इस्रायलने आतापर्यंत फक्त या एका गुन्हेगाराला फाशी दिलीय, काय आहे त्याचा गुन्हा?

६० लाख ज्यूंची कत्तल करणाऱ्या आइकमनच्या मुसक्या कशा बांधल्या ?? भाग - १
या जगातून यहुद्यांचा निर्वंश करावा अशा वेड्या विचाराने पछाडलेल्या अॅडॉल्फ हिटलरच्या दु:स्वप्नाला साकार करण्यासाठी ६० लाख यहुद्यांना मारणारा अॅडॉल्फ आइकमन !! या मारेकर्याला अज्ञातवासातून शोधून, त्याची अर्जेंटीनातून उचलबांगडी करून, कोर्टासमोर उभा करून, सरतेशेवटी फाशी देणार्या इस्राएलच्या चित्तथरारक प्रयत्नांची ही कथा आहे.
नाझी हंटर्स, लोथार हर्मन नावाचा छळछावणीतला बंदी आणि अर्थातच मोसाद, या सर्वांच्या मोहिमेत अर्जेंटिनातल्या १४-गॅरीबाल्डी स्ट्रीटवर राहणारा-मर्सिडीझ बेंझ या कंपनीत काम करणारा इसम अॅडॉल्फ आइकमनच आहे हे निश्चित झाले.
....पण पुढे काय हा प्रश्नही मोठा होता. सनदशीर मार्गाने आइकमनचा ताबा मिळणे अत्यंत कठीण होते. इस्राईल आणि अर्जेंटीना या राष्ट्रात गुन्हेगार प्रत्यार्पणाचा करार नव्हता. या अगोदर जे इतर युध्दकैदी ताब्यात घेण्याचे प्रस्ताव अर्जेंटीनासमोर आले होते, ते त्यांनी नाकारले होते. थोडक्यात- जर आइकमनला उचलायचे झाले तर काहीतरी वेगळीच पावले उचलायला लागतील याची मोसादला कल्पना आली आणि मोसादने आइकमनला पळवून इस्राईलला आणायचे ठरवले.
(ब्यूनॉस आयर्स)
आइकमनचे अपहरण करणे हा एकच पर्याय उरल्यावर त्याची ओळख पुन्हा एकदा शाबीत करून घेणे आवश्यक होते. ही कामगिरी झुवी आहोरानी नावाच्या ‘शिन बेट’च्या गुप्तहेरानी पार पाडली. शिन बेट (शबाक) ही इस्राईलची देशांतर्गत काम करणारी गुप्तहेर संस्था आहे. पण मोसादच्या अनेक देशाबाहेरच्या कारवायांमध्येही शिन बेट भाग घेते. शिन बेटचे कर्मचारी नकली कागदपत्र बनवणे, शस्त्रास्त्रांची ने-आण करणे, पाळत ठेवणे अशा कामात तरबेज असतात. हे सगळं होताहोता मोसादला त्यांचे पंतप्रधान बेन गुरीयन यांची अधिकृत परवानगी मिळाली आणि ‘राफाल एटन’ (राफी एतन) च्या नेतृत्वाखाली आठ जणांची टीम आईकमनची उचलबांगडी करायला अर्जेंटिनात पोहचली.
आईकमनला पळवून नेण्याची तयारी...
(राफाल एटन)
सुरुवातीचे काही दिवस आइकमनच्या दैनंदिन कार्यक्रमावर नजर ठेवण्यात गेले. या दरम्यान मोसादने अर्जेंटिनामध्ये ब्यूनॉस आयर्सला एक 'सेफ हाऊस' तयार केले. बरेच दिवस पाळत ठेवल्यावर राफाल एतन आणि त्याच्या टीमला आइकमनच्या येण्याजाण्याच्या वेळा नक्की करता आल्या. सकाळी त्याचं अपहरण करण्यापेक्षा संध्याकाळची वेळ निश्चित करण्यात आली. हे एक आंतरराष्ट्रीय अनधिकृत ऑपरेशन असल्यामुळे छोटी चूक देखील महाग पडली असती. पण प्रखर राष्ट्रवादाने झपाटलेल्या इस्राईली टीमने संपूर्ण तयारी केली होती.
