पुण्यात होणाऱ्या भीमथडी जत्रेबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/ggggg.jpg?itok=0XuQEwM2)
भीमथडीची जत्रा २००६ पासून भरत आलेली आहे. गावोगावच्या कारागीर, कलाकारांसाठी ही जत्रा फार महत्त्वाची असते.खाद्यपदार्थ, हस्तकला, संगीत, नृत्य अशा वेगवेगळ्या पद्धतीने ५ दिवस जंगी कार्यक्रम असतो. या जत्रेबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कुठे असते ही जत्रा ?
पुण्याच्या शिवाजी नगर येथील सिंचन नगर भागात असलेल्या कृष्टी महाविद्यालयाच्या मैदानात ही जत्रा भरते. यावर्षी १८ डिसेंबर ते २२ डिसेंबर या ५ दिवसांमध्ये जत्रेचं आयोजन होणार आहे. १८ तारखेच्या संध्याकाळी ४ वाजता सुरु झालेली जत्रा २२ तारखेला रात्री १० वाजता संपेल.
जत्रेचं वैशिष्ट्य काय ?
महिलांना रोजगार मिळावा आणि शहरी व ग्रामीण कलाकारांमधली दरी कमी व्हावी हे या जत्रेचं मुख्य उद्देश्य आहे. यावर्षीचं मुख्य आकर्षण म्हणजे यंदा खास ३० स्टॉल निवडण्यात आले आहेत. पारंपारिक हातमाग आणि हस्तकलेला पुनरुज्जीवित करणाऱ्या आणि त्याला जपणाऱ्या निवडक कारागीर, डिझाईनर्सचे एकूण ३० स्टॉल असणार आहेत. यामार्फत त्यांची कला जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाणार आहे.
याखेरीज गावोगावचे इतर कलाकार आणि त्यांनी तयार केलेल्या पारंपारिक वस्तू सुद्धा असणार आहेत. इथला जुनाबाजार विशेष प्रसिद्ध असतो. महाराष्ट्रातील वेगवेगळे खाद्यपदार्थ हे भीमथडी जत्रेचं आणखी एक वैशिष्ट्य.
जत्रा म्हटलं की जे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं ते स्वरूप भीमथडी जत्रेला पण आहे. दरवर्षी १.७५ लाख लोक जत्रेत येतात. यात विशेष काय ? तर एवढे लोक येऊनही जत्रेत प्लास्टिकचा कचरा फारच कमी असतो. ही जत्रा ‘प्लास्टिक फ्री’ ठेवण्यात आली आहे. जो ओला कचरा तयार होतो त्याचं खत तयार केलं जातं. जो थोडाफार प्लास्टिक कचरा तयार होतो तो एका एनजीओला दिला जातो. एनजीओ त्याचं रुपांतर इंधनात करतं. हे इंधन आदिवासी भागात दिलं जातं.
तर मंडळी, महाराष्ट्रातील कारागिरांना मदतीचा हात देण्यासाठी आणि एका वेगळ्या अनुभवासाठी तुम्ही भीमथडी जत्रेला जाणार ना ?