झोपेत बाळ का हसतं ? हे आहे या मागचं वैज्ञानिक कारण!!

छोटं बाळ हसू लागलं की लोक याची बरीच कारणं सांगतात. काय तर म्हणे सटवाई हसवते, स्वप्नात देवबाप्पा येऊन गुदगुल्या करतो, एक ना दोन!! पण विज्ञान या बाबतीत वेगळीच माहिती सांगतं. बाळ जन्मल्यावर त्याच्या मेंदूत तेवढीच माहिती असते जेवढी आपल्या नवीन मेमरी कार्डमध्ये असते. म्हणजे अगदी रिकामं. बाळ जसजसं मोठं होत जातं,  तसं त्याला आजूबाजूच्या गोष्टींचं ज्ञान येऊ लागतं. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये त्याला स्वप्न पडण्याची शक्यताच नसते. मग बाळ का हसत असेल? उत्तर वाचून तुम्हालाच हसू येईल राव.

स्रोत

१.  सुरुवातीच्या, विशेषतः २ ते ४ आठवड्यात बाळाच्या हास्यामागचं कारण असतं पोटातून बाहेर पडणारा गॅस. म्हणजेच पादणे. बसला ना धक्का? ४ आठवड्यापर्यंत किंवा त्यानंतरही बाळ जर डोळे मिटून हसत असेल, तर शक्यता आहे की त्याने नुकतंच गॅस पास केला आहे. घरात बाळ असेल तर तुम्ही निरीक्षण करू शकता.

२. शास्त्रज्ञांच्या मते १ महिन्यापर्यंत बाळाच्या हास्यामागे कोणतंही भावनिक कारण नसतं , किंवा आई-वडील यांच्याशीही ते निगडीत नसतं.

३. बाळ १ महिन्याचं झाल्यानंतरच्या हास्याला त्याच्या मेंदूत होणारे बदल कारणीभूत असतात. म्हणजे दिवसभर आलेल्या अनुभवांवर रात्री प्रक्रिया होत असते. यातूनच काहीवेळा अचानक बाळाच्या चेहऱ्यावर लाघवी हसू पसरतं, तर काहीवेळा बाळ अचानक रडूही लागतं. याकाळात बाळाच्या मेंदूत भावभावना विकसित होत असतात.

४. ‘REM स्लीप’ फेजमध्ये बाळाला सर्वात जास्त स्वप्नं पडत असतात. स्वप्नात दिसणाऱ्या घटनांमुळे त्याच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव प्रकट होत असतात. REM स्लीप हा प्रकार सर्व वयातील माणसांमध्ये आढळतो. या प्रकारात डोळ्यांची जलद उघडझाप होत असते आणि शरीर एकप्रकारे लकवा मारलेल्या स्थितीत जातं. पण मेंदू जागृत असतो. याच स्थितीत स्वप्नं पडतात. बाळाच्या शरीरात यावेळी बदल होत असतात, त्या बदलातूनच हास्यासारखी भावना बाहेर उमटते.

५. विज्ञान म्हणतं की बाळ जन्मल्यानंतर त्याला केवळ १ ते २ फुटांपर्यंतच फक्त दिसतं. पहिल्या महिन्यानंतर बाळाची नजर स्थिर व्हायला सुरुवात होते. त्यानंतर बाळ हळूहळू आई वडिलांचा चेहरा ओळखू लागतं. यानंतर बाळ ओळखीच्या व्यक्तींकडे स्थिर नजर ठेवून बघण्यास सुरुवात करतं. या शारीरिक बदलांचा परिणाम त्याच्या हावभावांवर होत असतो. 

६. जन्माच्या ६ ते ८ महिन्यांनी बाळ ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींकडे बघून हसतं. याला वैज्ञानिक भाषेत ‘सोशल स्माईल’ म्हणतात. हे हसू स्वतःहून आलेलं असतं. या टप्प्यापर्यंत बाळाची नजर जवळजवळ स्थिर झालेली असते. म्हणजे गॅस पास करणं हे एकच कारण तोपर्यंत उरत नाही. 

राव, आपण लहानपणापासून बाळाच्या हास्याबद्दल काही समजुती बाळगून होतो, त्या सगळ्या समजुतींना सुरुंग लागला असेल ना? पण काय करणार?  हेच सत्य आहे.

 

 

आणखी वाचा :

डोहाळेजेवण साजरे करण्याच्या ५ वेगवेगळ्या पद्धती

सबस्क्राईब करा

* indicates required