वेदनेच्या पलीकडे गेलेल्या आज्जीबाई- काय असतो हा आजार?
‘मर्द को दर्द नही होता’ नावाचा एक सिनेमा नुकताच येऊन गेला. त्या सिनेमातला नायक हा “कांजिनेटियल इनसेंसिटिवीटी टू पेन” आजाराने ग्रस्त असतो. हा आजार असलेल्या व्यक्तीला ‘दर्द’ म्हणजे ‘वेदना’ जाणवत नाहीत. सिनेमाचा अर्थ तुम्हाला समजला असेलच.
मंडळी, नुकतंच एका ७० वर्षाच्या महिलेत असाच प्रकार आढळून आला, पण या महिलेत आढलेला प्रकार ‘कांजिनेटियल इनसेंसिटिवीटी टू पेन’ पेक्षा वेगळा आणि चकित करणारा आहे. चला तर या बाईंना भेटूया !!
जो कॅमरून या आजीबाई ७१ वर्षांच्या आहेत. त्यांना वयाच्या ६५ पर्यंत हे माहितीच नव्हतं की ते संपूर्ण मानव जातीत वेगळ्या आहेत. त्यांचं हे वेगळेपण त्यांच्या शरीरात होतं. त्यांना अनेकदा शारीरिक इजांना सामोरं जावं लागलं आहे. जसे की, जखम, हाड मोडणे, भाजणे एवढंच काय त्यांच्यावर शस्त्रक्रिया पण झाल्या आहेत. पण त्यांना कधीच त्याचा त्रास नाही झाला. त्यांना कधी वेदना जाणवलीच नाही. जेव्हा जेव्हा डॉक्टरांनी त्यांना अनेस्थेशिया सारख्या वेदना शमवणारी औषधं देऊ केली तेव्हा त्यांनी साफ नकार दिला. कारण इस “स्त्री को दर्द नही होता”.
मंडळी, काही वेळा तर असं झालं आहे की स्वयंपाक करताना त्यांनी स्वतःला भाजून घेतलं आहे. स्वतःच्याच मांसाचा जळका वास येऊ लागल्यावर त्यांना आपल्याला भाजलंय हे समजलं. प्रकरण किती गंभीर आहे बघा म्हणजे !!
हे झालं शरीराच्या बाबतीत. त्यांना वेगळं ठरवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचा स्वभाव नेहमी ‘कुल’ असतो. एकदा तर एका नवीन शिकाऊ ड्राईव्हरने त्यांचा अपघात केला, तर या बाईंमध्ये भीती, वेदना, राग असे कोणतेच हावभाव दिसून आले नाहीत. त्या ड्राईव्हरवर चिडल्या तर नाहीच उलट त्याला मदतच केली. त्यांना स्वतःला पण जखमा झाल्या आहेत हे अर्थातच त्यांना नंतर लक्षात आलं.
मंडळी, जो कॅमरून यांचं हे असं अजब आयुष्य चाललं असताना ६५ वयापर्यंत त्यांना आपण वेगळे आहोत हे माहित नव्हतं. एकदा त्यांच्यावर सर्जरी करण्यात येणार होती. सर्जरीच्या वेळी त्यांनी नेहमीप्रमाणे कोणतंही वेदना शामक औषध नको म्हणून सांगितलं. डॉक्टरांसाठी हे धक्कादायक होतं. त्यांनी जो यांच्यावर संशोधन केलं. संशोधनात जे आढळलं ते फारच दुर्मिळ होतं.
जो कॅमेरून यांच्यात दोन जनुकीय बदल (genetic mutations) झाले आहेत. या बदलांमुळे त्यांना वेदना होत नाहीत सोबतच हेच बदल त्यांच्यात जास्तीत जास्त आनंद आणि क्षमाशीलता निर्माण करतात.
जो यांच्या DNA चा आणखी अभ्यास करण्यात येणार आहे. त्यांचे जीन्स कसे काम करतात हे शोधून काढणं आता एक आवाहन आहे. हे विशिष्ट जनुकीय बदल कसे होतात हे शोधून काढल्यावर आजारांवर नवीन उपचार शोधून काढला जाऊ शकतो.
जो कॅमरून खरोखर लकी आहेत का ?
त्यांची सुपर ह्युमन स्टोरी वाचून त्या किती भारी आयुष्य जगत आहेत असंच आपल्याला वाटू शकतं, पण याची दुसरी बाजू पण लक्षात घ्यायला हवी. कोणत्याही प्राण्यात वेदना ही जगण्यासाठी गरजेची असते. वेदनाच नसतील तर शरीराला हे समजणारच नाही की आपण धोक्यात आहोत. जसे की जो यांच्या केस मध्ये त्यांना भाजल्याचं समजलंच नव्हतं. अशावेळी गंभीर दुखापत होऊ शकते आणि ती आपल्याला शेवटच्या क्षणी समजू शकते. तोवर बराच उशीर झालेला असू शकतो. “कांजिनेटियल इनसेंसिटिवीटी टू पेन” आजार असणाऱ्या व्यक्तींना अशा गोष्टींचा अनुभव येतो. अशावेळी वेदना कशाला म्हणतात हेच मुळात शिकवण्याची वेळ येऊ शकते.
तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं या अजब आजाराविषयी ? आम्हाला नक्की सांगा !!