जेव्हा १३ बॉल २२ वरून १ बॉल २२ ला टार्गेट येते...काय घडलं होतं १९९२ च्या वर्ल्डकप सेमीफायनल मध्ये ??
मित्रांनो, क्रिकेट म्हटले म्हणजे रोमांचकारी सामन्यांची अगदी रेलचेल असते. त्यात काही सामने तर इतिहासात अमर होऊन जातात.१९९२ वर्ल्डकप मधली एक मॅच पण अजून सर्वांच्या लक्षात आहे. आजवर पावसाने अनेक मॅचेसचा निकाल बदलून ठेवला आहे. या मॅचमध्ये पण असेच काहीसे झाले होते.
चला तर मंडळी बघूया या अविस्मरणीय मॅचमध्ये नेमके काय झाले होते...
२२ मार्च १९९२ साली ऑस्ट्रेलियात सिडनीच्या ग्राऊंडवर वर्ल्डकपच्या सेमीफायनलची मॅच सुरु होती. इंग्लंड आणि साऊथ आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या या मॅचमध्ये दोन्ही टीम्स फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जीवाचा आकांत करून लढत होत्या. यावर्षी साऊथ आफ्रिकेची टीम पहिल्यांदा वर्ल्डकप खेळत होती. तर इंग्लंडची टीममागच्या वर्ल्डकपमध्ये झालेली हार विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती.
इंग्लंडने २५३ रन्स केल्या होत्या. हे लक्ष्य पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या साऊथ आफ्रिकेच्या टीमला १३ बॉल्सवर २२ रन्सची आवश्यकता होती. इतक्या बॉल्समध्ये इतक्या रन्स करणे काही अवघड नाही ना? पण मंडळी, तेवढ्यात हवामानाने मॅचमध्ये रंगत आणली. पावसामुळे मॅच थांबवावी लागली. मॅच पुन्हा सुरू झाल्यावर साऊथ आफ्रिकेला ७ बॉल्सवर २२ रन्स करायचे होते. पण त्या दिवशी वरूणराजाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. पावसामुळे पुन्हा मॅच थांबवावी लागली. नंतर जे झाले ते क्रिकेट शौकीन आजवर विसरू शकलेले नाहीत. साऊथ आफ्रिकेला टार्गेट देण्यात आले १ बॉलवर २२ रन!
तुम्हाला वाटेल असे कसे झाले? पण मंडळी, त्याकाळी असा नियम होता कि जर पाऊस सुरू झाला तर जिच्यात सर्वात कमी रन्स असतील ती ओव्हर संपवण्यात येत असे. आणि आस्ट्रेलियाने मेडन ओव्हर टाकल्यामुळे ओव्हर्स कमी झाल्या, पण धावा जितक्याच्या तितक्याच राह्यल्या.
साऊथ आफ्रिकेने पण खूप संथ बॉलिंग केली. त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत फक्त ४५ ओव्हर्स टाकले. काही लोक तर असेही सांगतात कि पाऊस येणार असे माहीत असल्याने साऊथ आफ्रिकेने हळू बॉलिंग केली. १९८७ वर्ल्डकपपासून वनडे मॅच ५० ओव्हर्सची करण्यात आली होती. इंग्लंडने तेवढ्या ओव्हर्समध्ये ७ विकेट्सवर २५२ रन्स केले. इंग्लंडच्या बाजूने ग्रीम हिकने ८३ रन्स केले. हिकचे नशीब त्यादिवशी जोरावर होते. एकावेळी जवळून LBW चे जीवदान मिळाले तर एकदा तो कॅच आऊट असताना नो-बॉलमुळे तो पुन्हा वाचला.
(ग्रीम हिक)
जीवदान मिळाल्याने आजवर हरलेल्या मॅचेस जिंकल्याची उदाहरणे तुम्ही पाहिले असेल, इथे पण तसेच काहीसे झाले. आफ्रिकेकडून मात्र कुणीच साधे अर्धशतकसुद्धा करू शकले नाही. पण त्यांनी हळूहळू लक्ष्याकडे वाटचाल सुरू केली होती. ऐनवेळी पावसाने त्यांचा खेळ बिघडवला नसता तर कदाचित ते विजयी झाले असते. या मॅचमध्ये विजय मिळाल्याने इंग्लंड तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला, पण तिथे त्यांना ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली होती. त्यावर्षीची फायनलपण अटीतटीची झाली होती. अवघ्या ७ रन्सनी ऑस्ट्रलियाने ती मॅच जिंकली होती. ॲशेसमधील परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया समोरासमोर असल्याने आणि हा वर्ल्डकप पाकिस्तान आणि भारतमध्ये होत असल्याने तो पहिल्यांदा इंग्लंडबाहेर आयोजित करण्यात आला होता. साहजिकच पूर्ण जगाचे लक्ष या मॅचकडे लागून राहिले होते. १९८७ चा वर्ल्डकप जिंकल्यावर क्रिकेटमधली वेस्टइंडीजची मक्तेदारी मोडून काढत ऑस्ट्रलिया क्रिकेटचा नविन सम्राट झाला होता.
मंडळी, १९८७ चा वर्ल्डकप अनेकार्थाने वेगळा होता. ऑस्ट्रेलिया तिथून पुढे क्रिकेट जगतावर राज्य करणार होता. जगाला क्रिकेट देणारा इंग्लंड फायनलमध्ये हरल्यानंतर आजवर वर्ल्डकप जिंकला नाही. अनेक वर्षांच्या बॅननंतर वर्ल्डकपमध्ये उतरल्यावर आफ्रिका डायरेक्ट सेमीफायनलला पोचला होता. पण तिथून त्यांना पण सेमीफायनलमध्ये हरण्याचा शाप लागला. चॉकर्सचा शिक्का तेव्हापासून आजवर त्यांना पुसता आलेला नाही. गॅरी कर्स्टन, जॅक कॅलीससारखे प्लेयर्स, स्मिथसारखा कॅप्टन तर डेल स्टेनसारखा बॉलर तर डिविलीयर्स सारखा धडाडीचा बॅट्समन असूनसुद्धा त्यांना आजवर पुन्हा वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.
मित्रांनो या अनिश्चिततेमुळेच क्रिकेट खेळ आजवर जगात आपली क्रेझ टिकवून आहे.
मित्रांनो, तुम्हांला क्रिकेटच्या इतिहासातली कुठली मॅच महत्त्वाची आणि रोमांचकारी वाटते? आम्हांला कमेंटबॉक्समध्ये लिहून कळवा.
आणखी वाचा :
कपिल देवने हे केले नसते तर भारताने १९८३ चा वर्ल्डकप जिंकलाच नसता !!
१९९६ च्या वर्ल्डकप मध्ये ऐन सामन्यात विनोद कांबळी का रडला होता ??