कारगिल विजय दिवस : कारगिल विजयाचे ५ अज्ञात वीर !!
कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहासातील एक महत्वाची घटना होती. या युद्धातील विजय हा त्याही पेक्षा महत्वाचा होता. कारगिल युद्धाला आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे उत्तम उदाहरण म्हटलं जातं. या युद्धाने भारताचं कौतुक झालं. या कौतुकाचं कारण होतं युद्ध मर्यादित ठेवणं. भारताने या युद्धाला फक्त कारगिल पुरतं मर्यादित ठेवलं. भारत नेहमीच युद्धापासून लांब राहिला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं. या गोष्टीमुळे भारताला अनेक देशांचा पाठींबा मिळवण्यात यश आलं.
या ऐतिहासिक युद्धाला आज २१ वर्ष पूर्ण होत आहेत. आजचा दिवस हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आज या निमित्ताने कारगिल युद्धातील ५ अज्ञात वीरांची ओळख करून घेऊया.
५. कॅप्टन सत्येंद्र सांगवान
कॅप्टन सत्येंद्र सांगवान यांची पोस्टिंग जम्मू काश्मीरच्या बटालिक भागात होतेती. बटालिक भाग कारगिल युद्धाचा महत्वाचा भाग होता. कॅप्टन सत्येंद्र सांगवान यांनी तिथली महत्वाची ठाणी उध्वस्त केली. त्याच दरम्यान रात्रीच्यावेळी गस्त घालत असताना त्यांचा पाय एका सुरुंगावर पडला आणि त्यांना एक पाय गमवावा लागला.
या घटनेनंतर ते सैन्यातून निर्वृत्त झाले. पण त्यांची कर्तबगारी इथेच थांबली नाही. निवृत्तीनंतर त्यांनी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन मध्ये काम केलं. तिथे त्यांनी ‘बेस्ट एम्प्लॉइ’ हा किताब मिळवला. पुढे त्यांनी अपंगांच्या वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं नेतृत्व केलं. यावरून तुम्ही त्यांच्या जिद्दीची कल्पना करू शकता.
४. रोशनलाल वझीर
१ जुलै १९९९ च्या दिवशी बटालिक भागात रोशनलाल वझीर यांची तुकडी पॉईंट ४८१२ मिळवण्यासाठी तैनात होती. रात्रीच्यावेळी त्या भागात असताना फक्त १५ फुटच्या अंतरावर शत्रूचं सैन्य टपून बसलेलं होतं. दुर्दैवाने याचा पत्ता भारतीय सैन्याला नव्हता. रोशनलाल यांच्या बाजूला असलेल्या सैनिकाने सिगरेट पेटवली तसा शत्रूला तिथे भारतीय सैन्य असल्याचा पत्ता लागला आणि अंधाधुंद गोळीबार सुरु झाला. या गोळीबारात अनेकजण मृत्युमुखी पडले. रोशनलाल यांना तब्बल ९ गोळ्या लागल्या. या अवस्थेतही त्यांनी शत्रूंना यमसदनी धाडलं. शेवटी त्यांच्या शरीराने त्यांची साथ सोडल्यानंतर त्यांनी हत्यार खाली ठेवले. या सर्वांचं फलित म्हणेज त्यांना अखेर विजय मिळाला.
रोशनलाल तब्बल ६ महिने हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते. त्यांना आजही नीट चालता येत नाही. सरकारने त्यांना गॅस एजन्सी देण्याचं वाचन दिलं होतं पण ते पूर्ण झालं नाही. त्यांन फक्त १३,००० पेन्शनवर घर चालवावं लागत आहे.
३. दान सिंग मेहता
२५ जुलै १९९९ साली पायसी भागात असताना शत्रू सैन्याने दान सिंग मेहता यांच्या तुकडीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचे साथीदार मारले गेले. ते स्वतःही प्रचंड जखमी झाले. १ तासाच्या लढतीत त्यांनी ३ शत्रू गारद केले. या सर्व घटनाक्रमात दान सिंग तब्बल ७० टक्के अपंग झाले. त्या दिवशी म्हणजे २५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता.
आज ते मेहता कॉस्मेटिक सेंटर चालवतात. त्यांनी एक अनोखी स्कीम काढली होती. काहीही खरेदी करा आणि कारगिलच्या गोष्टी फ्री मध्ये ऐका. या कारगिल हिरोच्या कथा ऐकायला कोणाला नाही आवडणार राव.
