प्रत्येक पालकांना माहिती असावेत हे स्कूल बसचे नियम !!
गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या अनेक गावांचे रुपांतर छोट्या शहरांमध्ये होते आहे. एके काळी जिथे ग्रामपंचायती होत्या तिथे आता नगर परीषदा स्थापन झाल्या आहेत.गावाचे शहर झाले म्हणजे पाणी, रस्ते आणि इतर सार्वजनीक सुविधांचा विकास होत जातो. सोबतच विकसित होणाऱ्या नव्या शहरांच्या प्रगतीचे एक लक्षण म्हणजे शिक्षणसंस्थांचा विकास ! जुन्या गावात मोठ्या इमारती बांधायला जागा नसल्याने नव्याने येणार्या शाळा गावापासून दूर असतात. स्टेट बोर्ड, सीबीएसी बोर्ड, आयसीएसी बोर्ड प्रमाणे चालणार्या वेगवेगळ्या शाळा असतात.
विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार केला तर घर ते शाळा हा प्रवास हा फार महत्वाचा झाला आहे. वाढत्या रहदारीमुळे हा प्रवास जास्त लांब होत जातो आहे. त्यात नव्याने 'विद्यार्थ्यांची सामाजिक सुरक्षा' हा पण महत्वाचा विषय बनत चालला आहे. या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार झाल्यानंतर विद्यार्थ्यांची ने आण करणार्या वाहतूक व्यवस्थेवर सुप्रीम कोर्टाने काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक राज्यातील रोड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीने नियमावली बनवली आहे. आज महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची ने- आण करणार्या व्यवस्थेसाठी काय नियम आणि मार्गदर्शक तत्वे आहेत याचा विचार करू या !
वाहतूकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसचे दृश्य रुप कसे असावे याचे नियम आधी वाचू या.
शाळेच्या बसला एक विशिष्ट पिवळा रंग असतो. हा रंग असाच का असावा यामागे एक शास्त्रीय कारण आहे. नैसर्गिक उजेड कमी असताना म्हणजे पहाटेच्या /संध्याकाळच्या वेळात किंवा धुके असताना गजबजलेल्या रस्त्यावरही हा रंग इतर वाहनचालकांच्या लक्षात येतो. रंगाकडे लक्ष जाण्यासाठी लाल रंग पण वापरला जातो मग पिवळा का असा एक प्रश्न मनात येऊ शकतो. त्याचे कारण असे की हा पिवळा रंग वाहन चालकाच्या 'पेरीफिरल व्हिजन' (म्हणजे डोळ्यांच्या कडेने नजरेस येणारे दृश्य) हा रंग इतर कोण्त्याही रंगापेक्षा १.२४ पट जास्त लक्षात येतो. साहजिकच मागून येणारे वाहन ही शाळेची बस आहे हे कळल्यावर चालक अधिक जागरूक राहतो. ही रंग छटा(कलर शेड) स्कूल बस येलो या नावाने बाजारात उपलब्ध असते. सोबत दिलेले चित्र बघा.
या खेरीज इतर महत्वाचे नियम असे आहेत की बसच्या मागच्या आणि पुढच्या बाजूस School Bus असे ठळक अक्षरात लिहिलेले असावे.
बसच्या चारही बाजूला किमान १५ सेंटीमीटरचा डार्क ब्राऊन रंगाचा पट्टा मधोमध रंगवून त्यावर शाळेचे नाव आणि फोन नंबर दिलेला असावा. बर्याच वेळा बस कंत्राटी तत्वावर चालवली जात असेल तर त्या कंपनीचे नाव आणि फोन नंबर दिलेला असावा.
याखेरीज इतर महत्त्वाचे नियम मार्गदर्शक तत्वे सुप्रीम कोर्टाने दिलेली आहेत. प्रत्येक राज्याने आपापल्यापरीने त्यामध्ये नियमांची भर घालून शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक याबद्दल स्वतःचे नियम बनवलेले आहेत. Road Transport Authority (RTA) च्या नियमावलीप्रमाणे Regional Transport Office (RTO) मधून त्याची अंमलबजावणी होते.
आता आपण नवीन नियम काय सांगतात ते पाहूया.
