तो चक्क २४ व्या वर्षी निवृत्त झाला, तरी त्याच्याकडे कोट्यवधी रुपये कसे आले ?
कॅनडाच्या ओन्तारिओ येथील माईक रोसहार्ट नावाचा हा तरुण सध्या २७ वर्षांचा आहे. त्याला २ मुलं आहेत. त्याने आपल्या अक्कल हुशारीच्या जोरावर २४ व्या वर्षीच कामातून निवृत्ती घेतली होती. त्याने नक्की काय काय केलं हे वाचल्यावर आपल्यालाही बचतीचे धडे मिळतील. चला तर पाहूया.
माईक हा एका गरीब कुटुंबात जन्मला होता. घरात खूप कष्टाने पैसे यायचे. त्याने कसंबसं आपलं शिक्षण पूर्ण करण्यात यश मिळवलं. तो शिक्षणात हुशार असल्या कारणाने त्याला एका कॉलेजमध्ये स्कॉलरशिप देखील मिळाली. कॉलेज करता करता तो कामही करायचा. तो भाड्याच्या घरात राहायचा. त्याची पत्नी अॅलीसशी भेट झाल्यानंतर दोघेही नव्या घरात राहायला गेले. तिथल्या खोलीचं भाडं ४५५ डॉलर्स (३२ हजार) एवढं होतं. घराचं भाडं आणि रोजचा खर्च सांभाळण्यासाठी त्याने लहानलहान गोष्टीत पैसे वाचवायला सुरुवात केली. रोजच्या प्रवासासाठी तो सायकलचा वापर करायचा. वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत त्याने इतके पैसे जमवले की त्याने स्वतःचं घर विकत घेतलं. हे घर १५२,००० डॉलर्स म्हणजे जवळजवळ १ कोटी रुपये किमतीचं होतं.
या नवीन घरातील खोल्या त्याने भाड्याने द्यायला सुरुवात केली. भाड्यातून आलेले पैसे आणि नोकरीतून आलेले पैसे गोळा करून त्याने पदवी मिळेपर्यंत स्वतःचं कर्ज फेडलं.
पदवीनंतर माईकला सल्लागार म्हणून वर्षाकाठी ४२,००० डॉलर्स (२९ लाख) ची नोकरी मिळाली. अॅलीसला पदवीनंतर २६,००० डॉलर्स (१८ लाख) ची ग्राफिक डिझाईनरची नोकरी मिळाली.
यानंतर त्यांच्या बचतीची नवीन पायरी सुरु झाली. दोघांनीही आपल्या पगारातून मोठ्याप्रमाणात बचत केली. यासाठी त्यांनी आपल्या लहानसहान इच्छांना मुरड घातली. उदाहरणार्थ, अॅलीसला स्टारबक्सची कॉफी खूप आवडायची. तो खर्च पूर्णपणे बंद करण्यात आला. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या लग्नातून पण कमाई केली. लग्नावर कमीतकमी खर्च करण्यात आला. १५० पाहुण्यांच्या जागी ८० पाहुणे बोलावण्यात आले. आलेल्या पाहुण्यांकडून जे पैसे भेट म्हणून मिळाले तेही त्यांनी वाचवले. दुसऱ्या बाजूला त्यांनी क्रेडीट कार्डवर एवढे पॉइन्ट साठवले की त्यांना हनिमूनसाठी ब्राझीलचा मोफत जाता आलं. ब्राझीलला गेल्यावर ते मित्राच्या घरी राहिले, त्यामुळे त्यांचा राहण्याचा खर्चही वाचला.
बचतीच्या बाबतीत त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा फंडा वेगळाच होता. त्यांनी अॅलीसचा पगार महिन्याच्या खर्चासाठी वापरला, तर माईकचा पूर्ण पगार बचत खात्यात जात राहिला. या जमवलेल्या पैशातून त्यांनी घरं खरेदी केली. या घरांमध्ये त्यांनी भाडेकरू ठेवले. भाड्यातून आलेले पैसे ते गुंतवत गेले. परिणामी ३ वर्षात त्यांच्याकडे १० घरांची मालकी होती.
निवृत्त होण्यासाठी त्याने काय केलं ? तर, त्याने सगळी घरं विकून टाकली. वयाच्या २४ व्या वर्षी माईककडे ७६०,००० डॉलर्स होते. म्हणजे तब्बल ५.३८ कोटी रुपये.
माईकला लवकर निवृत्त व्हायचं होतं कारण त्याला मुलं हवी होती. मुलं असल्यावर त्यांना तेवढाच वेळ देता यायला हवा. म्हणून त्याने जवळजवळ ६ वर्षे झटून एवढे पैसे कमावले की तो आता पैशांच्या बाबतीत निश्चिंत झाला आहे.
माईकच्या भाषेत सांगायचं झालं तर याला FIRE म्हणजे financial independence and retire early म्हणतात. आर्थिक स्वातंत्र्य आणि लवकर निवृत्त होणे!!