computer

भारतात आहेत ही १३ जागतिक वारसा स्थळं. यातल्या किती ठिकाणांना तुम्ही भेट दिलीय??

जागतिक वारसा स्थानांच्या (World Heritage Sites) यादीत भारतातल्या वेगवेगळ्या स्थळांचा समावेश होतो. जसे की महाराष्ट्रातल्याच अजिंठा-वेरूळ गुहा असतील, कर्नाटकचं हम्पी हे गाव असेल किंवा ताजमहाल सारखी ऐतिहासिक वास्तू असेल. सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्वाच्या स्थानांना युनेस्कोने आपल्या यादीत स्थान दिलं आहे. एकदा का एखादं स्थळ जागतिक वारसा यादीत सामील झालं, की त्याच्या देखभालीची आर्थिक जबाबदारी युनेस्को घेतं. भारत हे जगातल्या तब्बल ३६ जागतिक वारसा स्थळांचं घर आहे. या आधारावर भारताचा जगात ६वा क्रमांक लागतो.

मंडळी, आज आम्ही घेऊन आलो आहोत या ३६ मधून १३ निवडक स्थळांची यादी. ही यादी बघून तुम्हालाही तेथे जाण्याचा मोह आवरणार नाही. चला तर पाहूया !!

१. पश्चिम घाट (सह्याद्री) – गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू.

भारताच्या पश्चिमेकडील गुजरात पासून ते दक्षिणेत तामिळनाडू पर्यंत पसरलेल्या पश्चिम घाट अर्थात आपल्या सह्याद्री डोंगररांगेला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलं आहे. सह्याद्रीचा भाग त्याच्या जैवविविधतेसाठी ओळखला जातो. जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणार्‍या आठ जागांपैकी सह्याद्री एक आहे.  याच सह्याद्रीत महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या ठिकाणांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाईचं शिखर, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर आणि महाराष्ट्राची शान असलेले अनेक गडकिल्ले.

२. कोणार्क सूर्यमंदिर – ओडीसा

कोणार्कचं सूर्यमंदिर म्हणजे बारा चाके आणि सात घोडे असलेला एक सूर्यरथ आहे. हा भारतीय स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो. भारतात अशा प्रकारची मंदिर रचना दुसऱ्या कोणत्याही मंदिरात दिसत नाही.

३. राजस्थानचे डोंगरी किल्ले (दुर्ग)

चित्तोडगढ किल्ला, कुंभलगढ किल्ला, रंथांबोर किल्ला, आमेर दुर्ग, गागरौन दुर्ग आणि जैसलमेर दुर्ग, अशा राजस्थानच्या सगळ्याच गिरिदुर्गांचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा यादीत करून घेतला आहे. हे डोंगरी किल्ले राजपूत शासनाच्या कालखंडाची साक्ष देत आजही सुस्थितीत उभे आहेत. या किल्ल्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्थापत्यकला. त्यांचा कालावधी अगदी ५ व्या शतकापासून ते १८ व्या शतकापर्यंत पसरला आहे.

४. राणी की बाव – गुजरात

‘राणी की बाव’ ही एक प्रचंड विहीर आहे, पण त्याची रचना अत्यंत कलात्मकतेने केली गेली आहे. या विहिरीचं बांधकाम १०६३ साली चालुक्य राज्यकाळात करण्यात आलं. ही विहीर म्हणजे चालुक्य राजा भीम पहिला याच्या आठवणीत त्याच्या राणीने बांधलेलं स्मारक आहे. नुकतंच शंभरच्या नोटेवर ‘राणी की बाव’ ला स्थान देण्यात आलंय.

५. भीमबेटका – मध्यप्रदेश

भारतातील आदिम संस्कृतीचे अवशेष असलेलं भीमबेटका हे एक प्रमुख ठिकाण. इतिहासतज्ञांच्या मते जवळजवळ १ लाख वर्षापूर्वी आदिम मानवाचं हे वसतीस्थान होतं. भारतातील सर्वात प्राचीन भित्तीचित्रे भीमबेटका येथील गुहेत सापडतात. या भित्तीचित्रांचा काळ हा आजपासून ३०.००० वर्षापूर्वीचा आहे.

