computer

शेअर बाजारातला नवा घोटाळा; जाणून घ्या यावेळेस नक्की काय घडलंय ते!!

पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँक - एच.डी.आय.एल - डि.एच.एफ.एल. या घोटाळ्यांच्या बातम्या शिळ्या होत आहेत तोपर्यंत आणखी एका घोटाळ्याची बातमी आता पुढे आली आहे. या नव्या २८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे मालक आहेत कार्वी शेअर ब्रोकर्स. ही आहे हैद्राबादची एक नावाजलेली कंपनी!!

या घोटाळ्याची व्याप्ती आता दिसतेय त्याहून बरीच मोठी असण्याची शक्यता आहे. हा घोटाळा शेअरबाजारात भाग घेणार्‍या लोकांपुरता मर्यादीत असल्यामुळे इतर घोटाळ्यांसारखा गवगवा अजूनही माध्यमांद्वारे झालेला नाही. पण भांडवली बाजारात नियंत्रणात्मक काम करणार्‍या सेबीचा गलथानपणा या प्रकरणाने पुन्हा एकदा प्रकाशात आलेला आहे.  आज जाणून घेऊ या काय आहे हा लोच्या आणि जर एकूण फसलेल्या ९०००० गुंतवणूकदारात आपणही असाल तर तर बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? 

हे समजून घेण्यासाठी आधी शेअरबाजारातल्या सर्वसाधारण दलालांची कार्यपध्दती कशी असते हे जाणून घेणे आवश्यक आहे. जेव्हा आपण दलालाकडे शेअर्सची खरेदी-विक्री सुरु करतो तेव्हा दोन खाती उघडली जातात. एक खाते बाजारातून खरेदी-विक्री करण्यासाठी ट्रेडींग अकाऊंट असते तर दुसरे खाते एनएसडीएल किंवा सीडीएसएल यापैकी एखाद्या कस्टोडीअनकडे उघडलेले डीमॅट अकाउंट असते.

जेव्हा आपण शेअर खरेदी करतो, तेव्हा आपण दिलेले पैसे ब्रोकर बाजारात चुकते करतो. त्यानंतर एका एकत्रित खात्यात म्हणजेच पूल अकाऊंटमध्ये शेअर्स जमा होतात. त्यानंतर ब्रोकर ते आपल्या डीमॅट खात्यात जमा करतो.  जेव्हा आपण शेअरची विक्री करतो तेव्हा आपले डीमॅट खात्यातले शेअर्स पूल अकाऊंटमध्ये जमा होतात. ब्रोकर ते खरेदी करणार्‍या दुसर्‍या ब्रोकरच्या खात्यात जमा करतो. त्या ब्रोकरने चुकते केलेले पैसे आपल्या खात्यात जमा होतात.

थोडक्यात खरेदी-विक्रीचा व्यवहार चालतो तो असा! 

सर्वसामान्य ग्राहकाच्या लक्षात एक महत्वाची गोष्ट येत नाही ती म्हणजे डीमॅट खाते हे ग्राहकाच्या मालकीचे असते. त्या खात्यातून शेअर्स काढून घेण्याचा अधिकार फक्त खातेधारकाचा असतो. अशा परिस्थितीत ब्रोकर ते शेअर्स खात्यातून बाहेर कसे काढतो? त्याचे उत्तर असे आहे की आपण ट्रेडींग खाते उघडतो तेव्हा ब्रोकर आपल्याकडून एक पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी सही करून घेतो. याद्वारे आपणच त्याला हा व्यवहार करण्याची परवानगी देतो. अर्थात ह्यामध्ये नवीन आणि वेगळे असे काही नाही. व्यावहारीक सुलभतेसाठी केलेला हा आवश्यक व्यवहार असतो.

कार्वी शेअर ब्रोकरने याच पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा दुरुपयोग करून ग्राहकांच्या खात्यातले शेअर्स लंपास केले आणि बँकांकडे गहाण ठेवले. या गहाणवटीतून आलेले पैसे त्यांनी नेमके कुठे गुंतवले याचा अजून तपासणी चालू आहे. आता हे पैसे कार्वीने वेळेत बँकांना किंवा इतर आर्थीक संस्थांना परत केले नाहीत तर या शेअर्सची विक्री होईल. कार्वीचे कर्ज चुकते होईल. अर्थातच, गुंतवणूकदारांचे  नुकसान होईल किंवा झालेच आहे असे म्हणता येईल.

आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे की डीमॅट खात्यात काहीही व्यवहार झाला की त्याची मेल ग्राहकाच्या खात्यात जाते. एसएमएसद्वारे संदेश पाठवला जातो. महिन्याच्या शेवटी त्या खात्यात झालेल्या व्यवहाराचे स्टेटमेंटही पाठवले जाते. मग हा घोटाळा झाला कसा? काय मोडस ऑपरेंडी वापरली गेली हे अजून स्पष्ट व्हायचे आहे.  पण त्याबद्दल काही तर्क आहेत  ते असे! 

