मिस डेफ आशिया- निष्ठा डुडेजा! अपंगत्वावर मात करत तिनं काय काय केलंय हे पाह्यलंत तर तुम्हीही तिला सलाम ठोकाल...
मंडळी, आपल्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा पार करून यशाचं शिखर गाठण्यासाठी कमालीची जिद्द लागते. मनात अशी जिद्द असणारेच यशस्वी होतात. आज आम्ही अशाच एका जिद्दी महिलेबद्दल सांगणार आहोत.
‘मिस डेफ आशिया’ ही स्पर्धा कर्णबधीर सौंदर्यवतींसाठी भरवली जाते. आजवर ‘मिस डेफ आशिया’चा खिताब एकही भारतीय सौंदर्यवतीला मिळाला नव्हता. ही कमी भरून काढली आहे हरियाणाच्या पानिपत भागातल्या ‘निष्ठा डुडेजा’ (वय वर्ष २३) हिने !! चीन, थायलंड, तैवान, इस्राईल, झेक रिपब्लिक, बेलारूस, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सौंदर्यवतींशी तिची स्पर्धा होती. या सर्वांमधून तिची निवड झाली ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
निष्ठा डुडेजा ही जन्मजात कर्णबधीर आहे. पण शारीरिक कमतरतेला तिने कधीही ओझं बनू दिलं नाही. तिला नेहमीच अभ्यासोबतच इतर उपक्रमांमध्ये रस होता. आपल्या मुलीची गती बघून तिच्या घरच्यांनी तिला वयाच्या ७ व्या वर्षीच ‘जुडो’चे धडे दिले. तिने ५ वर्ष जुडोला वाहून घेतलं. जुडोच्या अनेक अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिने मेडल्सची लयलूट केली.
जुडो सोबत तिने अभ्यासही चालू ठेवला. आज ती कॉमर्सची पदवीधर असून मुंबई मध्ये अर्थशास्त्रात MA करत आहे. ती इथेच थांबली नाही तर तिच्या स्वप्नांनी आणखी उंच भरारी मारली. ‘मिस डेफ आशिया’ बनण्यापूर्वी तिने ‘मिस डेफ इंडिया’चा खिताब मिळवला होता. याशिवाय ती एक उत्कृष्ट टेनिसपटू आहे. तिने ‘World Deaf Tennis Championship 2015’, Deaflympics 2017 अणि Deaflympics 2013 या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
मंडळी, शारीरिक कमतरता यशाच्या मार्गात अडथळा बनू शकत नाही हेच ‘निष्ठा डुडेजा’ हिच्याकडून शिकायला मिळतं.