६. खजुराहो - मध्यप्रदेश

खजुराहो या ठिकाणी हिंदू आणि जैन मंदिरांचा समूह आढळतो. खजुराहो हे विशेषतः कामशिल्पाकरिता ओळखलं जातं, पण याखेरीज तत्कालीन समाजजीवनातील दैनंदिन गोष्टी शिल्पांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. युद्ध, शिकार, नृत्य, देवदेवता, शैक्षणिक पद्धती, इत्यादी गोष्टींना शिल्परूप देण्यात आलं आहे.

७. महाबलीपुरम - तामिळनाडू

महाबलीपुरम हे तामिळनाडूचं ७व्या शतकातील एक महत्वाचं बंदर होतं. या शहराला आज मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. भव्य मंदिर आणि द्राविडी स्थापत्यकेलसाठी हा भाग महत्वाचा मानला जातो.

८. अजिंठा-वेरूळ गुहा - महाराष्ट्र

अजिंठा येथे २९ तर वेरूळ येथे ३४ लेण्यांचा समूह आढळतो. वेरूळ येथील लेण्याचं वैशिष्ट्य हे स्थापत्यकला असून तेथे बौद्ध, हिंदू आणि जैन शिल्प आढळतात. अजिंठा येथील लेण्या ह्या प्रामुख्याने भित्तिचित्रांसाठी ओळखल्या जातात. जातक कथेतील अनेक प्रसंगांना अजिंठ्याच्या लेण्यात चितारण्यात आलं आहे.

९. हम्पी - कर्नाटक

हम्पी हे विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण. युनेस्कोने संपूर्ण हम्पी गावालाच जागतिक वारसा यादीत स्थान दिलं आहे. हम्पी येथील मंदिरं आणि शिल्पे पाहण्यासारखी आहेत. येथील विरुपाक्ष मंदिर विशेष प्रसिद्ध आहे.

१०. ताजमहाल – उत्तरप्रदेश

आग्र्याचं ताजमहाल हे मुळात एक स्मारक आहे. याचा जगातील ७ आश्चर्यात समावेश होतो. ताजमहालची संगमरवरातील रचना हे त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. मुघल स्थापत्यशैलीचं ताजमहाल हे एक उत्तम उदाहरण आहे.  

११. गोव्याचे चर्चेस

गोव्याचे चर्चेस आणि धर्मस्थळांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे. याचं कारण म्हणजे तिथली वास्तुकला. प्रत्येक चर्च हे पोर्तुगीज वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

१२. भारताची पहाडी रेल्वे लाईन - ईशान्य भारत

भारतातील प्रमुख अशा ३ पर्वतीय रेल्वे मार्गांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे. दार्जीलिंग रेल्वे, निलगिरी रेल्वे, काल्का-शिमला रेल्वे हे ते तीन रेल्वेमार्ग. या रेल्वेमार्गांना १९ व्या व २० व्या शतकात बांधण्यात आलं. हे रेल्वे मार्ग ज्या भागातून जातात तिथलं निसर्गसौंदर्य हे पाहण्याजोगं आहे.

१३. ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान - हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू भागातील ७५४.४ स्क्वेअर किलोमीटर जागेत ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान वसलेलं आहे. हे राष्ट्रीय उद्यान तिथल्या जैवविविधतेसाठी ओळखलं जातं. या भागात तब्बल ३७५ जातीचे वन्यजीव आढळतात. यासोबतच जगात कुठेही आढळणार नाही अशा वनस्पतींनी हे उद्यान भरलेलं आहे. हिमालयाच्या अगदी कुशीत असलेलं हे ठिकाण मनाला भुरळ घालणारं आहे.

 

मंडळी, यातल्या कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही गेला आहात ? आणि कोणकोणत्या ठिकाणी जायची इच्छा आहे ? सांगा बरं !!

सबस्क्राईब करा

* indicates required