ऐनवेळी काही गोंधळ झाला तर वेगवेगळ्या ठिकाणी सेफ हाऊस तयार होतेच. हा प्रवास दक्षिण अमेरिका ते इस्राईल असा तब्बल १२,००० किलोमीटरचा होता. इतर कुठल्याही विमानसेवेचा उपयोग या कामासाठी होणार नव्हता. म्हणून एल-अल या इस्राईली एअरलाईन्सचे विमान ब्यूनॉस आयर्सच्या धावपट्टीवर तयार ठेवण्यात आले. आइकमनच्या मापाचा एअरलाईन कर्मचाऱ्याचा गणवेश तयार ठेवण्यात आला होता. आता समस्या होती कागदपत्रांची.
(एल-अल विमान एअरलाईन्सचे विमान)
त्या विमानतळावर एक ज्यू महिला कर्मचारी म्हणून काम करत होती. तिला हे कागदपत्र तयार ठेवण्याची विनंती केली गेली. शेवटपर्यंत या महिलेला हे माहिती नव्हते की ती एका आंतरराष्ट्रीय घटनेचा भाग होणार आहे. नंतरच्या काळात कागदपत्रावर तिच्या सह्या असल्याने तिला अर्जेन्टिना मधून हाकलून देण्यात आले. यावर तिची प्रतिक्रिया अशी होती की “मी माझ्या देशासाठी हे काम केले, पण वाईट इतकंच वाटतं की मला या कारवाईची शेवटपर्यंत कल्पना नव्हती.”
आईकमनचं प्रत्यक्ष अपहरण नाट्य-
...आणि अखेरीस तो दिवस म्हणजे ११ मे १९६० उजाडला. पण संध्याकाळी ठरलेल्या बसमधून आइकमन उतरलाच नाही. दबा धरून बसलेल्या इस्राईली टीमचे धाबे दणाणले, पण थोड्या वेळापुरतेच. नंतरच्या अर्ध्या तासाने येणाऱ्या बसमधून आइकमन उतरल्यावर पीटर माल्किन या मोसादच्या एजंटने त्याला हटकले आणि पुढच्या क्षणी इतर एजंटनी त्याला जमिनीवर लोळवून त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याला कारमध्ये कोंबण्यात आले.
पुढचे काही दिवस एका सेफ हाऊसमध्ये आइकमनवर प्रश्नांचा भडीमार करून जास्तीतजास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. खरं तर हे काम इस्राईलला पोहोचल्यानंतरही करता आलं असतं. पण याच दरम्यान डॉक्टर मेंगल या क्रूरकर्मा डॉक्टरचीही वळकटी बांधण्याचा मोसादचा मनसुबा होता. पण मेंगेल ऐनवेळेवर चकवा देण्यात सफल झाला. मोसादच्या टीमने फक्त आइकमनला घेऊन इस्राईलकडे कूच करण्याचा निर्णय घेतला
२० मे रोजी आइकमनला गुंगीचे इंजेक्शन देऊन त्याला एल-अलचा गणवेश घालून विमानात ठेवले गेले. एल-अलचा एक आजारी कर्मचारी विमानाने जातो आहे हे दाखवण्यात मोसादच्या टीमला यश आले. थोड्याच वेळात विमानाने धावपट्टी सोडली आणि २२ मे रोजी आइकमन इस्राईलमध्ये पोहोचला. २३ मे च्या दुपारी इस्राईली पंतप्रधान बेन गुरियन यांनी आइकमन इस्राईलच्या ताब्यात आल्याची घोषणा केली.
आईकमनला पळवून नेल्यावर जगभर प्रतिक्रिया-
आइकमनच्या अपहरणाची बातमी जाहीर झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रचंड गदारोळ झाला. अर्जेन्टिनाने हा आमच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे असे म्हणत युनोकडे धाव घेतली. युनोसमोर आइकमनला ब्युनॉस आयर्समधून पळवून आणल्याची कबुली देताना इस्राईली प्रतिनिधी गोल्डा मायर यांनी अपहरणाचे काम काही खाजगी व्यक्तींनी एकत्र येऊन केले असे स्पष्टीकरण दिले. पुढे काय घडले हे नक्की कोणालाच कळले नाही. पण अर्जेन्टिनाने माघार घेऊन आइकमन या विषयावर बोलणं बंद केलं. प्रश्न असा पडतो की अमेरिकन नेतृत्वाने इस्राईलच्या आक्रमक कृतीवर हरकत का नाही घेतली? याचं सोप्पं उत्तर असंही असू शकतं की अमेरिकन अर्थव्यवस्था ही मुठभर नामांकित आणि श्रीमंत ज्यूंच्या ताब्यात आहे.
