अखेर कलम ३७७ इतिहास जमा झाले....वाचा या कलमातलं नक्की काय रद्द झालंय ते !!
समलिंगी संबंध गुन्हा नाही असा ऐतिहासिक निर्णय आज सुप्रीम कोर्टातर्फे देण्यात आलाय. पाच न्यायमूर्तींच्या एकमुखी निर्णयात कौतुकास्पद असं वाक्य होतं. ‘माणसांची लैंगिक वृत्ती ही निसर्गदत्त असते आणि ती काबूत ठेवणे शक्य नसते. एखाद्या कायद्याचा अर्थ बदलत्या काळाच्या गरजेनुसार लावला पाहिजे.’ मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या शब्दात सांगायचं झालं तर “कलम ३७७ हे असमंजस, अनाकलनीय, अहेतुक आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला तर सामाजिक धारणा काय आहे हे महत्वाचे नाही.”
न्यायाधीश खानविलकर म्हणाले की “सामाजिक नैतिकतेचे नियम व्यक्तिस्वातंत्र्यावर बाधा आणू शकत नाही.” न्यायाधीश मल्होत्रा यांच्या म्हणण्याप्रमाणे “आता पर्यंत LGBT यांना इतर सामाजिक घटकांसोबत समान दर्जा दिला गेला नाही त्याबद्दल समाजाने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागायला हवी.” न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यामते आतापर्यंत समलैंगिकांच्या अस्मितेची हानीच झालेली आहे.
अनेक सामाजिक संस्थांनी हा प्रश्न लोकसभा आणि राज्यसभा यांच्याकडे सोपवावा असे सूचित केले होते. त्याला पाचही न्यायधीशांनी स्पष्ट नकार दिला. “आम्ही संविधान आणि संविधानाची तत्वे यावर कायद्याचा अर्थ लावतो. आणि त्यामुळे संख्यात्मक बलाबालावर हा निर्णय सोपवता येत नाही.” असेही त्यांनी म्हटले.
थोडक्यात नागरिकांचे लैंगिक आयुष्य हा नागरिकांच्या खाजगी जीवनाचा भाग आहे आणि त्याला गुन्ह्याचे स्वरूप देणे योग्य नाही असे आता सिद्ध झाले आहे.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी- या सर्व वादाला कारणीभूत असलेला ३७७ कलम रद्द करण्यात आलेला नाही. सहमतीने खाजगीत समलैंगिक संबंध गुन्हा नसेल पण सहमतीशिवाय संबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरू शकतो.
राव आता समजून घेऊया वादग्रस्त ठरलेला कलम ३७७ आहे तरी काय !!
हा कायदा ६ ऑक्टोबर १८६० रोजी अस्तित्वात आला. त्यात नमूद केल्यामाणे :
३७७. अनैसर्गिक अपराध : जो कोणी स्वेच्छेने पुरुष, महिला किंवा प्राण्यांसोबत निसर्गाच्या नियमांविरुद्ध शारीरिक संबंध ठेवेल तो जन्मठेप किंवा १० वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला आणि दंडाला पात्र ठरेल.
अशा या अन्यायकारक कायद्यात आज १५८ वर्षांनी महत्वाचा बदल झालाय. इतिहासातील एक महत्वाचा लढा आज यशस्वी झाला आहे.
आणखी वाचा :
यवतमाळच्या तरुणाने केला व्हिएतनामी मुलासोबत समलिंगी विवाह !!