जगातल्या या २ देशांमध्ये एकही भारतीय नाही...या देशांची नावं तुम्हाला नक्कीच माहित नसतील !!
आज भारतीय संपूर्ण जगभरात पसरले आहेत… असा जर तुमचा समज असेल तर त्याला आज आम्ही धक्का देणार आहोत. जगभरात अशी २ ठिकाणं आहेत जिथे एकही भारतीय राहत नाही. ही दोन ठिकाणं कोणती आहेत ते आज आपण जाणून घेऊया.
१. व्हॅटिकन सिटी
व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. देश म्हणण्यापेक्षा हे एक स्वतंत्र शहर आहे असं आपण म्हणू शकतो. चारी बाजूने इटलीची राजधानी रोमने वेढलेलं हे शहर आहे. या शहराचं आकारमान अवघ्या ११० एकर एवढाच मर्यादित आहे. लोकसंख्या केवळ १००० आहे. ख्रिश्चन धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोपचं हे निवासस्थान आहे. पोपद्वारेच तिथला कार्यभार सांभाळला जातो. हा कार्यभार ज्या जागेतून सांभाळला जातो त्याला “होली सी” म्हणतात.
या शहराचा आकार बघता तिथे कोणत्याच देशाचा दूतावास असणं शक्यच नाही. त्यामुळे भारतीय दूतावासही तिथे अस्तित्वात नाही. त्याऐवजी ‘होली सी’साठी स्वित्झर्लंडच्या बर्न येथे भारतीय दूतावास स्थापन करण्यात आला आहे. त्याला मान्यताही मिळाली आहे. भारताखेरीज डेन्मार्क, श्रीलंका, थायलंड यांचेही दूतावास बर्न येथे आहेत.
कॅथलिक चर्चचं मुख्यकेंद्र असल्याने जेव्हा पोप निवडायची वेळ येते तेव्हा भारतातून पाद्री व काही नन्स व्हॅटिकन सिटीत काही काळापुरतं वास्तव्य करतात. याखेरीज पर्यटक म्हणून अनेक भारतीय व्हॅटिकन सिटी पाहायला जातात. इतर देशात भारतीयांनी त्या देशाचं नागरिकत्व मिळवलं आहे. तिथे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने ते वास्तव्य करतात किंवा मूळ भारतीय वंशाचे लोक पण तिथे असतात. मात्र, असा एकही भारतीय व्हॅटिकन सिटी मध्ये नाही. याचं कारण म्हणजे व्हॅटिकनमध्ये नागरिकत्वावर निर्बंध आहेत.
२. सान मारिनो
हा देश देखील व्हॅटिकन सिटीप्रमाणे इटलीपासून स्वतंत्र झालेला आहे. व्हॅटिकन सिटी, मोनॅकोच्या खालोखाल सान मारिनो हा देश जगातला सर्वात लहान देश आहे. या देशाचं क्षेत्रफळ केवळ ६१ किलोमीटर एवढं असून ३३,५६२ एवढी लोकसंख्या आहे. पर्यटक म्हणून गेलेले भारतीय सोडले तर तिथे कोणताही भारतीय वास्तव्य करत नाही.
सान मारिनो देशाच्या आकारमानामुळे बहुसंख्य देशांचे दूतावास हे रोम शहरात आहेत. भारतीय दूतावास पण रोममध्ये आहे. ऑस्ट्रिया, बल्गेरिया, क्रोएशिया, फ्रान्स, जपान, मेक्सिको, मोनॅको, रोमानिया हे मोजके देश आहेत ज्यांना मानद म्हणून देशाच्या अंतर्गत भागात दूतावास स्थापन करण्याची परवानगी मिळाली आहे.
मंडळी, या दोन देशांना सोडल्यास आणखी एक देश आहे जिथे भारतीय नाहीत. हा देश म्हणजे आपल्या शेजारचा पाकिस्तान. या देशात कोणीही भारतीय वास्तव्य करत नाही किंवा तिथे शिक्षण-नोकरीसाठी गेलेला नाही. अर्थात काही भारतीय तिथे आहेत असं सगळ्यांचं म्हणणं असलं तरी पाकिस्तान ते अधिकृतपणे मान्य करत नाही.
वरच्या दोन देशांच्या यादीत हा तिसरा देश बसत नाही, त्याचं कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये भारतीय दूतावास आहे आणि भारतीय अधिकारी तिथे त्यांच्या कामासाठी वास्तव्य करतात.