. शाळेच्या बसेस मध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही असलाच पाहिजे. याखेरीज शाळेच्या आवारात देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले हवेत. शाळेने हे फुटेज ६० दिवस स्वतः जवळ ठेवणे अनिवार्य आहे. जर काही कारणांनी गरज पडल्यास हे फुटेज पोलीसांन तपासण्यास द्यावेत.
२. बस ड्राईव्हरने मुलांशी प्रमाणात बोललं पाहिजे. ड्राईव्हरने एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त मुलांशी बोलू नये किंवा त्यांना प्रतिसाद देऊ नये.
३. शाळेच्या आवारात शाळेच्या संबंधित नसलेल्या व्यक्तीने येणं निषिद्ध ठरवण्यात आलंय. संशयित माणसाची लगेच तक्रार केली जावी असे नियम आखण्यात आले आहेत.
४. पालकांसाठी देखील आयडी कार्ड असावा अशी तरतूद नवीन नियमांमध्ये आहे. या नियमाप्रमाणे आपल्या मुलांना घ्यायला येताना आयडी कार्ड दाखवून मगच मुलांना घरी घेऊन जावे. जर समजा एखाद्या पालकाला मुलाला शाळेतून घेण्यास जमणार नसेल तर एक एसएमएस पाठवून दुसऱ्या व्यक्तीला हे अधिकार देता येतील.
महाराष्ट्रात काय नियम आहेत ?
१. शाळेच्या वाहतुकीसंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी एक वेगळी समिती असावी. या समितीत शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, शिक्षणाधिकारी आणि इतर आधिकारिक मंडळी असावीत.
२. शाळेच्या बस मधील मुलांच्या सुरक्षेबाबत शाळेचे मुख्याध्यापक पूर्णपणे जबाबदार असावेत.
३. शाळेकडून प्रत्येक शालेय वर्षाच्या सुरुवातीलाच गरजेच्यावेळी प्रथमोपचार आणि अग्निशामक यंत्र कसं वापरावं याचं प्रशिक्षण देण्यात यावं.
४. प्रत्येक शाळेने वाहतुकीची व्यवस्था पाहणारा एक अधिकारी नेमावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर असावी.
५. शाळेच्या जवळ मार्गदर्शक खुणा असाव्यात. हे ट्राफिक पोलिसांच्या परवानगीने व्हावं.
६. शाळेने विद्यार्थ्यांना कोणत्याही वाहनाने सुरक्षितपणे ने-आण करण्यासाठी योग्य व्यवस्था आखायला हवी.
७. सर्व बस चालकांच्या वेगवेगळ्या वैद्यकीय तपासण्या करण्यात याव्या.
८. प्रत्येक शाळेच्या बसकडे इन्शुरन्स असायला हवं.
९. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसमध्ये एक महिला सेविका नियुक्त असावी.
१०. शाळेच्या प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार असायलाच हवा. त्यात गरजेची औषधे आणि साहित्य असायला हवे.
११. आपातकालीन परिस्थितीमध्ये आवश्यक म्हणून शाळेच्या प्रत्येक बसमध्ये विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांच्या घरच्यांचे फोन नंबर असणं गरजेचं आहे..
१२. सीट्स असे असावेत की आपातकालीन दरवाजा उघडण्यात बाधा येऊ नये.
१३. ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त मुलं बसमध्ये नसावीत. सर्वसाधारण नियाप्रमाणे जर विद्यार्थ्यांचे वय १२ पेक्षा जास्त असेल तर ठरवलेल्या प्रमाणापेक्षा दीडपट जास्त मुलं बसमधून नेऊ नये. काहीवेळा लहान मुलं आहेत म्हणून जास्तीत जास्त मुलं भरली जातात, तसं करू नये. जर मुलांचं वय १२ पेक्षा जास्त असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला ‘एक’ व्यक्ती म्हणून गृहीत धरावे.
१४. शाळेच्या बसमध्ये संगीत वाजवू नये.
१५. बसच्या आत धुम्रपान आणि दारू पिऊ नये.
१६. प्रवासादरम्यान बसचे दरवाजे बंद असावेत.
सध्याच्या वातावरणात बोभाटाच्या सूज्ञ वाचक पालकांनी आपले पाल्य ज्या शाळेत जातात तेथे या नियमांचे पालन होते याची खात्री करून घ्यावी. लक्षात घ्या हलगर्जी करणाऱ्या शाळा चालकांसाठी कोर्टाने IPC प्रमाणे दंड आणि शिक्षेची व्यवस्था केली आहे.