सहकाऱ्याच्या पादण्याच्या सवयीमुळे त्याने घेतली कोर्टात धाव....मागितली तब्बल एवढी मोठी भरपाई !!
राव, पादणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे, पण त्याचा आजूबाजूच्या लोकांना त्रासही होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया मधल्या माणसाला पादण्याचा इतका त्रास झाला की त्याने चक्क कोर्टात धाव घेतली आहे. अहो जोक नाही खरंच !!! काय आहे प्रकरण ? चला जाणून घेऊया.
डेव्हिड हिंग्स याने ग्रेग शॉर्ट नावाच्या आपल्या सहकाऱ्यांविरोधात हा खटला दाखल केला आहे. तो म्हणतो की ग्रेग त्याला त्रास देण्यासाठी तो काम करत असलेल्या खोलीत येऊन मुद्दाम पादायचा. ही खोली खूपच लहान होती, तिथे खिडक्या पण नव्हत्या त्यामुळे ग्रेगच्या या कृत्याने डेव्हिड वैतागला होता. हे एक दोनदा नव्हे तर दिवसातून ६ वेळा व्हायचं राव. या त्रासाची भरपाई म्हणून त्याने १.८ मिलियन म्हणजे जवळजवळ १२.४ कोटी रुपयांची मागणी केली आहे.
हा जोक वाटू शकतो पण हे प्रकरण खरोखर कोर्टात गेलं आहे आणि कोर्टाने यावर आपलं मत पण दिलंय. कोर्टाने म्हटलं की या केस मध्ये ग्रेगने त्रास देण्याच्या हेतूने असं केल्याचं दिसत नाहीय. कोर्टाचा हा निकाल गेल्यावर्षी आला होता. त्यानंतर यावर्षी पुन्हा एकदा ही केस कोर्टात गेली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा यावर सुनावणी होणार आहे.
मंडळी, ग्रेगचं यावर काय म्हणणं आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. तो म्हणतो की ‘मी एक दोनदा पादलो असेनही पण मी डेव्हिडला त्रास देण्याच्या हेतूने हे केलेलं नाही.’ याविरुद्ध डेव्हिड म्हणतो की ग्रेगने ऑफिस मध्ये मानसिक त्रास देण्यासोबतच फोनवर शिवीगाळ पण केली होती.
मंडळी, या सगळ्या प्रकरणावर आता कोर्ट काय निर्णय देणार हे आता पाहण्यासारखं असेल. तुमच्या असा काही अनुभव असेल तर आमच्याशी नक्की शेअर करा !!
आणखी वाचा :