computer

विमानाचा रंग पांढराच का असतो ? अर्थशास्त्र आणि विज्ञानाकडे आहे याचं उत्तर !!

राव, तुम्ही कधी विचार केला होता का विमान फक्त पांढऱ्या रंगातच का असतं. विमानावर कंपनीचा लोगो असतो, काही विमान जाहिरात पण करतात जसे की आपल्या रजनी अण्णांच्या कबालीसाठी एअर एशियाच्या विमानावर रजनी अण्णांचा फोटो लावण्यात आला होता. अशी छोटीमोठी उदाहरणं सोडली तर मुख्य रंग हा पांढराच ठेवला जातो. का ? सोप्पंय, कारण हा नियम आहे, पण हा नियम का आहे ? याचं उत्तर मात्र थोडं समजून घ्यावं लागेल.

चला तर आज विमानाच्या पांढऱ्या रंगामागचं गुपित जाणून घेऊया.

या पांढऱ्या रंगाबद्दल विज्ञान आणि अर्थशास्त्र या दोन विभागांकडे अगदी ठोस करणं आहेत. आधी विज्ञानाचं म्हणणं ऐकुया.

उष्णतेसंबंधी असलेल्या विज्ञानाच्या ‘थर्मल सायन्स’ या शाखेने याचं उत्तर दिलंय. पांढरा रंग हा सूर्यकिरण परावर्तीत करतो. म्हणजे सूर्यकिरण आत शोषले जात नाहीत. त्यामुळे विमानाला पांढरा रंग दिल्याने विमानाचं तापमान थंड राहतं. याखेरीज पांढऱ्या रंगामुळे घातक किरणोत्सर्जन रोखला जातो.

बऱ्याचदा विमान आणि पक्षांची धडक होते. २०११ च्या एका संशोधनानुसार पांढऱ्या विमानाशी पक्षांची धडक सर्वात कमी वेळा झाली आहे. याचं कारण असं की पक्षांना पांढरा रंग लवकर ओळखू येतो आणि ते त्यानुसार आपल्या उडण्याची दिशा बदलतात.

आता वाचूया अर्थशास्त्र काय म्हणतंय ते.

एका बाजू झाली विज्ञानाची तर दुसरी बाजू आहे अर्थशास्त्राची. अर्थशास्त्राच्या दृष्टीने एकंच उत्तर आहे – बचत. एक विमान रंगवायला तब्बल २४६ लिटर (६५ गॅलन) रंग लागतो. सर्वात स्वस्त आणि झगामगा नसलेला रंग म्हणजे पांढरा.

विमानाला वेगवेगळे रंग जरी दिले तरी तो रंग काही काळाने उतरून पांढराच होणार आहे हे कोणीही मान्य करेल. सारखं सारखं रंग लावून सजावट करायला वेळ आणि पैसा दोन्ही मोठ्याप्रमाणात लागू शकतो. यावर शिक्कामोर्तब करायला विज्ञान पांढऱ्या रंगावरच येऊन थांबतं.

राव, आता आपल्यातले काही लोक म्हणतील की एवढीच बचत करायची असेल तर पेंटच कशाला करताय. त्याचं कसं आहे ना, रंग नसेल तर विमानाच्या संगाड्याचं नुकसान होऊ शकतं. अर्थशास्त्राच्याच भाषेत सांगायचं झालं तर विमानाच्या ‘पॉलिशिंग’ला रंग लावण्यापेक्षा जास्त खर्च येतो. म्हणजे आपण येऊन जाऊन एकाच जागी आलो.

तर मंडळी, या दोन ज्ञान शाखांनी सांगितलेल्या ज्ञानाच्या गोष्टींमुळे विमान हे पांढरेच असतात. हा लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका राव.

 

 

 

आणखी वाचा :

काय म्हणता, चक्क दोन आणि चार मिनिटांचे विमान प्रवास ? कोण आणि कुठे करतं असले प्रवास ?

‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय ? विमानात ब्लॅक बॉक्स महत्वाचा का असतो ??

विमानातल्या ऑक्सिजन मास्कमधला ऑक्सिजन इथून येतो बरं !!

विमानाच्या खिडक्यांना असलेल्या या छिद्रामागाचे लॉजिक पटकन वाचून घ्या बरे !!

सबस्क्राईब करा

* indicates required