व्हिडीओ ऑफ दि डे : ज्याला गुप्तहेर समजत होते तो तर 'देव मासा' निघाला... !!
काही दिवसांपूर्वी नॉर्वेच्या समुद्रात एक व्हेल मासा आढळून आला होता. या माशाच्या गळ्याभोवती संशयास्पद हार्नेस म्हणजे पट्टा होता. यावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की या माशाला रशियाने गुप्तहेरी करण्यासाठी खास ट्रेनिंग दिली आहे. या हार्नेसचा वापर कॅमेरासाठी किंवा अन्य उपकरणांसाठी होतो. या संशयाला बळकटी मिळण्याचं कारण म्हणजे हार्नेस वर लिहिलेली “‘इक्युपमेंट ऑफ सेंट पीटसबर्ग’ ही अक्षरं.
राव, या व्हेल माशाबद्दल आज एक नवीन बातमी आली आहे. ही बातमी गुप्तहेरीची नाही तर या व्हेलच्या कनवाळूपणाची आहे.
इना मन्सिका आणि तिचे काही मित्र नॉर्वेच्या त्याच समुद्रकिनाऱ्यावर गेले होते जिथे हा मासा आढळला होता. ते खरं तर या माशालाच पाहायला गेले होते. त्यांच्या सुदैवाने मासा दिसलाही, पण मन्सिका जेव्हा माशाच्या अगदी जवळ गेली तेव्हा तिच्या शर्टच्या खिशात ठेवलेला आयफोन पाण्यात पडला. तिला वाटला “गेला आपला फोन”, पण.......
यावेळी त्या व्हेलने क्षणाचाही उशीर न करता पाण्यात जाऊन आयफोन तोंडात पकडला आणि मन्सिकाला आणून दिला. भाऊ हे खोटं वाटत असेल तर हा व्हिडीओ पाहा.
राव, व्हेलने दाखवलेली चपळाई बघण्यासारखी होती, पण तो आयफोन खराब होण्यापासून वाचवू शकला नाही. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्याचं काम मन्सिकाच्या मित्राने केलं आहे.
मंडळी, ज्याला सर्व जग रशियन गुप्तहेर म्हणत होतं तो असं काही करेल हे अनपेक्षित वाटतं. याचं उत्तर कदाचित या व्हेलच्या प्रजातीत असावं.
हा व्हेल मासा पांढऱ्या रंगाचा आहे. या प्रजातीला बेलुगा व्हेल म्हणतात. व्हेलच्या या जातीतील मासे लहान आकाराचे असतात. बेलुगा व्हेलच्या डोक्यावर एक मोठा फुगवटा दिसेल. हा फुगवटा म्हणजेच त्यांचा मेंदू असतो. विज्ञान म्हणतं की जगातल्या हुशार प्राण्यांमध्ये बेलुगा व्हेलचा समावेश होतो. या माशाचा बुध्यांक हा १५५ आहे. म्हणजे माणसांच्या भाषेत ‘अत्यंत हुशार’.