'कॉर्न-फ्लेक्स' चक्क 'हस्तमैथुन' रोखण्यासाठी बनवले होते हे तुम्हाला नक्कीच माहित नसेल !!
आज कोणीकोणी नाश्त्याला कॉर्न-फ्लेक्स खाल्लेत ? महाराष्ट्रात खास करून मराठी घरांमध्ये कॉर्न-फ्लेक्स तेवढे खाल्ले जात नसले, तरी काही घरांमध्ये कॉर्न-फ्लेक्स हाच सकाळचा नाश्ता असतो. आज आम्ही या कॉर्न-फ्लेक्सची जन्मकथा सांगणार आहोत.
ही जन्मकथा वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. चला तर गोष्टीला सुरुवात करूया.
कॉर्न-फ्लेक्सचे जन्मदाते होते ‘जॉन हार्वे केलॉग’. आज आपल्याला बाजारात जे ‘केलॉग्स’ दिसतं त्याचे हे जनक. त्यांनी १९ व्या शतकाच्या शेवटी कॉर्न-फ्लेक्स शोधून काढला. त्यांनी कॉर्न-फ्लेक्सची जाहिरात करताना जे वाक्य वापरलं त्यावरून तुम्हाला समजेल की कॉर्न-फ्लेक्स कशासाठी तयार केलं गेलं होतं. हे वाक्य होतं :
“आरोग्यदायी, झटपट खाता येईल असा, ‘हस्तमैथुन-विरोधी’ सकाळचा नाश्ता”
मंडळी, तुम्ही बरोबर वाचलंत - ‘हस्तमैथुन-विरोधी’. मिस्टर केलॉग हे एका कट्टर ख्रिस्ती शाखेचे सदस्य होते. या ख्रिस्ती शाखेचा त्यांच्या विचारांवर चांगलाच पगडा होता. केलॉग हे ब्राम्ह्चार्याचे समर्थक होते. त्यांचा असा समज होता, की “संभोग हा अनारोग्य व अनैतिक आहे”...
केलॉग हे या विचारांनी इतके प्रभावी होते की ते कधीही पत्नीसोबत राहिले नाहीत. दोघेही वेगवेगळ्या खोलीत झोपायचे. मुल दत्तक घेणं त्यांनी पसंत केलं.
मंडळी, केलॉग यांनी आपल्या “Plain Facts for Old and Young: Embracing the Natural History and Hygiene of Organic Life” या लांबलचक नावाच्या पुस्तकात हस्तमैथुनाचे दुष्परिणाम नमूद केले आहेत. लहरी स्वभाव, पुरळ येणे, छातीत धडधड होणे, मिरगी येणे आणि तिखट खाद्यपदार्थ आवडणे असे दुष्परिणाम त्यांनी सांगितले आहेत.
केलॉग यांच्याकडे या समस्यांवर उपाय पण तयार होता. त्यांचं म्हणणं होतं की स्वादिष्ट पदार्थ आणि मांसाहार लैंगिक इच्छांना वाढवतात. याविरुद्ध फारशी चव नसलेले पदार्थ आपल्या इच्छांना काबूत ठेवतात.
त्यासाठीच त्यांनी मक्यापासून तयार केलेल्या नव्या पदार्थाचा शोध लावला, ज्याचं नाव होतं ‘कॉर्न-फ्लेक्स’. त्यावेळचं ‘कॉर्न-फ्लेक्स’ हे आजच्या सारखं चविष्ट नव्हतं, तर त्याला जाणीवपूर्वक सपक ठेवण्यात आलं होतं.
‘कॉर्न-फ्लेक्स’ खाणारे पहिले लोक हे केलॉग ज्या आरोग्याश्रमात काम करायचे तिथले रुग्ण होते. स्वतः वैद्य असल्याने त्यांनी पहिला प्रयोग या रुग्णांवर केला. त्याचे परिणाम काय झाले याबद्दल फारशी माहिती नाही.
केलॉग यांच्या नव्या उत्पादनावर स्थानिक चर्चचा हात होता. शेवटी याच चर्चच्या समजुतीनुसार ‘कॉर्न-फ्लेक्स’ जन्मले होते. यामुळे झाले असे की श्रद्धेने का होईना पण कॉर्न-फ्लेक्स विकले गेले आणि पुढे तर त्याने सकाळच्या नाश्त्यातील प्रमुख पदार्थाचा मान पटकावला.
तर मंडळी, अशी होती कॉर्न-फ्लेक्सची जन्मकथा. कॉर्न-फ्लेक्स खाताना कधी विचार केलेला का आपण खात असलेला पदार्थ अशा विचित्र कारणासाठी बनलेला आहे ?