्मनीतून जपानला एका पाणबुडीच्या सहाय्याने पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी जपानी सरकारकडून मदत मिळवली. पुढे त्यांनी जपानच्या संसदेत भाषणही केलं.

जपानी पाणबुडीवर सुभाषचंद्र बोस (स्रोत)

सुभाषबाबू येण्याआधी रासबिहारी बोस हे पूर्व आशियात आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून इंग्रजांशी लढत होते. सुभाषबाबूंच्याच्या येण्यानंतर वयोवृद्ध रासबिहारी बोस यांनी सिंगापूर मध्ये असताना आझाद हिंद सेनेचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवलं. 

स्रोत

१९४३ रोजी सिंगापूरमध्ये सुभाषबाबूंनी अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची स्थापना केली. ‘अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंद’ म्हणजे स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार होते. सुभाषबाबू या सरकारचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि युद्धमंत्री बनले. या सरकारला ९ देशांनी मान्यता दिली.

स्रोत

या सरकारमार्फत त्यांनी जपानच्या कोठडीत असलेले भारतीय युद्धकैदी सोडवून आझाद हिंद सेनेत सामील करून घेतले. सैन्यात महिलांसाठी स्वतंत्र ‘झाशीची राणी रेजिमेंट’ सुरु केली. पण या मूठभर सैन्याने बलाढ्य इंग्रजांना मात देणं शक्य नव्हतं.  म्हणून त्यांनी पूर्व आशियातील भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित करण्यास सुरुवात केली. अशाच एका दौऱ्यावर असताना बर्मा म्हणजे आताच्या म्यानमारमध्ये त्यांनी एक भाषण केलं.

स्रोत

ही तारीख होती ४ जुलै १९४४. या भाषणात त्यांनी ब्रिटीश हुकुमत महायुद्धामुळे कशी खिळखिळी झाली आहे आणि आपल्याला या संधीचा कसा फायदा घेतला पाहिजे हे समजावून सांगितलं. त्याचबरोबर आझाद हिंद सेनेत चीन, जपान, इंडोचीन, फ़िलिपाइन्स, जावा, बोर्नियो, सेलेबस, सुमात्रा, मलाया, थाईलँड इत्यादी देशातील भारतीय कसे सामील झाले आहेत याबद्दल माहिती दिली.

भाषणाच्या शेवटी त्यांनी कळकळीने विनंती केली. या भाषणाचा शेवट त्यांनी असा केला, “मित्रहो, आज मी तुमच्याकडून फक्त एक गोष्ट मागणार आहे, सर्वात महत्वाची गोष्ट, मी तुमच्याकडून तुमचं रक्त मागतो. हे रक्तच त्या रक्ताचा सूड घेईल जे शत्रूने सांडलं आहे. स्वातंत्र्याची किंमत फक्त आपल्या रक्तानेच चुकवली जाऊ शकते. तुम्ही मला तुमचं रक्त द्या आणि मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं वचन देतो’

मंडळी, पुढे जाऊन आझाद हिंद सेनेचा आवाका वाढला. याच सैन्यांने जपानी सैन्याबरोबर मिळून अंदमान आणि निकोबार बेटांवर हल्ला केला आणि ते जिंकून घेतले. यापाठी “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा.” या घोषणेचा मोठा परिणाम होता.

मंडळी, आज ७६ वर्षानंतरही या भाषणाने अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. सुभाषचंद्र बोस यांना बोभाटाचा सलाम !!

 

आणखी वाचा :

रास बिहारी बोस या गोष्टीसाठी जपान मध्ये इतके प्रसिद्ध असतील हे सांगूनही पटणार नाही !!

भारताच्या भूभागावर जपानचीही सत्ता होती ??

सबस्क्राईब करा

* indicates required