डाळ बाटीच्या जन्माची कथा माहीत आहे का? लगोलग वाचून घ्या भाऊ
तर मंडळी आज आपण एका प्रसिद्ध खाद्यपदार्थाची जन्मकथा जाणून घेणार आहोत. तसं पाहिलं तर ही गोष्ट आपल्या जिव्हाळ्याची आहे, म्हणजेच आपल्या पोटोबाची. आपण जे खाद्यपदार्थ खातो त्यांचा काही एका दिवसात शोध लागलेला नसतो. काही पदार्थ अपघाताने शोधले जातात, काही मेहनतीने. काही पदार्थ मात्र पूर्वी अतिशय वेगळ्या पद्धतीने तयार केले जायचे. त्याचेच सुधारित रूप आज आपण खात असतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशीच एक कहाणी, एका लोकप्रिय राजस्थानी खाद्यपदार्थाची…. त्याचं नाव आहे दाल बाटी चुरमा!
बाटीची सुरुवात बाप्पा रावल यांच्या कारकिर्दीत झाली असे मानले जाते. बाप्पा रावल हे राजस्थान प्रांतातील मेवाड राज्याचे संस्थापक होते. त्या काळात टोळी युद्ध मोठ्या प्रमाणात चालायचे. बाप्पा रावल हे एक महान लढवय्ये होते. ते आणि त्यांची सेना जेव्हा युद्धाला निघायची तेव्हा कणकेचे गोळे सोबत घेत असत. आता युद्ध म्हटले की बाकी गोष्टी गौण ठरतात. या सैनिकांसाठी स्वयंपाक कोण करणार? आणि सैनिक स्वयंपाक करत बसणार की लढाई करणार? यावर उपाय म्हणून सैनिकांनी एक प्रयोग केला. युद्धावर जाण्यापुर्वी कणकेच्या गोळ्यांचे छोटे छोटे भाग करून ते त्यांनी वाळूत पुरले. दिवसभराच्या रणरणत्या उन्हात गरम वाळूमध्ये ते गोळे व्यवस्थित भाजले गेले आणि खाण्यायोग्य बनले. हीच ती बाटीची सुरुवात! मग या बाटीला अधिक चवदार बनवण्यासाठी गव्हाच्या, बाजरीच्या, ज्वारीच्या पिठामध्ये तूप आणि उंटीणीचे दूध कालवून त्याचे गोळे बनवले जाऊ लागले.
(बाप्पा रावल)
मंडळी, म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. अगदी खरे आहे ते. याच गरजेपोटी आज प्रसिद्ध असणाऱ्या दाल बाटीचा शोध लागला आहे. त्या काळी फक्त बाटी खाल्ली जायची. ही बाटी उपलब्ध असणारे दूध, तूप कधी ताक किंवा दही यासारख्या पदार्थांसोबत खाल्ली जायची. नंतर सांस्कृतिक स्थिरता आल्यानंतर बाटी सोबत दाल आली आणि या दोघांचा मेळ असा जमला की जणू ते एकमेकांसाठीच जन्माला आले आहेत. आज दाल बाटी कॉम्बिनेशनला जगन्मान्यता मिळाली असली तरी मूळ राजस्थान मधील खेड्यात आजही बाटी उंटीणीच्या दुधापासून बनवलेल्या तुपासोबतच खाल्ली जाते.
या दाल बाटीची कथा जितकी मनोरंजक आहे तितकीच चुरम्याची कथा सुद्धा. मुळात चुरमा म्हणजे काय तर बाटी मध्ये गुळ किंवा साखर घालून केलेला चुरा! याच्या जन्माची कथा अशी सांगितली जाते की, एकदा एका आचाऱ्याकडून चुकून बाटीमध्ये उसाचा रस पडला. त्याने सहज ते मिश्रण चाखून पाहिले असता त्याला ती भन्नाट चव आवडली आणि त्याने चुरम्याचा प्रसार केला. काही जण असे सांगतात की राजस्थानी महिला पती येईपर्यंत बाटी ताजी राहावी म्हणून तिला साखरेच्या डब्यात भरून ठेवत असत. एकदा बाटीला साखर तशीच राहिली आणि पतीराजांना ती चव आवडली. मग त्यांनी चुरा करून ते मिश्रण कालवून देण्याचा हुकूम सोडला आणि अश्यातर्हेने चुरमा जन्मला! काही का असेना मंडळी, हा चुरमा पण चवीला अफाट लागतो बरं का.
या बाटीचा एक भाऊ पण आहे… त्याचं नाव बाफला! दोन्हीत जास्त फरक नाही. बाटी भाजली जाते तर बाफला वाफेवर शिजवला जातो इतकंच.
तर मंडळी, दाल बाटी चुरमा हे एक ‘परफेक्ट फुल मिल’ समजलं जातं. याला राजस्थानी लोक पूर्णान्न असे म्हणतात. एकदा हे खाल्लं की दिवसभराची निश्चिती समजा! तुम्ही अद्याप ही डिश खाल्ली नसेल तर जरूर खा. तुम्हाला नक्की आवडणार. पण शक्यतो एखादया चांगल्या पारंपरिक राजस्थानी हॉटेल मध्ये किंवा आपल्या मारवाडी मित्राच्या/मैत्रिणीच्या घरीच याची चव चाखा, नाहीतर भ्रमनिरास होऊ शकतो.
लेख कसा वाटला ते कमेंटबॉक्स मध्ये नक्की कळवा, आणि शेअर करायला तुम्ही विसरणार नाही याची खात्री आहेच.