आईकमन खटला -
इस्राईलने आइकमनचा खटला जनतेसमोर खुला ठेवला. आइकमनला त्याचं म्हणणं मांडण्याची पूर्ण परवानगी देण्यात आली होती. त्याच्यासाठी वकील पण उपलब्ध करून दिला होता. आइकमनने आपल्या जबाबात असे म्हटले होते की “ऑपरेशन फिनाले ही माझी कल्पना नव्हती, मी राजकीय निर्णयाचा भाग नव्हतो. मी केवळ हुकुमाचा ताबेदार होतो, म्हणून मी गुन्हेगार नाही.” ही विधान खोडून काढण्यासाठी आणि आइकमनचे खरे स्वरूप जगासमोर आणण्यासाठी अशा खुल्या वातावरणाची आवश्यकता होती. आतापर्यंतचे सर्व खटले कागदोपत्री पुराव्यांवर आधारित होते, पण आइकमनच्या खटल्यात हॉलोकॉस्टमधून बचावलेल्या अनेक लोकांनी साक्षी द्यायला सुरुवात केली.
एकूण ३० प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि प्रचंड मोठी कागदपत्रांची जंत्री आइकमनला गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी कोर्टात दाखल करण्यात आली. एकूण ५५ दिवस हा खटला चालवण्यात आला. खटल्याच्या प्रत्येक दिवसाचे प्रत्यक्ष चित्रीकरण करून अमेरिकेत दुसऱ्या दिवशी टेलीव्हिजनवर प्रसारित केले जायचे. हे सर्व चित्रीकरण युट्युबवर आजही उपलब्ध आहे. खटल्याच्या प्रत्येक दिवशी आइकमनला बुलेटप्रूफ काचेच्या क्युबिकलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्या संरक्षणाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्याची बाजू मांडण्यासाठी वकील देण्यात आला होता. सुरुवातीला ‘मी केवळ नाममात्र होतो’ अशी भूमिका घेणाऱ्या आइकमनने शेवटी हे कबूल केले की ६० लाख ज्यूंच्या नरसंहाराला तो स्वतः जबाबदार आहे.
१२ डिसेंबर १९६१ रोजी एकूण १५ गुन्ह्यांबद्दल आइकमनला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. आइकमनला सुप्रीम कोर्टात अपील करण्याची संधी पण देण्यात आली, पण ३१ मे १९६२ रोजी अपील फेटाळण्यात आले.
१ जून १९६२ रोजी आईकमनला फाशी देऊन लटकावून न्याय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. इस्राईलच्या आजवरच्या इतिहासात दिली गेलेली ही एकमेव फाशीची शिक्षा आहे. आईकमनचे कुठेही स्मारक उभारले जाऊ नये म्हणून त्याचे दहन करून त्याची राख इस्राईली समुद्र सीमेच्या पलीकडे विखरून टाकण्यात आली.
हा इतिहास वाचल्यानंतर एक प्रश्न आमच्या बोभाटाच्या वाचकांच्या मनात नक्कीच येईल की आपणही अजहर मसूदला याच पद्धतीने उचलून आणून धडा शिकवू शकतो का? आणि आपण तसं का करत नाही? याचे उत्तर आपल्या भारताच्या जडणघडणीत लपलेले आहे. १५० वर्षांच्या ब्रिटीश राजवटीनंतर आपण अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवले आहे. आपल्या देशाचा प्रत्येक निर्णय आपण आशियामधली सर्वात मोठी लोकशाही आहोत हे लक्षात ठेवून घेतला जातो. अहिंसा, योग्य न्याय प्रक्रिया या दोन्हीचा विचार करून आपण हल्ल्याचे प्रत्युत्तर देत असतो. इस्रायलची निर्मिती एका प्रचंड मोठ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर झालेली आहे. त्यामुळे त्या देशाचे विचार आपल्याकडे जसेच्या तसे उचलून शक्य होणार नाही. हे आमचे विचार आहेत. तुमचे विचार काय आहेत हे प्रतिक्रियेतून आम्हाला नक्की कळवा.