२. दिगेंद्र कुमार
दिगेंद्र कुमार आणि त्यांच्या तुकडीवर ४५९० पॉईंट घेण्याची जबाबदारी होती. हा पॉईंट कारगिलच्या टोलोलिंग हिल, द्रास भागात होता. या पोईंटवर शत्रूची तब्बल ११ ठाणी होती. यापैकी पहिलं आणि अकरावं ठाणं उध्वस्त करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. या मोहिमेच्या सुरुवातीलाच शत्रू सैन्याच्या हल्ल्यात कुमार यांचे बरेच साथीदार मारले गेले. यात या तुकडीचे मुख्य मेजर विवेक गुप्त सुद्धा मारले गेले.
हा हल्ला झाल्यानंतर कुमार यांना गोळ्या लागल्या. तो पर्यंत तुकडीतले जवळजवळ सगळेच जवान मारले गेले होते. मरणापूर्वी जवानांनी कुमार यांना आपली हत्यारे दिली होती. त्यानंतर कुमार हे एकटेच लढत राहिले. त्यांनी शत्रूवर १८ ग्रेनेड्स फेकले. त्याचवेळी शत्रू सैन्यातून अचानक मेजर अन्वर खान तिथे आला. अन्वर खान आणि कुमार यांच्यात झटापट झाली. कुमार यांना आपली बंदूक गमवावी लागली पण या समोरासमोरच्या लढाईत शेवटी कुमार यांनी अन्वर खानचा गळा कापला. अखेर ४५९० पॉईंट मिळवण्यात यश आलं.
या युद्धाचा शेवट त्यांनी टोलोलिंग हिल वर तिरंगा फडकावून केला. त्यांच्या या पराक्रमासाठी त्यांना महावीर चक्र देऊन गौरवण्यात आलं. महावीर चक्र मिळालेले ते एकमेव सैनिक आहेत. त्यांनी दिलेला लढा हा खरच अद्भुत होता. एलओसी सिनेमात अवतार गिल यानी दिगेंद्र कुमार यांची भूमिका केली होती.
एक दुःखद गोष्ट म्हणजे दिगेंद्र कुमार यांचं पुढचं जीवन हालाखीचं गेलं. त्यांना सरकारच्या तुटपुंजा पेन्शनवर जागावं लागत आहे. सरकारने त्यांना जवळजवळ २० एकर जमीन देण्याचं वचन दिलं होतं पण ते वाचन अद्याप पूर्ण झालेलं नाही.
१. बहादूर सिंग
२४ मे, १९९९ रोजी बहादूर सिंग यांच्या तुकडीवर शत्रूने हल्ला केला. गोळीबारात बहादूर सिंग यांना दोन गोळ्या लागल्या. एकाने पायाचा वेध घेतला तर दुसरीने डोळ्याचा. हा आघात एवढा जबरदस्त होता की त्यांना एक डोळा गमवावा लागला. यानंतर त्यांना निवृत्त व्हावं लागलं.
निवृत्तीनंतर बहादूर सिंग यांची स्थिती अत्यंत हलाखीची झाली. त्यांच्याकडे घर नव्हतं त्यामुळे त्यांना नातेवाईकांकडे राहावं लागलं. एकेकाळच्या या वीराला एका लहानशा खोलीत दिवस काढावे लागले. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं ‘एकदा का आम्ही सैन्यासाठी निरुपयोगी झालो की आमच्या सारख्या सैनिकाचं पुनर्वसन करण्याकडे कोणाचंही लक्ष नसतं’.
मंडळी, हे ५ हिरो आणि यासारखे अनेक बहादूर सैनिकांनी मिळून कारगिल युद्धातील विजय खेचून आणला होता. आजचा दिवस या सर्व वीरांच्या नावे अमर राहील. कारगिल विजय मिळवून देणाऱ्या प्रत्येक सैनिकास बोभाटाचा सलाम !!
आणखी वाचा :
या दोन प्रसंगांत पाकिस्तानने भारतासमोर हार मानली...आयएसआय प्रमुखांनी केलं कबूल !!
पाकिस्तानात भारतीय हेर का मारले गेले? मोरारजी देसाईंनी खरंच RAW ला धोका दिला होता का ??