प्लास्टिकमुळे नाही तर चक्क या गोष्टीमुळे होत आहे समुद्र सर्वाधिक दूषित!!

समुद्राला दूषित करण्यात प्लास्टिकचा मोठा हात आहे हे तर आपल्याला माहित आहेच. पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून आणखी एका प्रदूषकाचा शोध लागला आहे. प्लास्टिक सोबतच चक्क सिगारेटच्या थोटकांमुळे समुद्र सर्वात जास्त दूषित होत आहे. चला तर जाणून घेऊया संशोधन काय म्हणत आहे ते.

स्रोत

आपण आजवर प्लास्टिकला सर्वात मोठा प्रदूषक समजत होतो पण सिगारेट सारख्या लहानशा गोष्टीकडे आपलं कधीच लक्ष गेलं नाही. सिगारेटच्या थोटकांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर एका अमेरिकन संस्थेने संशोधन केलं आहे. ही संस्था सध्या धुम्रपानावर जनजागृती करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचं काम करत आहेत. पण या संस्थेचा सिगारेटला विरोध नाही तर त्यांचा विरोध आहे सिगारेटच्या फिल्टरला. याचं कारण म्हणजे सिगारेटचं फिल्टर हे ‘सेल्यूलोज एसीटेट’ या घटकापासून बनलेलं असतं. हे एक प्रकारे प्लास्टिकचच एक उत्पादन आहे. सेल्यूलोज ऍसिटेटच्या विघटनाला तब्बल १० वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.

स्रोत

एका अहवालानुसार ५.६ ट्रिलियन फिल्टर्ड सिगारेट मधले बहुतांश सिगारेटची थोटकं शेवटी समुद्रात जाऊन पडतात. याच अहवालात असंही म्हटलंय की फिल्टर्ड सिगारेट तुमच्या फुफ्फुसांना कमी धोकादायक असतात असा एक प्रचार केला जातो, पण खरं तर हा एक मार्केटिंग फंडा आहे.

‘दि ओशन कन्सर्वेन्सी ग्रुप’ने दिलेल्या माहितीत म्हटलंय, ‘गेल्या ३२ वर्षात तब्बल ६ कोटी सिगारेटची थोटकं जगभरातल्या समुद्र किनाऱ्यांवरून साफ करण्यात आली आहेत.’ सिगारेटचा हा कचरा फक्त समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या धुम्रपानामुळे आलेला नाही तर यात नदी नाल्यांमधून वाहून आलेल्या सिगारेटचंही तेवढंच योगदान आहे.

स्रोत

मंडळी, यातला धोकादायक भाग असा की सिगारेटचं फिल्टर समुद्रात गेल्यानंतर त्याचं लहानलहान तुकड्यात विघटन होतं. सेल्यूलोज ऍसिटेट प्लास्टिकचे हे अंश समुद्री जीवांच्या पोटात जाऊन त्यांच्या जीवाला धोका पोहोचवतात. आपण जे मासे खातो त्यांच्याही पोटात प्लास्टिकचे अंश आढळले आहेत. यातला मोठा वाटा हा समुद्री पक्षांच्या पोटात जातो.

मग यावर मार्ग काय ?

स्रोत

धुम्रपानाला विरोध हा यावरचा उपाय नसून विघटनशील सिगारेट फिल्टर तयार करणे हा यावरचा उपाय ठरू शकतो असं तज्ञांचं मत आहे. अमेरिकेत जागोजागी पब्लिक अॅशट्रे बसवण्यात आले होते पण लोकांनी त्याला मंद प्रतिसाद दिला. स्मोकर्स सिगारेट ओढून झाल्यावर फिल्टरला वाऱ्यावर फेकणं जास्त पसंत करतात.

तर मंडळी, बोभाटाचा असा सल्ला आहे की तुम्ही जर धुम्रपान करत असाल तर ती तुमची निवड आहे... पण उरलेलं थोटूक कचऱ्याच्या पेटीतच टाका.

सबस्क्राईब करा

* indicates required