शकुंतला रेल्वे: का बरे अजूनही भारतीय रेल्वे देते ब्रिटिश कंपनीला पैसे?
भारतीय रेल्वे म्हणजे काहींसाठी रोजगार तर काहींसाठी अल्प दरातील प्रवासाचे साधन, काहींसाठी अगदी दुसरे घरच. रेल्वे ही भारतीय नागरिकासाठी लाईफलाईन म्हणून काम करते. आज आपण मेट्रोबद्दल ऐकत आहोत. बुलेट ट्रेनही काही वर्षांत दाखल होईल. पण तुम्हाला माहित आहे का, आजही अशी एक ट्रेन आहे जी अजूनही वाफेच्या इंजिनवर धावते अगदी जुन्या स्टाईल मध्ये! दररोज! आणि ती ट्रेन भारत सरकारच्या मालकीची नाही तर ती आहे एका ब्रिटिश खासगी कंपनीची! आजही या कंपनीची मालकी ब्रिटिश कंपनीकडेच आहे. खरं वाटत नाही ना?
अशी एकमेव खासगी रेल्वे म्हणजे शकुंतला एक्सप्रेस (सेन्ट्रल प्रोविनंस रेल्वे कंपनी). शकुंतला एक्सप्रेस १५० वर्षे जुनी ट्रेन आहे. १९१० साली Killick-Nixon या ब्रिटिश कंपनीने ही रेल्वेलाईन सुरू केली होती. ब्रिटिश सरकारच्या काळात अशा अनेक खासगी कंपन्यांनी रेल्वे लाईन्स स्वतःच्या फायद्यासाठी चालू केल्या होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ साली भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. या राष्ट्रीयीकरणात मात्र शकुंतला एक्सप्रेसचा समावेश नव्हता. ही ट्रेन राष्ट्रीयीकरणातून का वगळण्यात आली या बद्दल कोणालाच माहिती नाही.
आज ही ट्रेन १८९ किलोमीटरचा प्रवास ४ तासांत करते. यवतमाळ ते मुर्तीजापूर असा तिचा प्रवास असतो. यवतमाळ मधील अनेक लोक आजही शकुंतला एक्सप्रेसवर अवलंबून आहेत. शकुंतला एक्सप्रेस तयार करण्यामागचा हेतू अचलपूर, यवतमाळमधील कापूस मुंबईपर्यंत पोहोचवणे होता. पुढे तो कापूस मँचेस्टरपर्यंत पोहोचत असे. या ट्रेनच्या प्रवासात अचलपूर भागातील कापसाची शेती तुम्ही पाहू शकता. आजही इथला काळ १९ व्या शतकातला वाटतो.
सेन्ट्रल रेल्वे आणि शकुंतला एक्सप्रेस यांत राष्ट्रीयीकरणाच्या आधीपासून करार होता. हा करार राष्ट्रीयीकरणानंतर देखील कायम राहिला. या करारानुसार शकुंतला एक्सप्रेसच्या रुळाचा वापर करण्यासाठी सेन्ट्रल रेल्वेला दरवर्षी करारात म्हटल्याप्रमाणे कर द्यावा लागणार होता.
शकुंतला एक्सप्रेसला सेन्ट्रल रेल्वेमध्ये सामील करून घेण्याची मागणी इथले स्थानिक करत आहेत त्याच बरोबर दर वर्षी सरकारतर्फे दिला जाणारा १ करोड २० लाख रुपयांचा कर देखील बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. वाफेवर चालणार्या इंजिनच्या जागी इलेक्ट्रिक इंजिन बसवण्याबद्दल चर्चा चालू आहे पण आजच्या घडीला ती चर्चासुद्धा वाफेवरच आहे.
बुलेट ट्रेनच्या जमान्यात शकुंतला एक्सप्रेसचा कायापालट कधी होणार हे भविष्यच सांगेल!!