computer

व्हेलच्या उलटीला आहे चक्क लाखोंची किंमत...व्हेलच्या उलटीमध्ये एवढं काय खास आहे?

मंडळी, घाटकोपर पोलिसांनी या आठवड्यात दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांकडे १.७० लाख किमतीचे ‘एम्बरग्रीस’ म्हणजे सोप्या भाषेत 'व्हेल माशाची उलटी' सापडली आहे. आता उलटी म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर जे येईल तसा प्रकार इथे नाहीय राव. हा फोटो पाहा. ही आहे ती उलटी.

काय असतं 'व्हेल एम्बरग्रीस' ?

मंडळी, चक्क ओकारीतून निघालेल्या पदार्थाला एवढी किंमत का असावी? तर त्याचं असं आहे, हा साधा पदार्थ नाही. तो स्पर्म व्हेलच्या पोटात स्त्रवणारा विशिष्ट पद्धतीचा मेण असतो. सुरुवातीला या मेणाचा वास एखाद्या माशाप्रमाणेच असतो, पण हळूहळू त्यात बदल होत जाऊन त्याचं रुपांतर सुगंधी मेणात होतं. या मेणापासून परफ्युम तयार केले जातात. असं म्हणतात की एम्बरग्रीसचा वास कुत्रे लवकर ओळखू शकतात, त्यामुळे एम्बरग्रीस शोधण्यासाठी कुत्र्यांचा वापर केला जातो.

मंडळी, ते म्हणतात ना, दुर्मिळ पदार्थाचीच तस्करी केली जाते. तसंच एम्बरग्रीसच्या बाबतीत आहे. एम्बरग्रीसची मोठ्याप्रमाणात तस्करी होते. स्पर्म व्हेल आता विनाशाच्या पायरीवर असल्याने जगभरात एम्बरग्रीसच्या तस्करीवर बंदी घालण्यात आली आहे. तरी तस्करी पूर्णपणे थांबलेली नाही. आखाती देशांमध्ये एम्बरग्रीसला “तरंगणारं सोनं” म्हणतात.

तर मंडळी, कशी वाटली ही माहिती ? आवडली असेल तर शेअर आणि कमेंट नक्की करा !!

सबस्क्राईब करा

* indicates required