हैद्राबादच्या या एकाच शाळेतून आलेत मायक्रोसॉफ्ट, मास्टरकार्ड आणि अडोब सिस्टीमचे CEO.....
मंडळी, हैद्राबाद मधल्या एकाच शाळेने जगातील ३ नामवंत कंपन्यांचे CEO घडवले आहेत. हे ३ CEO म्हणजे सत्या नादेला, शंतनू नारायण आणि अजय सिंघ बंगा. हे तिघेही अनुक्रमे मायक्रोसॉफ्ट, अडोब सिस्टीम आणि मास्टरकार्डचे CEO आहेत.
या शाळेचं नाव आहे ‘हैद्राबाद पब्लिक स्कूल’. ही शाळा हैद्राबादच्या बेगमपेट येथे आहे. हैद्राबादच्या सातव्या निजामाने १९२३ साली या शाळेची स्थापना केली. त्यावेळी शाळेला ‘जागीरदार्स कॉलेज’ म्हणत. ही शाळा विशेषतः उच्चवर्गीयांसाठी होती. नवाब, जहागीरदारांची मुलं येथे शिकायला येत. १९५१ साली स्वातंत्र्यानंतर शाळेचं नाव ‘हैद्राबाद पब्लिक स्कूल’ असं ठेवण्यात आलं.
आज या शाळेत सर्व स्थरातील मुलांना १२ वी पर्यंतचं शिक्षण दिलं जातं. २०१७ साली हैद्राबाद पब्लिक स्कूल’ने भारतातील सर्वोत्कृष्ट अशा १० शाळांच्या यादीत नाव मिळवलंय.
सत्या नादेला, शंतनू नारायण आणि अजय सिंघ बंगा यांच्याशिवाय इतर अनेक महत्वाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेली मंडळी या शाळेने तयार केली आहेत. हर्षा भोगले, विवेक ओबेरॉय, डायना हेडन, नागार्जुन ही त्यातली काही प्रमुख नावे सांगता येतील.
मंडळी, हैद्राबाद पब्लिक स्कूलने तयार केलेली ही ३ दिग्गज माणसं फक्त हैदराबादसाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद आहेत.