रोबॉटला तुमचा चेहरा लावा आणि मिळवा ९२ लाख रुपये....पूर्ण बातमी वाचून निर्णय घ्या !!
तुमच्या चेहऱ्याला कोणी भाव दिला असो वा नसो, एक कंपनी आहे जी तुमच्या चेहऱ्यासाठी तब्बल ९२ लाख रुपये मोजायला तयार आहे. हे काय प्रकरण आहे ते आजच्या लेखात जाणून घ्या.
ब्रिटीश रोबॉट कंपनी Geomiq सध्या लोकांना त्यांचे चेहरे रोबॉटवर लावण्यासाठी परवानगी मागत आहे. हे रोबॉट्स मानवसदृश असतील. ते हुबेहूब माणसासारखे दिसावेत म्हणून त्यांना चेहरे हे खऱ्याखुऱ्या माणसांचे लावले जातील. त्यासाठी निवड प्रक्रिया घेण्यात येतील. तुमच्या चेहऱ्याची निवड झाल्यानंतर तो चेहरा असंख्य रोबॉट्सवर लावण्यात येईल.
खऱ्या माणसाचेच चेहरे हवेत यामागे आणखी एक कारण आहे.
Geomiq कंपनी सध्या एका दुसऱ्या कंपनीसाठी काम करत आहे. ही दुसरी कंपनी कोणती ते अज्ञात आहे. याचं कारण Geomiq कंपनीने हे सिक्रेट ठेवलंय. कंपनीचं नाव उघड न करण्यासाठी कायदेशीरपणे करार करण्यात आलाय. ज्या माणसाचा चेहरा रोबॉटसाठी निवडण्यात येईल त्यालाही ह्या करारावर सह्या कराव्या लागतील.
रोबॉट्सचं काम काय असेल?
वृद्ध माणसांचा मित्र म्हणून काम करण्याची जबाबदारी या रोबॉट्सवर असेल. या रोबॉट्सवर ५ वर्षांपासून काम सुरु आहे. पुढच्या वर्षापर्यंत हे रोबॉट्स बाजारात आणण्याचा कंपनीचा विचार आहे.
Geomiq कंपनी ही वृद्धांना आणि सैन्यातील निवृत्त जवानांसाठी ‘थेरपी रोबॉट्स’ बनवण्यासाठी ओळखली जाते. वृद्धांना आणि सेवानिवृत्त जवानांना एकटेपण घालवण्यासाठी हे रोबॉट्स वापरले जातात.
तर मंडळी, अशा रोबॉट्सवर आपला चेहरा लागलेला तुम्हाला आवडेल का? पण एक दुसरी बाजू पण समजून घ्या. समजा तुमच्या चेहऱ्याचा डेटा लिक झाला तर तुमचा चेहरा कोणत्याही रोबॉटवर लागू शकतो किंवा त्याचा वापर इतर कामासाठीही केला जाऊ शकतो. आता निर्णय तुमचा आहे!!