computer

बोनमॅरो ट्रान्सप्लांट काय आहे आणि या ट्रान्सप्लांटने HIV कसा बरा होतो ??

HIV AIDS वर आजवर कोणताही उपचार उपलब्ध नव्हता. फक्त काही ठराविक उपचारांनी रोग्याच्या आयुष्मानात काही वर्षांची भर घालता येत होती. यापुढे मात्र HIV पूर्णपणे बरा होऊ शकतो अशी आशा दिसून येत आहे. नुकतंच लंडन मध्ये एका रुग्णाला पूर्णपणे HIV मुक्त करण्यात आलंय. 

काय आहे ही उपचार पद्धती ? HIV वर उपचार शोधण्यात आलाय असं आता म्हणता येऊ शकतं का ? चला तर सगळी माहिती घेऊया !!

तर, बोनमॅरो किंवा स्टीम सेल्स ट्रान्सप्लांट हा HIV वर उपचार म्हणून शोधण्यात आलेला नवीन मार्ग आहे. हा उपचार कालपरवापर्यंत कॅन्सरग्रस्त रुग्णांवर केला जायचा, पण आता तो HIV रुग्णांसाठी पण लागू पडू शकतो हे शोधून काढण्यात आलंय.

बोनमॅरो प्रत्यारोपण काय आहे ?

बोनमॅरो म्हणजे मराठीत अस्थिमज्जा. आणखी सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर, आपण हाड आपटून आपटून आतलं जे खाण्याचा प्रयत्न करतो त्यालाच बोनमॅरो म्हणतात. हाडांमधला या मऊ भाग अत्यंत महत्वाचा असतो. नवीन रक्तपेशी, नवीन हाड, चरबी बनवण्याचं काम या बोनमॅरोकडे असतं. या महत्वामुळेच प्रत्येकी १० ग्रॅम बोनमॅरोसाठी तब्बल १६ लाख रुपये मोजावे लागतात. 

तर, बोनमॅरो प्रत्यारोपण कॅन्सरच्या विशिष्ट प्रकारांवर इलाज म्हणून केला जातो. या प्रत्यारोपणाने निरोगी पेशी तयार होतात आणि कॅन्सर बरा होतो. यासाठी बाहेरून निरोगी बोनमॅरो बसवण्यात येतो.

HIV चा उपचार म्हणून मात्र या उपचाराकडे बघता येणार नाही, याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या HIV ग्रस्त रुग्णांना कॅन्सर झाला आहे त्यांच्यावरच हा उपचार करता येतो. लंडनच्या ज्या रुग्णावर या प्रत्यारोपणाचा प्रयोग करण्यात आला त्याला कॅन्सर झाला होता. 

बोनमॅरो प्रत्यारोपण हे खर्चीक तर आहेच पण रुग्णासाठी त्रासदायकही आहे. याखेरीज शरीर रचना हा महत्वाचा भाग होऊन बसतो. ज्या व्यक्तीकडून बोनमॅरो डोनेट केला जाणार आहे त्याची आणि रुग्णाची अनुवांशिक जुळणी होणे गरजेचे असते. सर्जरी झाल्यानंतर रुग्णाच्या रोगप्रतिकारक पेशींवर डोनरच्या रोगप्रतिकार शक्तींचा हल्ला होण्याची शक्यताही असते. अशा बाबींमुळे सर्वच HIV रुग्णांवर हा उपचार यशस्वी होईल असं म्हणता येणार नाही.

मंडळी, लंडनच्या रुग्णावर १८ महिन्यांपूर्वी हा उपचार करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या चाचणीत त्याच्या शरीरातून HIV चा विषाणू नष्ट झाल्याचं दिसून आलं. या उपचारांना पूर्णपणे बरा झालेला तो जगातला दुसरा रुग्ण ठरला आहे. यापूर्वी बर्लिनच्या रुग्णावर हा उपचार करण्यात आला होता.

जाता जाता :

आपण अधिकृतपणे बोनमॅरो दान करू शकतो. यासाठी आज काही मोजक्या NGO काम करत आहेत. Marrow Donor Registry  या NGO ने दिलेल्या माहितीप्रमाणे रोज वेगवेगळ्या कारणांनी जवळजवळ ३००० रुग्णांवर बोनमॅरो प्रत्यारोपणाची गरज पडते. यापैकी ३०% लोकांना बोनमॅरो मिळत नाही. या कामासाठी तुम्ही आम्ही हातभार लावू शकतो. डोळे, किडनी, रक्त दानासारखंच हेही महत्वाचं दान आहे.

 

तर मंडळी, विज्ञानाच्या या नवीन यशाबद्दल तुम्ही काय म्हणाल ?

सबस्क्राईब करा

* indicates required