विशाखापट्टणमची मालगाडी तब्बल साडेतीन वर्षांनी उत्तर प्रदेशला पोहोचली...वाचा काय आहे हा प्रकार ?
भाऊ, काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास सुद्धा ३ दिवसात होतो. पण भारतात एका मालगाडीला पोहोचायला चक्क साडेतीन वर्षं लागली? राव ही मालगाडी भारत भ्रमण करत होती की काय? चला जाणून घेऊ नक्की काय प्रकरण आहे हे...
तर, बातमी अशी आहे की इंडियन पोटॅश कंपनीकडून १० नोव्हेंबर, २०१४ रोजी एक मालगाडी बुक करण्यात आली. या मालगाडीतून खत वाहून न्यायचं होतं. हे खत जवळजवळ साडेतीन वर्षांनी २५ जुलै, २०१८ रोजी त्याच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचलं. त्या मालगाडीला कापायचं होतं विशाखापट्टणमपासून ते उत्तर प्रदेशच्या बस्तीपर्यंतचं फक्त १४०० किलोमीटरचं अंतर. आणि मालगाडीतल्या खताची किंमत होती तब्बल १० लाख रुपये.
हा प्रकार कसा घडला ?
त्याचं काय झालं, त्या कंपनीनं २० वॅगन- ज्यांना आपण मराठीत वाघिणी म्हणतो- त्या भरून खत मागवण्यात आलं होतं. पण त्यातल्या १९ वॅगन्स पोहोचल्या आणि एक हरवली. ही हरवलेली वॅगन अनेक स्टेशन फिरत राहिली. शक्यता अशी आहे की या वॅगनमध्ये काही टेक्निकल बिघाड आल्यामुळे तिला मालगाडीपासून वेगळं करण्यात आलं होतं. सध्या रेल्वेचे अधिकारी नक्की काय घडलं होतं याचा तपास घेत आहेत.
बस्तीमधल्या रामचंद्र गुप्त यांनी वॅगन पोहोचली नसल्यानं भारतीय रेल्वेकडे तक्रार दाखल केली होती. पण वारंवार सांगूनही रेल्वेला वॅगन काही शोधता आली नाही. यानंतर त्यांच्यात आणि भारतीय रेल्वे मध्ये अनेकदा पत्र व्यवहार झाला. शेवटी रामचंद्र गुप्ता यांनी रेल्वेला विनवणी करणं सोडून दिलं.
मंडळी, रामचंद्र गुप्ता यांनी तर आशाच सोडली होती. पण साडेतीन वर्षांनी मालगाडी पोहोचल्यानंतर त्यांनी माल स्वीकारण्यास साफ नकार दिलाय. कारण आतील खत आता निरुपयोगी झालंय. या सर्वांची जबाबदारी रेल्वेची आहे आणि त्यांनीच याची भरपाई द्यावी असं त्यांनी म्हटलंय.
राव, कायद्यानुसार ही भरपाई रेल्वेलाच द्यावी लागणार आहे. जर रेल्वेने कामाच्या बाबतीत सतर्कता राखली असती तर आज ही नामुष्की ओढवली नसती. रेल्वेचा हा सर्वात मोठा ढिसाळ कारभार आहे.
आणखी वाचा :
नागपूरकरांनो, नागपूर रेल्वे स्थानकाबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?
टर्मिनस, सेन्ट्रल, जंक्शन मधला फरक माहित्ये का ?
'काला बकरा' ते 'सिंगापूर रोड' - भारतातील ११ मजेदार रेल्वे स्टेशन्स !!