चोरी दोनच ठिकाणी शक्य असते. सुनसान वस्तीत किंवा भरगच्च गर्दीत!! आपल्यापैकी बरेचजण शेअर खरेदी करतात किंवा जुने शेअर डीमॅट करून जमा करून ठेवतात. नियमित लेन-देन करत नाहीत. बॅकेतल्या 'डॉर्मंट' किंवा निद्रिस्त खात्यासारखे हे डीमॅट खाते असते. या खात्याला जोडलेला फोन नंबर बदलला किंवा इमेल खाते बदलले तरी त्याची डीमॅट खात्यात नोंद करण्याची तसदी बरेचजण घेत नाहीत. साहजिकच या खात्यातले शेअर्स ब्रोकरने वापरले असतील तर त्याचा गवगवा होणार नाही. बँकेतल्या डॉर्मंट खात्यातून पैशाचा अपहार करणारे देखील हेच तंत्र वापरतात. 

आता दुसरी शक्यता म्हणजे कार्पोरेट अकाऊंटची! या खात्यात दिवसभरात इतक्या उलाढाली होतात की ट्रँझॅक्शन्स करणारी टीम वेगळी असते आणि हिशोब ठेवणारी टीम वेगळी असते. ट्रेडींग टीम दिवसभरात झालेल्या व्यवहाराचा आढावा घेते. नफा नुकसान बघते. ट्रान्सफर ऑफ सिक्युरिटी बॅक ऑफीसची टीम बघत असते. या दोन्ही टीमच्या टाइमलाईनमध्ये एक लॅग म्हणजे वेळेचा फरक असतो. साहजिकच कोणत्याही दिलेल्या दिवशी नक्की काय स्थिती आहे याचा पत्ता लागत नाही. त्यामुळे इथे चोरी करणे सोपे असते. हर्षद मेहताने नेमके हेच तंत्र वापरून सिक्युरीटी स्कॅम केला होता.

याखेरीज आतून मदत करणार्‍या काहीजणांचा या फ्रॉडमध्ये सहभाग असण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. पण अजूनतरी या प्रकरणाच्या तपासात काही प्रगती झाल्याचे लक्षात आलेले दिसत नाही. त्यामुळे तर्क करण्यात काही अर्थ नाही. येनकेनप्रकारेण कार्वीने ९०००० खात्यातून शेअर लंपास केल्याची सध्याची बातमी आहे.  नीटनेटक्या व्यवहारासाठी प्रसिध्द असलेली एचडीएफसी बँक ४०० कोटी रुपये, तर बजाज फायनान्ससारखी कंपनी ३४५ कोटी कर्ज देऊन यात अडकलेली आहे. आणखी किती बँका किती फसल्या आहेत याची माहीती हळूहळू उघडकीस येईलच!! 

पण आपण आता मुद्द्याकडे वळू या!! 

जर तुमचे खाते कार्वी ब्रोकरकडे असेल तर काय कराल?

१. तुमच्या डीमॅट खात्यात कोणते शेअर्स आहेत याचा तपास करा.
२. गेल्या सहा महिन्यातला प्रत्येक व्यवहार तुम्हीच केला आहे का? हे आठवून बघा. 
३. प्रत्येक शेअर ट्रान्सफरचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत का? हे बँकेच्या पासबुकावरून तपासून घ्या.
४. काही संशयास्पद व्यवहार दिसल्यास तो कार्वीच्या नजरेस आणा. तसे पत्र लिहून पावती घ्या.

५. मेलद्वारेही तेच पत्र पाठवा आणि त्याची प्रत सेबीकडे पाठवा.
६. या प्रकरणात अनेक बँका गुंतलेल्या आहेत, त्या बँका आपले अधिकार सिध्द करण्यासाठी शेअर्स ट्रान्सफर होऊ नयेत म्हणून कोर्टात जातील. तुम्हाला ते शक्य होणार नाही, पण अनेक गुंतवणूकदार एकत्र येऊन एक प्रेशर ग्रुप तयार होईल. त्याचे सदस्य होऊन सक्रिय सहभाग घ्या.
७. काल सेबीने दिलेल्या आदेशावरून एनएसडीएलने ८३००० गुंतवणूकदारांना त्यांचे शेअर्स परत दिले होते. पण बँकानी मॅटकडे म्हणजे ट्रिब्यूनलकडे धाव घेऊन त्यावर स्थगिती मिळवली आहे. 
८. जर तुमचे खाते व्यवस्थित असेल तर कस्टोडीअनला संपर्क करून शेअर्स दुसर्‍या खात्यात हलवून घ्या.

बाजार नियंत्रीत करणारी सेबी, बँका नियंत्रित करणारी रिझर्व बँक, विमा नियंत्रित करणारी आयआरडीए या सर्व संस्था घोटाळा उघडकीस आल्यावरच जाग्या होतात. पण तुम्हां-आम्हांला मात्र सतत सतर्क रहावे लागते. इतकं जरी आपण या अनुभवातून शिकलो तरी डिव्हीडंड मिळाला असे समजा.पुढच्या दोन दिवसांत बरंच काही घडण्याची शक्यता आहे. अर्थातच त्याबद्दल 'बोभाटा' च्या माध्यमातून आणखी माहिती लवकरच मिळू शकेल!!

सबस्क्राईब करा

* indicates required