‘युपीआय २.०’ चे ४ धमाकेदार फिचर्स पाहिले का ?
मंडळी, ‘यूनिफाइड पेमेंट इंटरफेस’ म्हणजेच युपीआयचं नवीन व्हर्जन ‘युपीआय २.०’ लाँच करण्यात आलं आहे. युपीआय २.० व्हर्जनची वैशिष्ट्ये काय असतील ते आपण आज बघणार आहोत. पण त्या आधी युपीआयबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
युपीआय ही ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी सर्वात सोप्पी सुविधा आहे. युपीआयमुळे तत्काळ पैसे पाठवताही येतात व पैसे घेताही येतात. या व्यवहाराची खासियत म्हणजे पैसे ट्रान्स्फर करताना लाभार्थीला त्याचं बँके अकाऊन्ट नंबर किंवा बँकेचे नाव द्यावे लागत नाही. युपीआयचा वापर करून एकावेळी कमीतकमी ५० रुपयांपासून ते जास्तीतजास्त १ लाख पर्यंतचा व्यवहार करता येतो. युपीआय २.० मध्ये तर ही मर्यादा २ लाख पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सर्व प्रकारच्या कॅशलेस व्यवहारांसाठी सरकारतर्फे या अॅपची निर्मिती करण्यात आली होती. २०१६ मध्ये पहिल्यांदा युपीआयचा अॅप लाँच झाल्यानंतर बघताबघता युपीआय लोकांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. नवीन व्हर्जनची बऱ्याच दिवसापासून वाट बघितली जात होती आणि तो शेवटी लाँच झालाच.
चला तर आता बघूया या नवीन व्हर्जन मध्ये कोणते नवीन फिचर असतील ते....
१. ओव्हरड्राफ्ट खाते युपीआयशी लिंक करा
नवीन व्हर्जन मध्ये ग्राहकांना चालू खाते व बचत खात्याबरोबरच ओव्हरड्राफ्ट खाते सुद्धा युपीआयशी लिंक करता येणार आहे. या नवीन फिचरमुळे ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट खाते वापरून तत्काळ व्यवहार करता येईल. ओव्हरड्राफ्ट खात्याशी संबंधित सर्व फायदे ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहेत
२. वन-टाईम मँँडेट
‘युपीआय २.०’ मध्ये ‘वन-टाईम ब्लॉक’ कार्यप्रणाली देण्यात आली आहे. या कार्यप्रणालीमुळे ग्राहक भविष्यातील व्यवहारासाठी पूर्व मान्यता देऊ शकतात. याचाच अर्थ भविष्यातील व्यवहारासाठी आधीच संमती देता येणार आहे. पूर्व मान्यता दिल्यावर ठरवलेल्या कालावधीनंतर ते पैसे आपोआप चुकते केले जातील. या फिचरचा फायदा व्यापारी आणि सामान्य ग्राहक असा दोघांनाही होणार आहे.
३. इनवॉयस इन द इनबॉक्स
या फिचरमुळे ग्राहकांना पैसे चुकते करण्यापूर्वी बिल पाहून मगच व्यवहार करण्याची सुविधा मिळणार आहे. समजा तुम्ही ऑनलाईन काही खरेदी केली आणि तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करायचे आहेत तर या फिचरमुळे तुम्हाला हे तपासता येईल की आपण बरोबर व्यापाऱ्याबरोबर व्यवहार करतोय की नाही. ग्राहकाला संपूर्ण पडताळणी करूनच पैसे ट्रान्स्फर करता येतील.
४. QR स्कॅनिंग
Signed intent and QR या फिचरमुळे तुम्हाला QR कोड स्कॅनिंग करताना विक्रेता युपीआयचा अधिकृत व्यापारी आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. विक्रेत्याचा खरेपणाबद्दल यामुळे ग्राहकांना समजेल. या फिचरमुळे आपण करत असलेला व्यवहार सुरक्षित आहे की नाही याची तत्काळ माहिती मिळू शकते. असुरक्षित व्यवहारासंबंधी ग्राहकांना नोटिफिकेशन पाठवण्याची सुविधा आता युपीआय मध्ये उपलब्ध आहे.
तर मंडळी, या नवीन व्हर्जन मध्ये ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि सोप्प्या व्यवहार पद्धतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आले आहेत. आता तुम्ही सुद्धा युपीआय २.० वापरून बघाच.