'पॅन कार्ड'बद्दल या ५ गोष्टी माहिती आहेत का ?
Permanent Account Number म्हणजे (PAN) पॅन कार्ड हे एक महत्वाचं कागदपत्र आहे. कोर्टाच्या नवीन आदेशानुसार प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड गरजेचा नाही, त्यामुळे पॅन कार्डचं महत्व आणखी वाढलेलं आहे. ओळखपत्र सादर करायचं असेल किंवा महत्वाचा आर्थिक व्यवहार करायचा असेल तर आज पॅन कार्डला पर्याय नाही.
मंडळी, पॅन कार्ड गरजेचं असतं हे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, पण पॅन कार्ड बद्दल महत्वाची असलेली माहिती आपल्यातील फारच कमी लोकांना माहित असते. आज आम्ही पॅन कार्ड बद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी सांगणार आहोत.
१. पॅन कार्डसाठी कोणीही अर्ज करू शकतो
आपल्याला बऱ्याचदा असा समज असतो की वय वर्ष १८ पूर्ण झाल्यावरच पॅन कार्डसाठी अर्ज करता येतो. खरं तर पॅन कार्डसाठी अशी कोणतीही वयोमर्यादा ठेवण्यात आलेली नाही. १८ वर्षाखालील मुलांसाठी पण पॅन कार्ड बनवून मिळतो.
भारतात आर्थिक व्यवहार करायचा असल्यास NRI, परदेशी नागरिक किंवा परदेशी कंपन्यांना पण पॅन कार्डसाठी अर्ज करता येतो.
२. वडिलांचं नाव पॅन कार्डवर छापणे आवश्यक नाही.
जुन्या नियमानुसार वडिलांचं नाव पॅन कार्डवर छापणे अनिवार्य होते. ५ डिसेंबर २०१८ पासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार वडिलांचं नाव कार्डवर लावणे हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे.
३. १० अंकी पॅन कार्ड क्रमांकात लपली आहे कार्ड धारकाची माहिती
१० अंकी अल्फान्यूमेरिक पॅन कार्ड क्रमांकात सुरुवातीचे ५ अंक ही अक्षरं ठेवण्यात आली आहेत. सुरुवातीची ३ अक्षरं ही A-Z पर्यंतचे सिरीज क्रमांक दाखवतात. चौथं अक्षर हे कार्ड नेमकं कोणाचं आहे याबद्दलची माहिती देतं. उदाहरणार्थ, P - Person, C - Companies, F - Firms, A -Associations, T – Trusts. पाचवं अक्षर हे त्या व्यक्तीच्या आडनावातील पाहिलं अक्षर असतं.
४. पॅन कार्ड तत्काळ मिळू शकतो
गरजेच्या वेळी पॅन कार्ड तत्काळ मिळू शकतं. यासाठीची प्रोसेस अत्यंत सोप्पी आहे. NSDL किंवा UTIITSL या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज आणि प्रोसेसिंग फीज भरली की लवकरात लवकर पॅन कार्ड मिळू शकतं.
५. पॅन कार्डवर असलेली ती विशिष्ट तारीख
पॅन कार्डवर जिथे आपला फोटो असतो त्याच्या कोपऱ्यात आडव्या बाजूने एक तारीख छापलेली असते. ती तारीख म्हणजे पॅन कार्ड कधी जारी करण्यात आलं याची तारीख असते.
तर मंडळी, पॅन कार्ड बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित होत्या का ?