नाळ : आटपाट नगरातली आणखी एक गोष्ट मोठ्या पडद्यावर...ट्रेलर पाह्यला का भाऊ !!
एक आटपाट गाव असतं आणि तिथे अनेक गोष्टी घडत. एकेक कथा पडदा व्यापून टाकत असे. आजवर त्या गावातल्या २ कथा सांगितल्या गेल्या आहेत आणि आता तिसरी उलगडणार आहे. या तिसऱ्या कथेचं नाव आहे “नाळ”!
झी स्टुडीओसोबत आटपाट प्रॉडक्शनची पहिली निर्मिती असलेला ‘नाळ’ चित्रपट १६ नोव्हेंबरला रिलीज होतोय. कालच ‘नाळ’ चा ट्रेलर रिलीज झालाय. फँड्री आणि सैराटने गाठलेली उंची राखण्यात हा सिनेमा यशस्वी होईल याबद्दल ट्रेलर विश्वास निर्माण करतो.
नाळ ही ‘चैतन्य’ उर्फ ‘चैत्या’ नावाच्या मुलाची गोष्ट आहे. कथा त्याच्या व त्याच्या आईच्या अवतीभोवती फिरते. या कथेत नेमकं काय असेल याबद्दल मात्र ट्रेलर फारसं काही सांगत नाही. सिनेमाचं मुख्य आकर्षण अर्थातच नागराज मंजुळेची मुख्य भूमिका आहे. पण त्याला तोडीस तोड असा नवीन कलाकार या चित्रपटात आहे. हा छोटुकला नवखा असूनही प्रेक्षकांची पसंती मिळवून जाईल असं वाटतंय. ‘श्रीनिवास पोकळे’ हा लहानगा चैत्याची भूमिका साकारतोय. त्याने चैत्याच्या भूमिकेत कमाल केली आहे. चित्रपट पाहून प्रेक्षक त्याच्या प्रेमात पडतील हे नक्की.
मंडळी, एकंदरीत आटपाटच्या कारखान्यातून तयार झालेला आणखी एक दर्जेदार सिनेमा १६ नोव्हेंबरला पाहायला मिळेल हे नक्की. चला तर आता ट्रेलर बघून घ्या.