computer

आज अस्तित्वात नसलेले ७ देश....यातला एक देश तर भारतातच आहे राव !!

काळाच्या ओघात अनेक बदल होत जातात. जगाचा नकाशा सुद्धा काळाच्या ओघात अनेकदा घडलाय आणि बिघडलाय. जगाला गदागदा हलवणारी दोन महायुद्ध होऊन गेली. या युद्धांनी जागचा चेहरामोहराच बदलला. या ओघातच काही नवीन देश तयार झाले तर काही देश कायमचे मिटले गेले. आता आपलंच उदाहरण घ्या ना राव. ब्रिटीश गेल्यानंतर आपल्या देशाचे दोन तुकडे झाले आणि पाकिस्तान तयार झाला. जगात इतर काही देशांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे.

आज आपण ८ अशा देशांची ओळख करून घेणार आहोत जे कधीकाळी अस्तित्वात होते. आज या देशांची कोणतीही खुण शिल्लक नाही !!

चला तर इतिहासात मागे जाऊया आणि नसलेले राष्ट्र फिरून येऊया !!

१. पूर्व जर्मनी

दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे चार भाग पाडण्यात आले होते. त्यापैकी पूर्वेचा भाग हा रशियाने व्यापलेला होता तर पश्चिमेचा भाग इंग्लंड, फ्रांस, अमेरिकेने व्यापले होते. पश्चिम जर्मनीने महायुद्धानंतर बरीच प्रगती केली पण पूर्व जर्मनी रशियन अंमलाखाली मागास राहिला. त्यामुळे पूर्वेतून पश्चिम जर्मनीत जाणाऱ्यांची संख्या वाढली. ही समस्या सोडवण्यासाठी १९६१ मध्ये बर्लिनची प्रसिद्ध भिंत बांधण्यात आली. भिंत बांधल्यानंतरही माणसे स्थलांतरित होत राहिली. शेवटी १९९० साली दोन्ही जर्मन भूभागांना पुन्हा जोडण्यात आले. अशा प्रकारे पूर्व जर्मनी पश्चिमेत विलीन करण्यात झाला.

२. झेकोस्लोव्हाकिया

जर्मनी, हंगेरी, पोलंड, रशिया या देशांनी चारी बाजूंनी वेढलेला हा देश १९१२ ते १९९३ काळात अस्तित्वात होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हा देश काहीकाळ जर्मनीचा भाग होता. तेव्हा या देशाचं संपूर्ण अस्तित्वच मिटवण्यात आलं होतं. युद्धानंतर तो रशियन लोकांच्या हाती गेला. पण पुढे रशियाच्या विघटनानंतर (१९९१) झेकोस्लोव्हाकिया मध्ये अस्थिरता आली आणि शेवटी त्याची फाळणी झाली. १९९३ साली झेक आणि स्लोव्हाकीया हे दोन नवीन देश अस्तित्वात आले.

३. युगोस्लाव्हिया

युगोस्लाव्हिया देश हंगेरी आणि सर्बियाच्या काही भूभागांचा मिळून बनलेला देश होता. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात अनेक देशांमध्ये साम्यवाद बोकाळला. तसाच तो युगोस्लाव्हिया मध्ये सुद्धा तयार झाला. १९९२ सालापर्यंत देशांतर्गत यादवी युद्ध पेटलं आणि शेवटी या देशाची ६ शकले झाली.  युगोस्लाव्हियाचे तुकडे होऊन स्लोव्हेनिया, क्रोएशिया, बोस्निया, सर्बिया, मेसेडोनिया आणि मोंटेनेग्रो हे लहानलहान देश तयार झाले.

४. तिबेट

१९१२ साली तिबेटने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलं होतं. १९५१ साली चीनने तिबेटवर आक्रमण करून आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. तेव्हापासून तिबेट हा चीनचा भाग झाला आहे. तिबेटच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आजही उपस्थित केला जातो.

५. दक्षिण व्हिएतनाम

व्हिएतनामच्या दक्षिणेचा भाग हा स्वतंत्र देश म्हणून १९५४ ते १९७५ पर्यंत अस्तित्वात होता. १९५४ च्या जिनिव्हा परिषदेत व्हिएतनामची उत्तर-दक्षिण अशी फाळणी करण्यात आली होती. पुढे या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. यात अमेरिकेच्या साथीने दक्षिण व्हिएतनामने युद्धात उडी घेतली. हे युद्ध जगभर गाजलं. अखेर युद्धात उत्तर व्हिएतनामचा विजय झाला आणि दक्षिणेचा भाग उत्तरेला जोडण्यात आला. अशा पद्धतीने दक्षिण व्हिएतनामचे अस्तित्व संपले.

६. युनायटेड अरब रिपब्लिक

अरब देशांना एकत्रित करण्याचा एक फसलेला प्रयत्न म्हणजे ‘युनायटेड अरब रिपब्लिक’. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल नासार यांनी ही आयडिया काढली होती. या कल्पनेच्या मुळाशी खरं तर राजकीय हेतू होता. नासार यांना सिरीया सोबत मिळून इस्राईल विरुद्ध आघाडी उभारायची होती. शिवाय त्यांना दोन्ही देशांचे मिळून एकच सरकार तयार करायचे होते. एकूण काय तर सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न होता. पण दोन्ही देशांचे स्वभाव वेगवेगळे असल्याने लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. शेवटी युनायटेड अरब रिपब्लिक फक्त १९५८ ते १९७१ पर्यंत अस्तित्वात राहिले. हे जरी १३ वर्ष दिसत असले तरी सिरीया युएआर मधून तिसऱ्या वर्षीच बाहेर पडले होते.

७. सिक्कीम

सिक्कीम हा आज भारताचा भाग आहे पण एकेकाळी ते स्वतंत्र राष्ट्र होते. नामग्याल राजांनी सिक्कीमवर अनेक वर्ष राज्य केलं. भारतात ब्रिटीश राजवटीच्या काळात सिक्कीमवर नेपाळने आक्रमण केलं होतं. त्या युद्धात भारताच्या मदतीने सिक्कीम लढलं. पुढे भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर सिक्कीम भारताचे संरक्षित क्षेत्र बनले. अंतर्गत तणावामुळे सिक्कीम १९७५ साली भारतात सामील झाले आणि त्याला भारताच्या राज्याचा दर्जा मिळाला.

सबस्क्राईब करा

* indicates required