computer

घरगुती फ्रीजबद्दल या महत्वाच्या गोष्टी माहित आहे का ?

नमस्कार मंडळी! सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि घरोघरी नवीन वस्तू खरेदी करण्यासंबंधी चर्चा सुरू आहेत. दिवाळीला घरात नवीन वस्तू आणणे ही आपली परंपराच आहे. त्यात महिलांचा ओढा शक्यतो होम अप्लायन्सेस खरेदी करण्याकडे असतो. होम अप्लायन्सेस मध्ये येतात टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, एसी अश्या वस्तू… जर तुम्ही फ्रीज खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हा लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल. जाणून घ्या फ्रिजसंबंधी संपूर्ण माहिती आणि फीचर्स….

फ्रीज किंवा रेफ्रिजरेटरचे काम असते अन्नपदार्थ दीर्घकाळासाठी थंड आणि ताजे ठेवणे. रेफ्रिजरेटर अनेक प्रकारचे असतात. त्यांचा मोठमोठ्या कारखान्यापासून ते हॉस्पिटल्स, दुकाने आणि घरगुती वापरासाठी उपयोग होतो. या लेखात आपण फक्त घरगुती वापरासाठी उपयोगात येणाऱ्या फ्रीजबाबत चर्चा करणार आहोत.

सामान्य फ्रीज मध्ये दोन किंवा तीन भाग केलेले असतात. ज्यात एक भाग बर्फ तयार करण्यासाठी, दुसरा भाग अन्नपदार्थ थंड करण्यासाठी आणि तिसरा भाग भाज्या फळे ठेवण्यासाठी वापरला जातो. 
 

फ्रीजचे काम कसे चालते ?

खाद्यपदार्थ खूप वेळ ताजे राहावे म्हणून त्यांना शून्य ते चार डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवावे लागते. फ्रीजमध्ये हेच तापमान नियंत्रित केले जाते. सामान्य फ्रीज हे ‘मेकॅनिकल कम्प्रेशन सिस्टीम’ वर काम करतात. ज्यात पुढील भाग समाविष्ट असतात…

1. कॉम्प्रेसर

जसे मानवी शरीरात हृदय काम करते तसेच फ्रीज मध्ये कॉम्प्रेसर काम करतो असे म्हणायला हरकत नाही. कॉम्प्रेसर शक्यतो फ्रिजच्या मागे खालच्या बाजूला बसवलेला असतो. रेफ्रिजरंटला कम्प्रेस करणे आणि त्याचा प्रवाह नियंत्रित करण्याचं काम कॉम्प्रेसर करतो. 

2. कंडेन्सर

कंडेन्सर सुद्धा फ्रिजच्या मागच्या बाजूला बसवलेला असतो. तुम्ही मागील बाजूस जी तारांची जाळी बघता तोच हा कंडेन्सर. कॉम्प्रेसरमधून येणाऱ्या रेफ्रिजरंटच्या उच्च तापमानाला आणि उच्च दाबाला कंडेन्सर थंड करण्याचं काम करतो. 

3. ड्रायर

हे रिसिव्हर आणि इव्हपोरेटर या दोन्हीच्या मध्ये मध्ये असते. याचे काम रेफ्रिजरंटला फिल्टर करणे आणि त्यातली आर्द्रता कमी करण्याचे आहे. 

4. एक्सपांशन व्हॉल्व

या व्हॉल्व मधून रेफ्रिजरंट जाते तेव्हा बारीक छिद्रातून दबावाखाली जाण्याने त्याचे तापमान कमी होते.

5. इव्हपोरेटर

याचे दोन काम असतात, बाहेरच्या गर्मीला शोषून घेणे आणि द्रव रेफ्रिजरंटची वाफ बनवणे. 

ही होती आतल्या भागांची माहिती. फ्रिजच्या बाहेरच्या म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या भागात वेगवेगळे कंपार्टमेंट, लाईट, शेल्फ, बटणे, थर्मोस्टेट कंट्रोल, इत्यादी भाग असतात.
आधुनिक फ्रीज मध्ये एचएफसी-134ए हा वायू वापरला जातो. या वायूमुळे ओझोनच्या वलयाचे नुकसान होत नाही. 

या बेसिक माहिती नंतर जेव्हा तुम्ही फ्रीज खरेदी करायला जाल तेव्हा कुठल्या कंपनीचे पार्टस चांगले आहेत याची नक्की माहिती घ्या. सध्या बाजारात गोदरेज, व्हर्लपूल, सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, हायर इत्यादी कंपनीचे फ्रीज उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती दहा हजार पासून पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा आहेत. फ्रीजमध्ये कुठल्या सुविधा दिल्या आहेत यावर त्याची किंमत ठरते. तसेच फ्रीज किती लिटर कॅपसिटीचा आहे यावरही किंमत अवलंबून असते. 

आपल्या घरगुती वापरासाठी सिंगल डोअर, डबल डोअर किंवा ट्रिपल डोअर फ्रीज मधून निवड करायची असल्यास घरातल्या सदस्यांची उंची आणि फ्रीजचा कुठला भाग जास्त वेळा उघडावा लागतो याचाही विचार करावा लागेल. पारंपरिक फ्रीज मध्ये बर्फ तयार करण्याचा कप्पा सर्वात वरच्या बाजूला असला तरी सध्या काही कंपन्यांनी आणलेल्या नवीन फ्रीज मध्ये तो खालील बाजूस असण्याची सुविधा सुद्धा आहे. तसेच भाज्या, फळे किंवा द्रव पदार्थ यांचा कप्पा कुठे असावा याची निवड करण्याची सोय आता काही मॉडेल्स मध्ये दिली गेली आहे. 

बोभाटाचा असा सल्ला आहे की, कमी किंमत आहे म्हणून फ्रीज खरेदी करण्यापेक्षा त्या फ्रीज मधील पार्टसची माहिती घेऊन चांगल्या दर्जाचा फ्रीज खरेदी करावा. कारण, ही एक रोजच्या वापरातील गरजेची वस्तू असल्याने आणि याची नेहमी नेहमी खरेदी होत नसल्याने एकदाच केलेली गुंतवणूक दिर्घकाळ मानसिक स्वास्थ्य देऊ शकते. आणि हो, फ्रीज ऑटो डिफ्रॉस्ट असलेलाच घ्या, नाहीतर डिफ्रॉस्ट करणं हे एक मोठं काम होऊन बसतं

हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा आणि इतर उपकरणांची माहिती हवी असल्यास कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required