म्हणून या गावातल्या सगळ्या गावकऱ्यांच्या जन्मतारखा सारख्याच आहेत !!
एखाद्यासोबत जन्मतारीख मॅच होणे काही विशेष नाही. असं म्हणतात काहीएक संबंध नसलेली तीस माणसं एका खोलीत असतील, तर त्यातल्या दोघांची जन्मतारीख एक असते. सालासह नाही, फक्त तारीख आणि महिना. त्यामुळं कधी कधी गावातल्या एखाद्या माणसाचा किंवा आपल्याच कुणा नातेवाईकाचा वाढदिवस आणि आपला एकाच दिवशी असतो. एकच वाढदिवस असलेले नवराबायकोही आम्हांला माहित आहेत. आता बोला!! तुम्हांला या गोष्टीचं कौतुक वाटत असेल. पण तुमच्या पूर्ण गावाची जन्मतारीख एकच असेल तर? किती आश्चर्य वाटेल? एका गावात असंच घडलं आहे आहे राव!!
मंडळी, मध्यप्रदेशातल्या शिवपुरी जिल्ह्यात काकरा नावाचं गाव आहे. या गावात सगळ्यांच्या जन्मतारखा सारख्याच आहेत. ही कमाल शक्य झाली आहे आधार कार्डमुळे!!
कारण त्यांच्या खऱ्या जन्मतारखा काहीही असल्या तरी आधार कार्डवर सगळ्या जन्मतारखा सारख्या म्हणजे १ जानेवारी आहेत.
या आधारकार्डांमुळे आणखीही गमतीजमती घडल्या आहेत. उदाहरणच बघा, कल्लो आदिवासी नावाची एक बाई प्रत्यक्षात ३० वर्षाची आहे, पण आधार कार्डावर ती ३९ची आहे तर मतदान कार्डवर तिचे वय ४९ येत आहे. आणि सगळ्यांची जन्मतारीख १ जानेवारी आहे. एकूणच सगळा गोलमाल प्रकार आहे. अशी अनेक उदाहरणं त्या गावात आहेत.
हा प्रकार का घडलाय याचे कारण वेगळे आहे राव! आपल्याकडे महाराष्ट्रात एखाद्याची जन्मतारीख माहीत नसेल तर १ जून ही तारीख दाखल्यात टाकण्यात यायची तीच गोष्ट तिथे पण झाली आहे. तिथे त्यांनी १ जूनऐवजी १ जानेवारी तारीख टाकली आहे इतकंच. आधार प्राधिकरणाची पॉलिसी अशी आहे की जर एखाद्याला त्याची जन्मतारीख माहीत नसेल आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून दुसरे कुठलेच कागदपत्रे नसतील तर त्याची जन्मतारीख १ जानेवारी गृहित धरण्यात येते.
आधारकार्डाचा जन्मतारखेच्या घोळाचा हे एकच प्रकरण नाहीय. २०१७ मध्ये पण असाच एक किस्सा घडला होता. गुजरातमधल्या गईंदी खटा गावात सगळ्यांच्या जन्मतारखा आधार कार्डवर सारख्या नोंदविल्या आढळल्या होत्या.
मंडळी, या गावकऱ्यांचा जन्म केव्हा झाला हे त्यांनाच माहीत नाही. म्हणून वाढदिवस साजरा करण्याचा पण विषय निकाली निघतो. जर वाढदिवस साजरा करायचा म्हटला तर पूर्ण गावाला एकाच दिवशी वाढदिवस साजरा करावा लागेल. पूर्ण गाव मिळून वाढदिवस साजरा करतेय, धमाल असेल नाही?
लेखक : वैभव पाटील